ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक (डॉ.) माणिक साहा आणि मेघालयचे मुख्यमंत्री श्री कॉनरॅड के. संगमा यांनी मुंबईतील ईशान्य प्रदेश व्यापार आणि गुंतवणूक रोड शो मध्ये सहभाग नोंदवत, लोकांना भारताच्या ईशान्य भागात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले
Posted On:
17 DEC 2024 2:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2024
ईशान्य राज्य क्षेत्र विकास मंत्रालयाने (MDoNER) मुंबईत ईशान्य व्यापार आणि गुंतवणूक रोड शोचे आयोजन केले होते.भारतातील प्रमुख शहरांमध्ये वर्षभर चाललेल्या रोड शोच्या मालिकेनंतर, मुंबईत झालेल्या रोड शोने भारताच्या या आर्थिक केंद्रात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाला, केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे मंत्री (MDoNER) ज्योतिरादित्य एम. सिंधिया, त्रिपुराचे मुख्यमंत्री प्राध्यापक(डॉ.) माणिक साहा आणि मेघालयचे मुख्यमंत्री, कॉनरॅड के. संगमा, ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे सचिव,चंचल कुमार आणि सहसचिव, मोनालिसा डॅश, यांच्यासह पूर्वोत्तर राज्यांतील वरिष्ठ सरकारी अधिकारी, तसेच वरिष्ठ प्रतिनिधींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाअंतर्गत आणि त्या प्रदेशातील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ईशान्य भारतात होत असलेल्या परिवर्तनाची प्रशंसा केली, ज्यांच्या दूरदृष्टी आणि वचनबद्धतेमुळे गेल्या काही दशकांत या प्रदेशात महत्त्वपूर्ण बदल घडून आले आहेत. 11%जीडीपी अशा प्रभावी विकास दरासह आता भारताच्या विकासात योगदान देण्यास तयार असलेल्या या प्रदेशाच्या अफाट क्षमतेवर मंत्रीमहोदयांनी भर दिला.पायाभूत सुविधा, मानव संसाधन आणि विशेष क्षेत्रांच्या विकासासह ईशान्य भारत आता राष्ट्राचे भविष्य घडविण्यातील प्रमुख भागिदार म्हणून स्थान मिळवत आहे. या प्रदेशाच्या वैशिष्ट्यपूर्ण लाभांवर प्रकाश टाकताना, त्यांनी अधोरेखित केले की आग्नेय आशियाई बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी ईशान्य हे प्रवेशद्वार आहे.विकास आणि नाविन्यपूर्णतेसाठी एक अखंड मार्ग सुनिश्चित करत, मुंबई आणि ईशान्य भारत यातील विकसित होत असलेल्या व्यावसायिक परिसंस्था यांच्यात पूल बांधण्याच्या महत्त्वावर माननीय केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला.त्यानंतर पर्यटन, अक्षय ऊर्जा, क्रीडा आणि आयटी यासह विविध क्षेत्रांतील प्रगतीच्या रूपरेषेची मांडणी सिंधिया यांनी केली आणि या प्रदेशाच्या विकासासाठी गुणवत्ता-आधारित दृष्टीकोनावर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर भर दिला.त्यांनी गुंतवणूकदारांना आश्वासन दिले, की या प्रदेशातील युवा वर्ग, उच्च साक्षरता दर आणि विपुल नैसर्गिक संसाधने हे सर्व शाश्वत शेती, उत्पादन आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात विशेष करून गुंतवणुकीसाठी एक आदर्श क्षेत्र बनवतात. व्यवसाय वाढीस समर्थन देण्यासाठी धोरणे आणि लाल फितीचा कारभार कमी करण्याच्या वचनबद्धतेसह, ईशान्य भारत आता गुंतवणूकदारांचे स्वागत करत आहे, जे भारताच्या विशेषतः तरुणांच्या विकासास हातभार लावेल. आपल्या समारोपाच्या भाषणात त्यांनी गुंतवणूकदारांना ईशान्येकडील प्रदेशासाठी आमंत्रित केले आणि या प्रदेशाचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले.
केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाचे (MDoNER) सचिव चंचल कुमार यांनी या क्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे या प्रदेशाची झालेली उल्लेखनीय प्रगती अधोरेखित केली. या प्रदेशाचे जीडीपीतील (GDP) योगदान 2.9% आहे, तरीही ईशान्य क्षेत्राचा संयुक्त वार्षिक विकास दर (CAGR) राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे,असे ही त्यांनी नमूद केले.
ईशान्य प्रदेश गुंतवणूक परीषदेच्या (नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट) परीषदपूर्व उपक्रमांचा एक भाग म्हणून, विविध राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रोड शो,गोलमेज बैठका,चर्चासत्रांसह विविध उपक्रम आयोजित केले गेले आहेत,ज्यात संभाव्य गुंतवणूकदारांनी लक्षणीय रस घेतला आहे.
मुंबई रोड शोच्या वेळी,अनेक B2G बैठका घेत, ईशान्य प्रदेशात संभाव्य गुंतवणूक निर्माण करण्यासाठी संधी निर्माण केल्या आहेत.
S./Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2085200)
Visitor Counter : 27