पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली कुवेतच्या अमीरांची भेट
Posted On:
22 DEC 2024 5:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर, महामहीम शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांची भेट घेतली. ही दोन्ही नेत्यांमधील पहिलीच औपचारिक भेट होती. बायान पॅलेसमध्ये आगमन झाल्यावर पंतप्रधानांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. कुवेतचे पंतप्रधान महामहीम अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांनी त्यांचे स्वागत केले.
यादरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि कुवेतमधील मजबूत, ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांवर चर्चा केली. तसेच द्विपक्षीय सहकार्य आणखी वाढवण्यासाठी व दृढ करण्यासाठी आपली पूर्ण वचनबद्धता व्यक्त केली. या अनुषंगाने, द्विपक्षीय संबंधांना ‘कूटनीतिक भागीदारी’च्या स्तरावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधानांनी कुवेतमध्ये असलेल्या दहा लाखांहून अधिक भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी महामहीम अमीर यांनी घेतलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. महामहीम अमीर यांनी कुवेतच्या विकासामध्ये भारतीय समुदायाने दिलेल्या मोठ्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पंतप्रधानांनी कुवेतच्या ‘व्हिजन 2035’ च्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या नव्या उपक्रमांचे कौतुक केले आणि यावर्षीच्या सुरुवातीला यशस्वीपणे झालेल्या जीसीसी शिखर परिषदेबद्दल महामहीम अमीर यांचे अभिनंदन केले. तसेच, काल झालेल्या अरेबियन गल्फ कपच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.
महामहीम अमीर यांनीही पंतप्रधानांच्या या भावनांना प्रतिसाद दिला आणि कुवेत व आखाती प्रदेशात भारताच्या महत्त्वपूर्ण भागीदारीबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच, कुवेतच्या व्हिजन 2035 च्या पूर्ततेसाठी भारताकडून आणखी मोठ्या योगदानाची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पंतप्रधानांनी महामहीम अमीर यांना भारत भेटीसाठी आमंत्रित देखील केले.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2087124)
Visitor Counter : 10