युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
डॉ.मनसुख मांडवीय यांनी फिट इंडिया सायकलिंग मोहीमेला दाखवला हिरवा झेंडा; देशभरात 1000 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन
Posted On:
17 DEC 2024 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2024
मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे आज सकाळी ‘फिट इंडिया सायकलिंग मोहीम ’ च्या प्रारंभासह फिट इंडिया चळवळीने निरोगी आणि हरित भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे, खासदार तेजस्वी सूर्या, तसेच पॅरिस पॅरालिम्पिक कांस्यपदक विजेती सिमरन शर्मा, राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील सुवर्णपदक विजेती नितू घनघस आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मधील कांस्यपदक विजेती प्रीती पवार उपस्थित होते.
नॅशनल स्टेडियम ते रायसिना हिल्स पर्यंत आणि परत मागे अशा या 3 किलोमीटरच्या सायकल प्रवासात सुमारे 500 उत्साही सायकलपटू सहभागी झाले होते , ज्याचा उद्देश सायकलिंगला स्थायी आणि आरोग्यदायी वाहतुकीचे साधन म्हणून प्रोत्साहन देणे हा होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा पुनरुच्चार करत डॉ. मांडविया म्हणाले, “2047 मध्ये आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करताना आपल्याला पंतप्रधानांचे विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारायचे आहे आणि त्यासाठी आपण पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त राष्ट्र बनायला हवे ."
सायकलिंगचे महत्त्व अधोरेखित करताना ते पुढे म्हणाले, “आम्ही हा कार्यक्रम ‘फिट इंडिया सायकलिंग मंगळवार’ म्हणून सुरू केला आहे, परंतु सायकलिंग प्रेमींच्या सोयीसाठी हा उपक्रम आता रविवारी आयोजित केला जाईल आणि आता ‘संडेज ऑन सायकल’ असे म्हटले जाईल. केवळ नवी दिल्लीतच नव्हे तर देशाच्या विविध भागांत डॉक्टर, पत्रकार, शिक्षक, कॉर्पोरेट व्यावसायिक आणि युवक रविवारी एक तासाच्या सायकल फेरीमध्ये सहभागी होतील. सायकलिंगमुळे पर्यावरणाला मोठी चालना मिळते, प्रदूषणावर हा उपाय आहे आणि शाश्वततेलाही यामुळे हातभार लागतो.”
देशभरातील 1000 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित आजचा कार्यक्रम, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या फिट इंडिया चळवळीने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया , माय भारत (MY Bharat) आणि विविध क्रीडा प्राधिकरणांच्या सहकार्याने आयोजित केला होता.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2085476)
Visitor Counter : 25