इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
स्मार्टफोनपासून लॅपटॉपपर्यंत : आयटी हार्डवेअर उत्पादनात भारत अग्रस्थानी
Posted On:
11 JAN 2025 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2025
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल चेन्नई येथे, भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण विकास प्रवासात उल्लेखनीय असलेल्या, Syrma SGS तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक लॅपटॉप असेंब्ली लाइनचे उद्घाटन केले.
मद्रास एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन (MEPZ) मध्ये असलेली ही सुविधा, भारताच्या ‘मेक इन इंडिया’ प्रवासातला एक निर्णायक बदल दर्शवते. यामुळे मोबाईल फोनपासून माहिती तंत्रज्ञान हार्डवेअरच्या उत्पादनापर्यंत आणि त्यातही विशेषकरून लॅपटॉप उत्पादनापर्यंत भारताचे वर्चस्व विस्तारल्याचे दिसून येते.
‘मेक इन इंडिया’मधील महत्वाचा टप्पा
नवीन असेंब्ली लाइन सुरुवातीला वार्षिक 1,00,000 लॅपटॉप तयार करेल, ज्याची क्षमता पुढील 1-2 वर्षांत 10 लाख एककांपर्यंत वाढेल. Syrma SGS चेन्नईमध्ये सध्या चार उत्पादन एकके चालवत आहे, आणि त्याचे एकक 3 आता लॅपटॉप उत्पादन सुरू करत आहे.
"येत्या काळात इलेक्ट्रॉनिक कंपोनंट परिसंस्था देखील विकसित होईल याची खातरजमा करण्यासाठी आपण काळजीपूर्वक काम केले पाहिजे” असे अश्विनी वैष्णव उद्घाटन प्रसंगी म्हणाले. यामुळे भारताची एक मोठी विकासगाथा अग्रेसर होईल आणि हे पाऊल आत्मनिर्भर भारताच्या आपल्या दृष्टीकोनाशी देखील सुसंगत असेल. यामुळे आत्मनिर्भरता वाढवण्यास आणि जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात भारताचे स्थान मजबूत होण्यास चालना मिळेल, असेही ते म्हणाले.
आयटी हार्डवेअरसाठी हा उपक्रम उत्पादन आधारित अनुदान (PLI) 2.0 योजनेचा भाग असून तो उच्च-मूल्याच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारताच्या वाढत्या क्षमतांवर प्रकाश टाकतो तसेच आयटी हार्डवेअरमध्ये देशाच्या आत्मनिर्भरतेला बळकटी देतो.
असेंब्ली लाईनची प्रमुख वैशिष्ट्ये
- जागतिक भागीदारी: Syrma SGS ने मायक्रो-स्टार इंटरनॅशनल (MSI) या अग्रगण्य तैवान तंत्रज्ञान कंपनीसोबत भागीदारी केली आहे. या भागिदारीतून भारतात उच्च-गुणवत्तेचे लॅपटॉप तयार केले जातील, जे देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी उपलब्ध करून दिले जातील.
- स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना: या सुविधेमुळे आर्थिक वर्ष 2026 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात 150-200 विशेष नोकऱ्या निर्माण होतील असा अंदाज आहे, ज्यामुळे तामिळनाडूच्या प्रादेशिक आणि भारताच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल, परिणामी या क्षेत्रातील भविष्यातील मनुष्यबळाला आकार मिळेल आणि त्यांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.’
- जागतिक दर्जाची मानके: उत्पादित केलेले लॅपटॉप आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांची पूर्तता करतील, जी भारताच्या विकसित होत असलेल्या तांत्रिक आणि उत्पादन कौशल्याचे प्रदर्शन करतील.
भारतातील वाढते इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र
गेल्या दशकात भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. एकूण उत्पादन 2014 वर्षातील 2.4 लाख कोटी रुपयांवरून 2024 मध्ये 9.8 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. केवळ मोबाईल उत्पादन 4.4 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 2024 मध्ये निर्यात 1.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारतात वापरले जाणारे 98% मोबाईल फोन आता भारतात उत्पादित केले जात आहेत आणि स्मार्टफोन ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात जास्त निर्यात वस्तु ठरली आहे.
लॅपटॉप उत्पादनासाठी उज्ज्वल भविष्य
सिरमा एसजीएसच्या लॅपटॉप असेंब्ली लाईनचे उद्घाटन हा भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रवासातील एक नवीन अध्याय आहे, ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि जागतिक दर्जाच्या उत्पादन क्षमता वाढतील. या सुविधेमुळे उत्पादन वाढेल, त्यामुळे भारत आयटी हार्डवेअर उत्पादनात जागतिक नेता बनण्यास सज्ज आहे.
आयटी हार्डवेअरसाठी पीएलआय 2.0 ची स्थिती
29 मे 2023 रोजी सुरू झालेल्या आयटी हार्डवेअरसाठीच्या उत्पादन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) 2.0 चा उद्देश पात्र कंपन्यांना 5% प्रोत्साहन देऊन भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्था अधिक मजबूत करणे, हा आहे.
या योजनेत लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल-इन-वन पीसी, सर्व्हर आणि अल्ट्रा-स्मॉल फॉर्म फॅक्टर डिव्हाइसेस यासारख्या उत्पादनांचा समावेश आहे. तीन हजार कोटी रूपयांच्या अंदाजित गुंतवणुकीसह, PLI 2.0 द्वारे साडेतीन लाख कोटी रूपयांचे उत्पादन वाढेल आणि देशभरात 47,000 नोकऱ्या निर्माण होतील अशी अपेक्षा आहे.
या योजनेने आधीच उल्लेखनीय प्रगती साधली आहे, एकूण 520 कोटी रूपयांची गुंतवणूक, 10000 कोटी रूपयांचे उत्पादन आणि 3900 नोकऱ्या निर्माण केल्या आहेत (डिसेंबर 2024).
* * *
M.Pange/Shraddha/Hemangi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2092131)
Visitor Counter : 37
Read this release in:
Odia
,
English
,
Khasi
,
Urdu
,
Hindi
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam