राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने आयोजित केलेल्या मानवी हक्क दिन समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित
मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून आपण आपल्या राष्ट्राला परिभाषित करणाऱ्या न्याय, समानता आणि प्रतिष्ठेच्या मूल्यांप्रति असलेल्या आपल्या सामूहिक बांधिलकीला उजाळा दिला पाहिजे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
10 DEC 2024 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (10 डिसेंबर, 2024) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाद्वारे आयोजित मानवी हक्क दिनाच्या समारंभाला उपस्थित राहून संबोधित केले. भारताने आपला 5,000 वर्षांहून जुना सांस्कृतिक वारसा जपत सहानुभूती, करुणा आणि सुसंवादी समुदायातील व्यक्तींमधील परस्परसंबंध या मूल्यांचे समर्थन केले आहे. या मूल्यांवर भर देत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य मानवी हक्क आयोग यांसारख्या संस्था, नागरी संस्था, मानवी हक्काचे पुरस्कर्ते आणि विशेष प्रतिनिधींच्या सहाय्याने सर्वांसाठी मानवी हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. समाजातील उपेक्षितांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी धोरणात्मक बदलांची शिफारस करणे, हक्कांच्या उल्लंघनाविरोधात लढा देणे, जनजागृती करणे यात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने बजावलेल्या सक्रिय भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.
सर्व नागरिकांच्या नागरी आणि राजकीय हक्कांच्या रक्षणाची हमी देण्याच्या वचनबद्धतेवर भारत ठाम आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. केंद्र सरकार अनेक सामाजिक - आर्थिक आणि सांस्कृतिक अधिकारांची हमी देत असून त्यांचा विस्तार, सर्वांसाठी घरे, शुद्ध पेयजल, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि सर्वांसाठी शिक्षण, वीज, स्वयंपाकाचा गॅस, आर्थिक सेवा, आरोग्य सेवा आणि शिक्षणापर्यंत झाला आहे. मूलभूत गरजांची तरतूद ही हक्काची बाब म्हणून पाहिली जाते.
आपण जसजशी प्रगती करत आहोत, तसतसे आपल्याला निरनिराळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. सायबरगुन्हे आणि हवामान बदल हे मानवी हक्कांसमोरील नवीन धोके आहेत. डिजिटल युग हे परिवर्तनकारी असले तरी त्याबरोबर सायबर बुलिंग, डीपफेक, गोपनीयतेची चिंता आणि चुकीच्या माहितीचा प्रसार यांसारख्या काही जटिल समस्यांचा उगम झाला आहे. ही आव्हाने प्रत्येक व्यक्तीचे अधिकार आणि प्रतिष्ठेचे रक्षण करणाऱ्या एका सुरक्षित आणि न्याय्य डिजिटल वातावरणाला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित करतात.
कृत्रिम बुद्धिमत्तेने आता आपल्या दैनंदिन जीवनात प्रवेश केला असून त्यामुळे अनेक समस्यांचे निराकरण होत असले तरी कित्येक नवीन समस्या देखील उद्भवतात.आतापर्यंत मानवी हक्कांचा भर मानव विश्वात घडणाऱ्या गोष्टींवर केंद्रित आहे, म्हणजेच करुणा आणि अपराधीपणासारख्या मानवी भावना असलेला आणि या हक्कांचे उल्लंघन करणारा माणूस आहे असे गृहीत धरले जाते. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये अपराधी हा माणूस नसून मानवेतर बुद्धिमान एजंट असू शकतो.
राष्ट्रपती म्हणाल्या की, हवामान बदल आपल्याला जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या विचारांची समीक्षा करण्यास भाग पाडत आहे. वेगळ्या ठिकाणचे आणि वेगळ्या काळातील प्रदूषण करणारे घटक हे दुसऱ्या ठिकाणच्या आणि दुसऱ्या काळातील लोकांच्या जीवनावर परिणाम करत आहेत. ‘ग्लोबल साउथ’ चा आवाज या नात्याने भारताने हवामानविषयक कृतीमध्ये योग्यरित्या नेतृत्व केले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, विशेषत: आपल्या मुलांसाठी आणि तरुणांसाठी अलिकडच्या वर्षांत मानसिक आरोग्य ही एक महत्त्वाची समस्या बनली आहे,. त्यांनी सर्व संबंधितांना आवाहन केले की, आपल्या मुलांना आणि तरुणांना प्रभावित करणाऱा तणाव दूर करण्यासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात. वाढत्या ‘गिग इकॉनॉमी’चा कामगारांच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी उद्योग -व्यवसाय क्षेत्रातील धुरीणांना आवाहन केले. आपण नवीन आर्थिक मॉडेल स्वीकारत असताना, सर्व व्यक्तींचे, विशेषत: असुरक्षित क्षेत्रातील लोकांचे कल्याण हे प्राधान्य राहील याची आपण खात्री केली पाहिजे. मानसिक आजाराशी संबंधित कोणताही कलंक काढून टाकण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि गरज असलेल्यांना मदत करण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे,असे राष्ट्रपती म्हणाल्या.
राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, मानवाधिकार दिनानिमित्त आपण आपल्या राष्ट्राविषयीच्या न्याय, समानता आणि सन्मान या मूल्यांप्रति , आपल्या सामूहिक बांधिलकीचा नव्याने व्यापक विचार केला पाहिजे. आपण आपल्या काळातील आव्हानांना तोंड देत असताना, आपण प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत हक्क जपले पाहिजेत आणि कोणीही मागे राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. राष्ट्रपती मुर्मू यांनी पुढे सांगितले की, एकत्रितपणे, सतत प्रयत्न आणि एकता याद्वारे, आपण असे भविष्य घडवू शकतो ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती, वय, पार्श्वभूमी किंवा परिस्थिती काहीही असो, सन्मानाचे, संधीचे आणि परिपूर्णतेचे जीवन जगण्यासाठी सक्षम असेल.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
S.Kane/B.Sontakke/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2082892)
Visitor Counter : 24