गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्या गुजरातमधील वडनगर येथे पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय,प्रेरणा संकुल आणि वडनगर क्रीडा संकुलाचे उद्घाटन


या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटही होणार प्रदर्शित

Posted On: 15 JAN 2025 10:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह गुरुवारी, 16 जानेवारी 2025 रोजी, गुजरातमधील वडनगर येथे पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय, प्रेरणा संकुल आणि वडनगर क्रीडा संकुलाचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी गृहमंत्री वडनगरमधील वारसा संकुल विकास योजना, शहरी रस्ते विकास आणि सौंदर्यीकरण याविषयीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानही भूषवतील. यादरम्यान अमित शाह यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचेही प्रकाशन होणार आहे.

पुरातत्व अनुभवात्मक संग्रहालय:

12,500 चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेले आणि 298 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारलेले हे संग्रहालय वडनगरचा 2,500 वर्षांहून अधिक जुना सांस्कृतिक इतिहास उलगडणारे संग्रहालय आहे. भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच संग्रहालय आहे, जिथे भेट देणाऱ्यांना पुरातत्व स्थळाचा अनुभव प्रत्यक्षरित्या घेता येतो. या संग्रहालयात 5,000 हून अधिक ऐतिहासिक वस्तू जतन करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मातीची भांडी, शंखापासून तयार उत्पादने व कच्चा माल, नाणी, दागिने, शस्त्रास्त्रे, शिल्पे, खेळणी यांचा समावेश आहे. तसेच अन्नधान्य, डीएनए आणि अस्थी अवशेषांसारख्या सेंद्रिय वस्तूंनाही या संग्रहालयात स्थान देण्यात आले आहे.

या संग्रहालयात नऊ वेगवेगळ्या विषयांवर आधारित दालने आहेत. याशिवाय, 4,000 चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेले एक उत्खनन स्थळ आहे, जिथे 16-18 मीटर खोलीपर्यंतचे पुरातत्वीय अवशेष पाहता येतात. येथे तयार करण्यात आलेल्या अनुभवात्मक वॉकवे शेडमुळे पर्यटकांना उत्खननातून सापडलेल्या वस्तू जवळून पाहण्याचा अद्वितीय अनुभव मिळतो.  

हे संग्रहालय वडनगरच्या बहुस्तरीय सांस्कृतिक इतिहासाचे दर्शन घडवते आणि या शहरातील सलग 2,500 वर्षांहून अधिक काळ चालत आलेल्या मानवी वस्तीचे पुरावे सादर करते. वडनगर हे इतिहासात अनर्तपूर, आनंदपूर, चमत्कारपूर, स्कंदपूर आणि नागरका या नावांनीही ओळखले गेले आहे. या शहरातील कीर्ती तोरण, हटकेश्वर महादेव मंदिर, आणि शर्मिष्ठा तलाव यांसारखी ऐतिहासिक स्थळे वडनगरच्या गौरवशाली वारशाची साक्ष देतात. मुख्य व्यापार मार्गावर वसलेले वडनगर हिंदू, बौद्ध, जैन आणि इस्लाम या धर्मांसाठी एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र होते.  

वडनगर क्रीडा संकुल:

मेहसाणा जिल्ह्यातील वडनगरमध्ये 34,235 चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेले आणि 33.50 कोटी रुपयांच्या खर्चाने वडनगर क्रीडा संकुल विकसित करण्यात आले आहे. हे तालुका-स्तरीय क्रीडा संकुल आधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या वचनबद्धतेचे उदाहरण आहे.  

या संकुलात सिंथेटिक अ‍ॅथलेटिक ट्रॅक, अ‍ॅस्ट्रोटर्फ फुटबॉल मैदान, तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, आणि खो-खो यांसारख्या पारंपरिक मातीवरील खेळांसाठी मैदान उपलब्ध आहे. याशिवाय, बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेबल टेनिस, ज्यूडो यांसाठी बहुउद्देशीय इनडोअर हॉल तयार करण्यात आला आहे. येथे व्यायामशाळेसाठी स्वतंत्र जागा असून, संकुलामध्ये 200 खाटांचे वसतिगृह आहे, जे 100 मुलांसाठी आणि 100 मुलींसाठी निवासाची सोय प्रदान करते.


S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2093251) Visitor Counter : 7