सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाकुंभातील कलाग्राम: भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे आणि ठेव्याचे प्रदर्शन


अद्वितीय सांस्कृतिक महोत्सव: महाकुंभात सुमारे 15,000 प्रसिद्ध कलाकारांचे सादरीकरण

Posted On: 12 JAN 2025 9:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 जानेवारी 2025

 

13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 दरम्यान उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होणार  आहे. ही एक महत्वपूर्ण अशी ऐतिहासिक घटना आहे, जी जगभरातून 40 कोटींपेक्षा अधिक भाविकांना आकर्षित करणार आहे. हा अध्यात्म, परंपरा तसेच सांस्कृतिक ठेव्याचा पवित्र संगम भारताच्या एकात्मतेची  आणि भक्तीची  शाश्वत भावना दृढ करेल. महाकुंभ कार्यक्रमाला युनेस्कोने 'मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक ठेवा' म्हणून मान्यता दिली आहे. हा फक्त एक कार्यक्रम नाही, तर एक असा अनुभव आहे जो राष्ट्रांच्या सीमा ओलांडून जगभरातील लोकांना एकत्र आणतो.

4000 हेक्टर क्षेत्रात विस्तारलेला हा महाकुंभ भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांशी आणि अत्याधुनिक संघटनात्मक क्षमतांना जोडणारे   एक सुसंस्कृत प्रतीक आहे. याच्या केंद्रस्थानी  शाही स्नान आहे, जे  गंगा, यमुना आणि पौराणिक  सरस्वती यांच्या संगमात होणारे एक पवित्र स्नान आहे. हे  शाही स्नान पापांचे शुद्धीकरण आणि आत्मिक मोक्ष देतो. ज्योतिषशास्त्रानुसार महाकुंभ हा सूर्य, चंद्र आणि गुरु यांच्या दुर्लभ नक्षत्रीय संयोगाने निश्चित होतो, जो भारताच्या प्राचीन ज्ञानाचा सखोल दृष्टिकोन दर्शवितो. ही शाश्वत परंपरा, जी पुराणकथांमधली  आणि लाखो लोकांद्वारे अनुकरण केलेली आहे,ती परंपरा ब्रम्हांड  शक्ती आणि मानवी अध्यात्मिकता या दरम्यानच्या संबंधाचे प्रतीक आहे.

महाकुंभातील कलाग्राम: सीमा पल्याड  उत्सवाचे प्रतीक

महाकुंभातील कलाग्राम, जो भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने स्थापन केला आहे तो भारताच्या एकतेत विविधतेचे तसेच कला, अध्यात्म आणि संस्कृतीचे अप्रतिम मिश्रण दर्शवितो. उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्यामुळे साकारले जाणारे हे उपक्रम भारताच्या सांस्कृतिक ठेव्याच्या जतनासाठी आणि भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठी एक परिवर्तनात्मक अनुभव देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

महाकुंभ 2025 मधील कलाग्राम फक्त एक कार्यक्रम नाही, तर भारताच्या गौरवशाली भूतकाळाची आणि समृद्ध वर्तमानाची झलक देणारा एक जीवंत कॅनव्हास आहे, जो पुढील पिढ्यांना प्रेरणा देईल.

कलाग्राम हे सांस्कृतिक मंत्रालयाच्या देशाच्या शाश्वत परंपरांचे प्रदर्शन करण्याच्या वचनबद्धतेचे प्रमाण आहे.जे हस्तकला, खाद्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे अध्यात्मिकतेला कलात्मक तेजाने जोडते.

यात्रेकरूंचे स्वागत:

यात्रेकरूंचे स्वागत 35 फूट रुंद आणि 54 फूट उंच अशा भव्य प्रवेशद्वाराने केले जाईल, जे 12 ज्योतिर्लिंगांची आणि भगवान शिवांनी हलाहल प्यायलेल्या पौराणिक कथांची  चित्रे दर्शविणारे आहे.ज्यामुळे इथे प्रवेश करतांना एका महान सांस्कृतिक उंचीचा अनुभव त्यांना मिळेल.

विविध सांस्कृतिक प्रभाग:

  • अनुभूती मंडपम: एक 360 अंशाचे दृश्य आणि ध्वनी अनुभव देणारे असेल जे गंगा अवतरणाच्या दिव्य  अवतरणाची कल्पना उभी करतो, जे एक आध्यात्मिक अशा चमत्काराची अनुभूती निर्माण करते.
  • अविरल शाश्वत कुंभ प्रदर्शन  प्रभाग: एएसआय, आयजीएनसीए आणि अलाहाबाद संग्रहालय अशा संस्थांनी तयार केलेल्या या प्रभागामध्ये कुंभ मेळ्याच्या समृद्ध इतिहासाची आणि महत्त्वाची माहिती पुराणकला, डिजिटल प्रदर्शन आणि पोस्टर प्रदर्शनेद्वारे दर्शवली जाईल.

प्रसिद्ध कलाकारांचे अद्वितीय सादरीकरण:

सांस्कृतिक मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्या अद्वितीय सहयोगाने सादर होणारा सांस्कृतिक महोत्सव अन्य कोणत्याही कार्यक्रमापेक्षा आगळावेगळा असेल. या भव्य कार्यक्रमात सुमारे 15000 कलाकारांचा समावेश असेल. ज्यात प्रतिष्ठित पद्म पुरस्कार विजेते आणि संगीत नाटक अकादमीच्या मान्यताप्राप्त कलाकारांचा समावेश असेल. जे प्रयागराजच्या ऐतिहासिक शहरात उभारलेल्या विविध मंचांवर सादरीकरण करतील.

मुख्य मंच

एक अत्यंत सुंदर 104 फूट रुंद आणि 72 फूट खोल मंच, जो चार धामांचा देखावा असलेला भव्य पार्श्वभूमी दाखवतो, या  उत्सवाच्या हृदयस्थानी असणार आहे.

कलाकार

कार्यक्रमात काही प्रसिद्ध कलाकारांचा समावेश असेल, जसे की :

  • शंकर महादेवन
  • मोहित चौहान
  • कैलाश खेर
  • हंस राज हंस
  • हरिहरन
  • कविता कृष्णमूर्ती
  • मैथिली ठाकूर

उत्कृष्ट नाट्यप्रयोग

राष्ट्रीय नाट्य विद्यालय आणि श्रीराम भारतीय कला केंद्राच्या खास आठवडाभर चालणाऱ्या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण भव्य कलाग्राम मंचावर प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

अविरल  शाश्वत कुंभ प्रदर्शन क्षेत्र

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, राष्ट्रीय अभिलेखागार, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र आणि इलाहाबाद संग्रहालय यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांकडून सादर होत असलेला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक खजिना येथे अनुभवता येईल.

संस्कृतीचा स्वरमेळा

शास्त्रीय नृत्यांपासून लोककला परंपरेपर्यंत या सादरीकरणांतून कला आणि आध्यात्मिकतेचे सुरेख वीण साकारली  जाईल. भक्त आणि पर्यटक यांना सांस्कृतिक एकतेच्या सार्वभौम भाषेमध्ये जोडणाऱ्या या उत्सवातून भारताच्या शाश्वत वारशाचा गौरव होईल.

हस्तकला, खाद्यसंस्कृती आणि सांस्कृतिक विविधता

सात संस्कृती सादरीकरण क्षेत्र भारताच्या विविध हस्तकला परंपरांचा अनुभव देतील. प्रसिद्ध मंदिरांपासून प्रेरित दृश्य व अनुभवात्मक मेजवानी या ठिकाणी प्रदान केली जाईल:

  • एनझेडसीसी (हरिद्वार): लाकडी मूर्ती, पितळी शिवलिंग, लोकरीच्या  शाली
  • डब्ल्यूझेडसीसी (पुष्कर): मातीची भांडी, कठपुतळी, लघुचित्रे
  • इझेडसीसी (कोलकाता): कुंभाराची वालुकामय - टेराकोटा मूर्ती, पट्टचित्र, काथा भरतकाम
  • एसझेडसीसी (कुंभकोणम): तंजावर चित्रे, रेशीम वस्त्र, मंदिर दागिने
  • एनसीझेडसीसी (उज्जैन): आदिवासी कला, चंदेरी साड्या, दगडी कोरीव काम
  • एनइझेडसीसी (गुवाहाटी): बांबू हस्तकला, आसामी रेशीम, आदिवासी दागिने
  • कृतीएससीझेडसीसी (नाशिक): पैठणी साड्या, वारली कला, लाकडी कला

दिव्य अद्भुतता आणि बौद्धिक संलग्नता

  • आकाशगंगेचे दर्शन: काही विशेष रात्रींच्या आकाश निरीक्षण सत्रांद्वारे आकाशगंगेचा मंत्रमुग्ध करणारा अनुभव
  • पुस्तक प्रदर्शन: साहित्य अकादमी आणि क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांनी आयोजित केलेले अजरामर साहित्यिक खजिन्यांचे प्रदर्शन
  • सांस्कृतिक माहितीपट: आयजीएनसीए, एसएनए आणि झेडसीसीद्वारे निर्मित माहितीपट भारताच्या आध्यात्मिक व सांस्कृतिक पटाचा सखोल अंतर्दृष्टी देतील

तंत्रज्ञान व प्रभावकांद्वारे जागतिक पोहोच

#MahaKumbh2025 महाकुंभच्या जागतिक पोहोच वर्धनासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने प्रभावशाली लोकांसोबत सहकार्य करून डिजिटल मंचांचा उपयोग केला आहे. आकर्षक  सामुग्री, कार्यक्रम सुरू होण्याच्या अवधीची माहिती देणारे `काउंटडाउन पोस्ट्स` आणि केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत व तांत्रिक `टेक्निकल` गुरूजी यांच्यातील विशेष संवाद यामुळे जागतिक स्तरावर प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

महा कुंभ 2025 केवळ भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सवच ठरणार नाही तर देशाच्या संघटन क्षमतांचे, सुरक्षा उपायांचे आणि शाश्वततेच्या बांधिलकीचे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरेल. ही एक परिवर्तनकारी अनुभूती ठरण्याचे वचन देते, भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नेतृत्वाचे प्रतीक बनवते.

पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/Gajendra/Nitin/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2092340) Visitor Counter : 59