पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण  साहित्याच्या संपादित ग्रंथखंडांच्या   प्रकाशन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 11 DEC 2024 4:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली - दि. 11 डिसेंबर, 24

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत जी, राव इंद्रजित सिंह जी, एल. मुरूगन जी, आणि या कार्यक्रमाचे केंद्रबिदू साहित्याचे सेवक सीनी विश्वनाथन जी, प्रकाशक व्ही. श्रीनिवासन जी, उपस्थित सर्व विद्वान मान्यवर, महिला आणि सद्गृहस्थ हो...!

आज देशाचे महाकवी सुब्रमण्यम भारती जी, यांची जयंती साजरी होत आहे. मी सुब्रमण्यम भारती जी यांना श्रद्धापूर्वक  वंदन करतो. त्यांना आपली श्रद्धांजली अर्पण करतो. आज भारताच्या संस्कृती आणि साहित्यासाठीभारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील स्मृतीच्या दृष्टीने आणि तामिळनाडूच्या गौरवासाठी एक खूप मोठा दिवस आहे. महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या कार्याचे , त्यांच्या साहित्यकृतींचे  प्रकाशन म्हणजे, एक खूप मोठा सेवायज्ञ आहे  आणि या  खूप मोठ्या साधनेला आज पूर्णाहूती दिली जात  आहे. 21 खंडांमध्ये ‘कालवरिसैयिल भारतियार पडैप्पुगळ्‘चे संकलन सहा दशकांच्या अथक परिश्रमाचे हे साहस, असामान्य आणि अभूतपूर्व आहे. सीनी विश्वनाथन यांचा हा जो समर्पणाचा भाव आहे, त्यांची ही साधना आहे, हे त्यांनी केलेले परिश्रम आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की, आगामी पिढ्यांना, त्यांच्या कार्याचा खूप मोठा लाभ मिळणार आहे. आपण कधी कधी एक शब्द ऐकत होतो. ‘वन लाइफ , वन मिशन’! परंतु वन लाइफ वन मिशन नेमके असते तरी काय, हे सीनी यांनी दाखवून दिले. त्यांनी केलेली ही खूप मोठी साधना आहे. त्यांची तपस्या पाहून आज मला महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांचे स्मरण झाले. त्यांनीही आपल्या आयुष्यातील 35 वर्षे धर्मशास्त्राचा इतिहासाचे लेखन करण्यामध्ये खर्च केले. मला विश्वास आहे, सीनी विश्वनाथन यांचे हे काम अकादमीच्या जगतामध्ये एक ‘बेंच-मार्क’ निश्चित करणारे ठरेल. मी या कार्यासाठी विश्वनाथन जी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रांनो,

‘‘कालवरिसैयिल भारतियार पडैप्पुगळ्‘‘ च्या 21 खंडांमध्ये केवळ भारतियार  जी यांच्या साहित्यरचनाच आहेत असे नाही, तर त्यांच्या अनेक साहित्यामागच्या पूर्वपिठीकेची माहिती, आणि त्या साहित्याचे तत्वज्ञानात्मक विश्लेषणही देण्यात आले आहे, असे मला सांगण्यात आले आहे. प्रत्येक खंडांमध्ये भाष्य, विवरण आणि टीका यांना स्थान देण्यात आले आहे. यामुळे भारतीजींचे विचार सखोल जाणून घेण्यास मोठी मदत मिळेल. त्याचबरोबर हे संकलन संशोधक, अभ्यासक यांच्यासाठी, विव्दानांसाठी खूप मदतगार ठरेल.

मित्रांनो,

आज गीता जयंतीचा पवित्र दिवस आहे. सुब्रमण्यम भारती यांना गीतेविषयी खूप आस्था होती आणि त्यांच्याकडे  सखोल गीताज्ञानही होते. त्यांनी गीतेचा तमिळमध्ये अनुवाद केला. गीतेची सुगम आणि सोपी व्याख्याही केली. आणि आजच्या गीता जयंतीदिनी सुब्रमण्यम भारती यांच्या साहित्य कार्याच्या संपादित ग्रंथांचे प्रकाशन होत आहे, हा योगायोग म्हणजे  एकप्रकारे त्रिवेणीसंगम आहे.  या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आणि सर्व देशवासियांना गीता जयंतीच्या हार्दिक सदिच्छाही देतो.

मित्रांनो,

आपल्या देशामध्ये शब्दांनाच केवळ अभिव्यक्ती मानली जात नाही. आपण अशा संस्कृतीचा एक भाग आहोत की, त्यामध्ये ‘शब्द ब्रह्म‘ची चर्चा केली जाते. शब्दांच्या अमर्याद सामर्थ्याची चर्चा होते. म्हणूनच ऋषी आणि मुनींचे शब्द म्हणजे केवळ त्यांचे विचार नसतात. हे त्यांचे चिंतन, त्यांचे अनुभव आणि त्यांच्या साधनेचे सार असते. त्यांच्यामधील असामान्य चैतन्याचे सार आत्मसात करणे आणि ते पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित करणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आज अशा पद्धतीच्या संकलनाचे जितके महत्व आधुनिक संदर्भामध्ये आहे, आपल्या परंपरेमध्येही त्याचे  तितकेच औचित्य आहे. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर, आपल्याकडे भगवान व्यासांनी रचलेल्या कितीतरी रचनांना मान्यता आहे. त्या रचना आजही आपल्याकडे उपलब्ध आहेत. कारण त्या पुराणांची एक व्यवस्था या स्वरूपामध्ये संकलित आहेत. याच प्रमाणे ‘कम्प्लिट वर्क ऑफ स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्ज अॅंड स्पीच, दीनदयाळ उपाध्याय यांचे संपूर्ण वांड्.गमय, आधुनिक काळातील या संकलनामुळे आपल्या समाजाला आणि अकादमीमध्ये कार्यरत लोकांना खूप उपयोग होत आहे. अलिकडेचम्हणजे गेल्यावर्षी ज्यावेळी मी पापुआ न्यू गिनी येथे गेलो होतो, त्यावेळी तिथल्या स्थानिक टोक पिसिन भाषेमध्ये ‘थिरूक्कुरल‘चे प्रकाशन करण्याचे सद्भाग्य मला मिळाले. याआधी इथेच, लोक कल्याण मार्गावर, मी गुजरातीमध्ये केलेला ‘थिरूक्कुरल’च्या अनुवाद कार्याचे लोकार्पण केले होते.

मित्रांनो,

देशाच्या ज्या आवश्यकता आहेतत्या जाणून घेवून त्यानुसार काम करणारे सुब्रमण्यम भारती होते. या महान मनीषीची- महापुरूषाची दूरदृष्टी खूप  व्यापक होती. त्यांच्या कालखंडामध्ये देशाला ज्या ज्या क्षेत्रात गरज होती, अशा प्रत्येक क्षेत्रात, अगदी सर्व दिशांनी  त्यांनी काम केले. भारतियार केवळ तमिळनाडू आणि तमिळ भाषा यांचाच ठेवा नाहीत. ते एक असे विचारक होते कीत्यांचा प्रत्येक श्वास भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित होता. भारताचा उत्कर्ष, भारताचा गौरव- अभिमान हे त्यांचे स्वप्न होते. आमच्या सरकारने भारतियारजी यांचे  योगदान लोका-लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जितके शक्य आहेतितके प्रयत्न कर्तव्य भावनेने केले आहेत.  2020 च्या कोविड महामारीच्या अवघड काळामध्ये संपूर्ण जगापुढे संकट आले होते. तरीही आम्ही सुब्रमण्यम भारती यांच्या  100 वी पुण्यतिथी निमित्‍त मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम केला  होता. आंतरराष्ट्रीय भारती महोत्सवाचा मी स्वतःही एक भाग बनलो होतो. देशामध्ये लाल किल्ल्याचा बुरूज असो अथावा जगातील इतर  कोणताही  दुसरा देश, मी सातत्याने भारताच्या दूरदृष्टीविषयीचे विचार हे महाकवी भारती यांच्या विचाराच्या माध्यमातून अवघ्या जगासमोर मांडले आहेत. आणि आत्ताच  सीनी  विश्वनाथन यांनीही  उल्लेख केला की, जगामध्ये मी जिथे जिथे गेलो आहे, तिथे तिथे मी भारतीजी यांच्याविषयी चर्चा केली आहे. माझ्या त्या कार्याचे गौरवगान सीनी यांनी केले आहे. आणि आपण सर्वजण जाणून आहात  की, माझ्या आणि सुब्रमण्यम भारती यांच्यामध्ये एक जीवंत कडी आहे. एक आत्मिक कडी आमची काशीही आहे. माझ्या काशीबरोबर त्यांचे नाते होते. त्यांनी काशीमध्ये व्यतित केलेला त्यांचा कालखंड म्हणजे काशीचा अमूल्य वारसा, काशीचा एक हिस्सा बनला आहे. ते काशीमध्ये ज्ञान प्राप्त करण्यासाठी आले आणि ते तिथलेच झाले. त्यांच्या परिवारातील काही सदस्य आजही काशीमध्ये वास्तव्य करीत आहेत. आणि माझे सद्भाग्य म्हणजे, माझा त्यांच्याशी संपर्कही आहे. असे सांगतात की, आपल्या भारदार मिशा ठेवण्याची प्रेरणाही भारतियार यांना काशीमध्ये वास्तव्य करताना मिळाली होती. भारतियार यांनी आपल्या अनेक शब्दरचना गंगेच्या किनारी वास्तव्य करीत असताना लिहिल्या होत्या. म्हणूनच आज मी त्यांच्या शब्द संकलनाच्या या पवित्र कार्याचे काशीचा खासदार म्हणूनही स्वागत करतो, अभिनंदन करतो.  बीएचयू म्हणजेच बनारस हिंदू विद्यापीठामध्ये  महाकवी भारतियार यांच्या योगदानाला समर्पित एका अध्यासनाची स्थापना करण्याचे काम करता आले, ही गोष्ट आमच्या सरकारच्या दृष्टीने  सद्भाग्याची आहे, असे मी मानतो.

मित्रांनो,

सुब्रह्मण्य भारती यांच्यासारखे व्यक्तिमत्व शतकांमधून क्वचितच पाहायला मिळते. त्यांचे चिंतन, त्यांची प्रतिभा, त्यांचे बहु-आयामी व्यक्तिमत्व, आज कोणालाही स्तिमित करणारे आहे. केवळ 39 वर्षांच्या जीवनात भारतीजींनी आपल्याला इतके काही शिकवले आहे, ज्याचे आकलन करण्यात विद्वानांचे आयुष्य निघून जाईल. 39 वर्षांचे त्यांचे आयुष्य असले तरी त्याचा प्रभाव सहा दशकांवर राहिला. बालपणी खेळण्या-बागडण्याच्या वयात ते देशप्रेमाची भावना जागवत होते. एकीकडे ते अध्यात्माचे साधक देखील होते दुसरीकडे आधुनिकतेचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या रचनांमध्ये निसर्गाविषयीचे प्रेम देखील पाहायला मिळते आणि उज्ज्वल भविष्याची प्रेरणा देखील दिसते. स्वातंत्र्य संग्रामादरम्यान त्यांनी स्वातंत्र्याची केवळ मागणीच केली नाही तर समस्त भारतीय जनमानसाला स्वतंत्र होण्यासाठी जागे केले होते. आणि ही खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल. त्यांनी देशवासियांना सांगितले होते...., मी तमिळमध्ये बोलायचा प्रयत्न करतो. उच्चारांमध्ये काही चूक असल्यास तुम्ही सर्व विद्वदजनांनी मला क्षमा करावी. महाकवी भारतियार म्हणाले होते

एन्रु तणियुम्, इन्द सुदन्तिर,दागम्। एन्रु मडियुम् एंगळ् अडिमैयिऩ्मोगम्।

म्हणजेच, स्वातंत्र्याची ही तहान कधी भागणार? गुलामगिरीचा आमचा हा मोह कधी संपणार? म्हणजेच त्या काळी असा देखील एक वर्ग होता ज्याला गुलामगिरीचा देखील मोह होता. त्यांच्यावर हे ताशेरे ओढले आहेत... गुलामगिरीचा हा मोह कधी संपेल? हे आवाहन तीच व्यक्ती करू शकते जिच्यामध्ये आत्मपरीक्षण करण्याचे धाडस देखील असेल आणि  जिंकण्याचा विश्वास देखील असेल. हेच भारतियार यांचे वैशिष्ट्य होते. ते रोखठोक बोलायचे, समाजाला दिशा दाखवायचे. पत्रकारितेच्या क्षेत्रात देखील त्यांनी अद्भुत कार्य केले. 1904 मध्ये स्वदेशमित्रन या तमिळ वर्तमानपत्रासाठी त्यांनी काम केले. मग1906 मध्ये लाल कागदावर इंडिया नावाच्या साप्ताहिकाची छपाई सुरू केली.  तमिळनाडूत राजकीय व्यंगचित्रे छापणारे हे पहिले वर्तमानपत्र होते. समाजातील दुर्बल आणि वंचित लोकांच्या मदतीसाठी ते समाजाला प्रेरित करत असायचे. कण्णन पाट्टु या त्यांच्या कविता संग्रहात त्यांनी भगवान श्रीकृष्णाची 23 रूपांमध्ये कल्पना केली आहे. आपल्या एका कवितेत ते सर्वात गरजू लोकांसाठी कपड्यांची भेट मागत आहेत. अशा प्रकारे ते त्या लोकांपर्यंत संदेश पोहोचवत होते ज्यांच्यामध्ये दानधर्म करण्याची क्षमता आहे. परोपकाराच्या प्रेरणेने भरलेल्या त्यांच्या कवितांमधून आपल्याला आजही प्रेरणा मिळते.

मित्रांनो,

भारतियार आपल्या काळापेक्षा खूपच पुढचे पाहणारे, भविष्याला जाणून घेणारे व्यक्ती होते. त्या काळात देखील,जेव्हा समाज इतर समस्यांमध्ये गुंतलेला होता, भारतियार युवा आणि महिला सक्षमीकरणाचे खंदे पुरस्कर्ते होते. भारतियार यांना विज्ञान आणि नवोन्मेषात देखील प्रचंड विश्वास होता. त्यांनी त्या काळात देखील कम्युनिकेशनची संकल्पना मांडली होती जी अंतर कमी करून संपूर्ण देश जोडण्याचे काम करेल आणि आज आपल्या जीवनात ज्या तंत्रज्ञानाचा अवलंब आपण करत आहोत, त्या तंत्रज्ञानाची चर्चा भारतीयार जींनी त्या काळात केली होती. ते म्हणाले होते -

"काशी नगर,पुलवर पेसुम्,उरै तान् ॥ कांचियिल्, केट्पदर्कोर्,करुवि चेय्वोम ॥

म्हणजेच एक असे उपकरण पाहिजे ज्यांच्या मदतीने काशीमध्ये बसल्या बसल्या बनारसचे संत काय सांगतात हे ऐकता आले पाहिजे. आज आपण हे स्वतः पाहात आहोत की डिजिटल इंडिया कशा प्रकारे या स्वप्नांना प्रत्यक्षात आणत आहे. भाषिणीसारख्या ऍपने आपण सर्व प्रकारच्या समस्या संपुष्टात आणल्या आहेत. जेव्हा भारताच्या प्रत्येक भाषेविषयी सन्मानाची भावना असेल, जेव्हा भारताच्या प्रत्येक भाषेचा गौरव होईल, जेव्हा भारताच्या प्रत्येक भाषेच रक्षण करण्याचा हेतू प्रामाणिक असेल, तर अशाच प्रकारे प्रत्येक भाषेच्या सेवेसाठी काम होते.

मित्रांनो,

महाकवी भारती जींचे साहित्य जगातील सर्वात प्राचीन तमिळ भाषेसाठी एका वारशाप्रमाणे आहे. आणि आम्हाला अतिशय अभिमान आहे की जगातील सर्वात प्राचीन भाषा आमची तमिळ भाषा आहे. ज्यावेळी आपण त्यांच्या साहित्याचा प्रसार करतो तेव्हा आपण तमिळ भाषेची सेवा करत असतो. जेव्हा आपण तमिळ भाषेची सेवा करतो तेव्हा आपण या देशाच्या सर्वाधिक प्राचीन वारशाची देखील सेवा करतो.

बंधू भगिनींनो,

गेल्या 10 वर्षांत देशाने तमिळ भाषेच्या गौरवासाठी समर्पित भावनेने काम केले आहे. मी संयुक्त राष्ट्रात तमिळ भाषेचा गौरव संपूर्ण जगासमोर सादर केला होता. आम्ही जगभरात थिरुवल्लवर कल्चरल सेंटर्सही उघडत आहोत. एक भारत श्रेष्ठ भारतच्या भावनेत सुब्रह्मण्य भारती यांच्या विचारांचे प्रतिबिंब आहे.भारतियार यांनी नेहमीच देशाच्या विविध संस्कृतींना जोडणाऱ्या विचारसरणीला बळकट केले. आज काशी तमिळ संगमम् आणि सौराष्ट्र तमिळ संगमम् सारखे महोत्सव हेच काम करत आहेत. यामुळे देशभरातील लोकांमध्ये तमिळविषयी जाणून घेण्याची शिकण्याची उत्सुकता वाढू लागली आहे. तमिळनाडूच्या संस्कृतीचा प्रचार देखील होत आहे. देशाच्या प्रत्येक भाषेला प्रत्येक देशवासी आपली भाषा मानेल, प्रत्येक भाषेचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असेल, हा आमचा संकल्प आहे. आम्ही तमिळसारख्या भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी मातृभाषेतून उच्च शिक्षणाचा पर्याय देखील युवा वर्गाला दिला आहे.

मित्रांनो,

मला खात्री आहे, भारती जींचे साहित्य संकलन तमिळ भाषेच्या प्रचार-प्रसाराशी संबंधित आमच्या या प्रयत्नांना चालना देईल. आपण सर्व एकत्रितपणे विकसित भारताच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू, भारतियार यांची स्वप्ने पूर्ण करू शकू. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे या संकलनासाठी आणि प्रकाशनासाठी अभिनंदन करतो. आणि मी पाहात होतो या वयामध्ये तामिळनाडूत राहणे आणि दिल्लीच्या थंडीत आवाज बघा किती मोठे भाग्य आहे आणि जीवन किती तपस्येने जगले असतील आणि मी त्यांचे हस्ताक्षर पाहात होतो. इतके सुंदर हस्ताक्षर आहे. या वयात आम्ही हस्ताक्षर करताना देखील हलत असतो. खऱ्या अर्थाने तुमची ही साधना आहे, तुमची तपश्चर्या आहे. मी तुम्हाला संपूर्ण श्रद्धेने नमस्कार करतो. तुम्हा सर्वांना वणक्कम,खूप-खूप धन्यवाद!

***

S.Tupe/S.Bedekar/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2084384) Visitor Counter : 19