श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईपीएफओच्या भारतभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये केंद्रीकृत  पेन्शन पेमेंट प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित

Posted On: 03 JAN 2025 4:34PM by PIB Mumbai

 

निवृत्ती वेतन वितरण सेवेचा विस्तार करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत, ईपीएफओने डिसेंबर 2024 मध्ये कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत नवीन केंद्रीकृत निवृत्ती वेतन वितरण प्रणाली (सीपीपीएस) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली.

ईपीएफओच्या सर्व 122 पेन्शन वितरण क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर 2024 साठी सुमारे 1570 कोटी रुपये पेन्शन वितरित करण्यात आले. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीमचा (सीपीपीएस) पहिला प्रायोगिक उपक्रम ऑक्टोबर, 2024 मध्ये कर्नाल, जम्मू आणि श्रीनगर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात आला. यामध्ये 49,000 हून अधिक ईपीएस पेन्शनधारकांना सुमारे 11 कोटी रुपये पेन्शन वितरीत करण्यात आले.

दुसरा प्रायोगिक उपक्रम नोव्हेंबर 2024 मध्ये 24 प्रादेशिक कार्यालयांमध्ये हाती घेण्यात आला, ज्यामध्ये 9.3 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना सुमारे 213 कोटी रुपये पेन्शन वितरित करण्यात आले.

या यशाबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले, "ईपीएफओच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टमची (सीपीपीएस) संपूर्ण अंमलबजावणी हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. या परिवर्तनकारी उपक्रमामुळे पेन्शनधारकांना देशातील कोणत्याही बँकेतून, कोणत्याही शाखेतून, कोठेही विनाअडथळा पेन्शन मिळवता येईल. यामुळे प्रत्यक्ष पडताळणी भेटीची आवश्यकता दूर झाली असून, पेन्शन वितरण प्रक्रियेत सुलभता आली. सीपीपीएस हे ईपीएफओ सेवांचे आधुनिकीकरण करण्याच्या आणि आपल्या पेन्शनधारकांना  सुलभता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. ही सुविधा कार्यान्वित करून, आम्ही तंत्रज्ञान-स्नेही आणि सदस्य-केंद्रित ईपीएफओच्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून, पेन्शन सेवा वितरणात एक नवीन मानक स्थापित करत आहोत.

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2089961) Visitor Counter : 26