पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्‌घाटन


पंतप्रधानांनी यानिमित्ताने एका टपाल तिकिटाचे केले अनावरण

ईशान्य प्रदेश ही भारताची 'अष्टलक्ष्मी' आहे : पंतप्रधान

अष्टलक्ष्मी महोत्सव हा ईशान्य प्रदेशाच्या उज्वल भविष्याचा उत्सव आहे. हा महोत्सव विकासाची नवी पहाट आहे, जी विकसित भारताच्या मिशनला गती देणार आहे : पंतप्रधान

आम्ही ईशान्य भागाला भावना, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणशास्त्र या त्रिवेणीने जोडत आहोत : पंतप्रधान

Posted On: 06 DEC 2024 10:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचे स्वागत करताना मोदी यांनी डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस असल्याचे नमूद केले.  बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाली असून ती  सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले.

मोदी यांनी भारताच्या  सर्व नागरिकांच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

भारत मंडपम जी 20 बैठकीच्या यशस्वी आयोजनासह गेल्या 2 वर्षात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचा साक्षीदार राहिला आहे  असे नमूद करत  मोदी यांनी आजचा कार्यक्रम अधिक विशेष असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की या कार्यक्रमामुळे संपूर्ण दिल्ली ईशान्य भारताच्या विविध छटांनी उजळून निघाली. पहिला अष्टलक्ष्मी महोत्सव पुढील 3 दिवस साजरा केला जाईल, असे सांगून मोदी म्हणाले की, हा कार्यक्रम संपूर्ण ईशान्य भारताची क्षमता देशाला आणि जगाला दाखवेल.

ते पुढे म्हणाले की या कार्यक्रमात अनेक व्यावसायिक करार होतील आणि संस्कृती, पाककृती आणि इतर आकर्षणांसह ईशान्येकडील विविध उत्पादने देखील प्रदर्शित होतील. ते पुढे म्हणाले की, हा कार्यक्रम उपस्थित असलेल्या पद्म पुरस्कार विजेत्यांसह विविध कर्तृत्ववान व्यक्तींच्या यशातून   लोकांना प्रेरणा देईल. हा कार्यक्रम अनोखा आणि अशा प्रकारचा पहिला कार्यक्रम असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, हा कार्यक्रम ईशान्य भारतात मोठ्या गुंतवणुकीच्या संधींची दारे खुली करेल. जगभरातील गुंतवणूकदारांसह शेतकरी, कामगार आणि कारागीर यांच्यासाठी ही एक उत्तम संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात आयोजित  प्रदर्शनांमुळे ईशान्य भारतातील विविधता आणि क्षमता प्रदर्शित झाल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी  अष्टलक्ष्मी महोत्सवाचे आयोजक, ईशान्य भारतातील लोकांचे  आणि गुंतवणूकदारांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 100 ते 200 वर्षांमध्ये प्रत्येकाने पाश्चात्य जगाचा उदय पाहिला आहे आणि आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा प्रत्येक स्तरावर पाश्चात्य क्षेत्राचा जगावर प्रभाव राहिला आहे. ते पुढे म्हणाले की भारतानेही  आपल्या विकासगाथेत पाश्चिमात्य क्षेत्राचा प्रभाव आणि त्याची   भूमिका पाहिली आहे. पश्चिम केंद्री कालखंडानंतर  21 वे शतक हे पूर्वेचे म्हणजेच आशिया आणि भारताचे आहे,असे पंतप्रधान म्हणले.  आगामी काळात भारताच्या विकासाची गाथा पूर्व भारत आणि विशेषतः ईशान्येकडील प्रदेश लिहील असा ठाम विश्वास मोदी यांनी  व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, गेल्या काही दशकांमध्ये भारताने मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद यासारख्या मोठ्या शहरांचा उदय पाहिला आहे. आगामी  दशकांमध्ये भारताला गुवाहाटी, आगरतळा, इंफाळ, इटानगर, गंगटोक, कोहिमा, शिलाँग आणि आयझॉल सारख्या शहरांची नवीन क्षमता दिसेल आणि त्यात अष्टलक्ष्मी सारख्या कार्यक्रमांचा मोठा वाटा असेल यावर मोदी यांनी  भर दिला.

भारतीय परंपरेचा उल्लेख  करताना पंतप्रधान म्हणाले की, देवी लक्ष्मीला सुख, आरोग्य आणि समृद्धीची देवी म्हटले जाते. देवी लक्ष्मीची आठ रूपे नमूद करत ते पुढे म्हणाले की जेव्हा लक्ष्मीची पूजा केली जाते तेव्हा या सर्व आठ रूपांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे भारताच्या ईशान्य भागात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम या आठ राज्यांच्या अष्टलक्ष्मी अस्तित्वात असल्याचे मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ईशान्येतील ही  आठ राज्ये  अष्टलक्ष्मीच्या आठ रूपांचे प्रतिनिधित्व करतात.

आदि लक्ष्मी हे अष्टलक्ष्मीचे पहिले रूप  असून ईशान्येकडील प्रत्येक राज्यात आदि संस्कृती पसरलेली आहे असे मोदी म्हणाले. ईशान्येकडील प्रत्येक राज्य स्वत:च्या परंपरा आणि संस्कृतीला धरून महोत्सव साजरे करते असे पंतप्रधानांनी सांगितले. मेघालयचा चेरी ब्लॉसम, नागालँडचा हॉर्नबिल, अरुणाचल प्रदेशचा ऑरेंज, मिझोरामचा चपचर कुट, आसामचा बिहू, मणिपुरी नृत्य अशी महोत्सवांची यादी देत ते म्हणाले की ईशान्य भारतात इतकी मोठी विविधता आहे.

देवी लक्ष्मीचे  दुसरे  रूप  - धन लक्ष्मी याविषयी पंतप्रधानांनी चर्चा केली. ईशान्येला खनिजे, तेल, चहाच्या बागा आणि जैवविविधतेचा उत्तम संगम असलेल्या विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान आहे. अक्षय ऊर्जेची प्रचंड क्षमता आहे. धन लक्ष्मीचा हा आशीर्वाद संपूर्ण ईशान्येसाठी वरदान आहे, असे त्यांनी सांगितले.

देवी लक्ष्मीचे तिसरे रूप आहे - धान्य लक्ष्मी. या देवीची ईशान्येवर कृपादृष्टी होती असे मोदी म्हणाले. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती आणि भरड धान्य यासाठी ईशान्य भाग प्रसिद्ध आहे. सिक्कीम हे भारतातील पहिले संपूर्ण सेंद्रिय राज्य असल्याचा भारताला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. ईशान्येतील तांदूळ, बांबू, मसाले आणि औषधी वनस्पती तिथल्या समृद्ध शेतीची साक्ष देतात, अशी टिप्पणी मोदींनी केली. आज जगाला निरोगी जीवनशैली आणि पोषणाशी संबंधित उपाययोजना देण्याची भारताला इच्छा असून त्यात  ईशान्येतील राज्यांची मोठी भूमिका आहे, असे मोदी म्हणाले.

अष्टलक्ष्मीचे चौथे रूप – गजलक्ष्मीचेही  मोदी यांनी  वर्णन केले. देवी गजलक्ष्मी कमळावर विराजमान असून  तिच्याभोवती हत्ती दर्शवले जातात, अशी माहिती त्यांनी दिली. ईशान्येकडे विस्तीर्ण जंगले, काझीरंगा, मानस-मेहाओ सारखी राष्ट्रीय उद्याने आणि इतर वन्यजीव अभयारण्ये आहेत, ईशान्येत अप्रतिम गुहा आणि आकर्षक तलाव आहेत, असे ते म्हणाले. ईशान्येला जगातील सर्वात प्रेक्षणीय पर्यटन स्थळ बनवण्याची ताकद गजलक्ष्मीच्या आशीर्वादात आहे, असे ते पुढे म्हणाले.

ईशान्य भारत सर्जनशीलता आणि कौशल्यासाठी ओळखले जाते. अष्टलक्ष्मीचे पाचवे रूप - संतन लक्ष्मी, ज्याचा अर्थ उत्पादकता आणि सर्जनशीलता आहे. आसामची मुगा सिल्क, मणिपूरची मोइरांग फी, वानखेई फी, नागालँडची चकेशांग शाल यासारख्या हातमाग वस्तू आणि हस्तकलेचे कौशल्य सर्वांची मने जिंकेल, असेही ते म्हणाले. असे डझनभर भौगोलिक संकेत (GI) टॅग केलेली उत्पादने ईशान्येकडील हस्तकला आणि सर्जनशीलता दर्शवतात, असेही त्यांनी सांगितले.

साहस आणि शक्तीच्या संगमाचे प्रतीक असलेल्या अष्टलक्ष्मीच्या वीर लक्ष्मी या सहाव्या रुपाची चर्चा करताना मोदी यांनी  ईशान्य हे महिला शक्तीचे प्रतीक असल्याचे सांगितले. त्यांनी मणिपूरच्या नुपी लॅन चळवळीचे उदाहरण दिले. या चळवळीत महिलांनी शक्ती दाखवली. ईशान्येकडील महिलांनी ज्या प्रकारे गुलामगिरीविरोधात आवाज उठवला त्याची नोंद भारताच्या इतिहासात नेहमीच सुवर्णाक्षरांनी केली जाईल, असे मोदी म्हणाले. लोककथांपासून आपल्या स्वातंत्र्यलढ्यापर्यंत राणी  गाइदिन्ल्यु , कनकलता बरुआ, राणी इंदिरा देवी, ललनू रोपिलियानी या शूर महिलांनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे. आजही ही परंपरा ईशान्येतील कन्या समृद्ध करत असल्याचे मोदी म्हणाले. ईशान्येकडील महिलांच्या उद्योजकतेने संपूर्ण ईशान्येला एक मोठे बळ दिले त्याला तोड नाही, असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले.

अष्टलक्ष्मीचे सातवे रूप - जय लक्ष्मी प्रसिद्धी आणि वैभव देणारी देवी असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. संपूर्ण जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षांमध्ये ईशान्येचा मोठा वाटा आहे, असे ते पुढे म्हणाले. भारत आपली  संस्कृती आणि व्यापार यांच्या जागतिक कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करत आहे, तर ईशान्य हा भारताला दक्षिण आशिया आणि पूर्व आशियाच्या अनंत संधींशी जोडणारा आहे, असे त्यांनी सांगितले.

अष्टलक्ष्मीतील आठवी लक्ष्मी - ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक असलेल्या विद्यालक्ष्मीला स्पर्श करून श्री. मोदी यांनी नमूद केले की आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये शिक्षणाची अनेक प्रमुख केंद्रे ईशान्येकडे होती, जसे की आयआयटी गुवाहाटी, एनआयटी सिलचर, एनआयटी मेघालय, एनआयटी आगरतळा आणि आयआयएम शिलाँग. ते पुढे म्हणाले, की मणिपूरमध्ये देशातील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ बांधले जात असून ईशान्येला पहिले एम्स आधीच मिळाले आहे. त्यांनी नमूद केले की ईशान्येने देशाला मेरी कोम, बायचुंग भुतिया, मीराबाई चानू, लवलिना, सरिता देवी यांसारखे अनेक महान खेळाडू दिले आहेत. श्री मोदी यांनी टिप्पणी केली की आज ईशान्येने तंत्रज्ञानाशी संबंधित स्टार्टअप्स, सेवा केंद्रे आणि सेमीकंडक्टर यासारख्या उद्योगांमध्येही पुढे जाण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये हजारो तरुण काम करत आहेत.

ते पुढे म्हणाले, की हा प्रदेश तरुणांसाठी शिक्षण आणि कौशल्यांचे प्रमुख केंद्र बनत आहे.

"अष्टलक्ष्मी महोत्सव हा ईशान्येच्या उज्ज्वल भविष्याचा उत्सव आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले.  विकासाच्या नव्या पहाटेचा हा उत्सव असून तो विकसित भारताच्या मिशनला चालना देईल, असेही ते म्हणाले. आज ईशान्येमध्ये गुंतवणुकीसाठी प्रचंड उत्साह आहे आणि सर्वांनी गेल्या दशकातील ईशान्य क्षेत्राच्या विकासाचा अद्भुत प्रवास पाहिला आहे, अशी टिप्पणी श्री मोदी यांनी केली. हा प्रवास सोपा नव्हता, असे सांगून श्री मोदी म्हणाले की, सरकारने ईशान्येकडील राज्यांना भारताच्या विकासाच्या कथेशी जोडण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलली आहेत.  कमी जागा आणि मतांमुळे पूर्वीच्या सरकारांनी केलेला ईशान्येचा विकास निकृष्ट होता, असे सांगून श्री मोदी म्हणाले की, श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनेच प्रथम ईशान्येच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले.

गेल्या दशकात दिल्ली आणि ईशान्येतील लोकांमधील अंतर कमी करण्यासाठी सरकारने अथक परिश्रम केले आहेत, यावर भर देऊन श्री मोदी म्हणाले की, केंद्रीय मंत्र्यांनी ईशान्येकडील राज्यांना 700हून अधिक वेळा भेट दिली आहे आणि तेथील लोकांसोबत बराच वेळ घालवला आहे, ज्यामुळे सरकार आणि ईशान्य आणि त्याचा विकास यांच्यात भावनिक संबंध निर्माण झाला आहे. यामुळे तेथील विकासाला आश्चर्यकारक गती मिळाली असल्याचे ते म्हणाले. ईशान्येच्या विकासाला गती देण्यासाठी 1990च्या दशकात तयार करण्यात आलेल्या धोरणाचा उल्लेख करून, ज्या अंतर्गत केंद्र सरकारच्या 50हून अधिक मंत्रालयांना त्यांच्या अर्थसंकल्पातील 10 टक्के रक्कम ईशान्येमध्ये गुंतवावी लागली होती, श्री मोदी म्हणाले की त्यांच्या सरकारने 1990च्या तुलनेत गेल्या 10 वर्षांमध्ये बरेच जास्त अनुदान दिले आहे. ते पुढे म्हणाले की, गेल्या दशकात वरील योजनेअंतर्गत ईशान्येमध्ये 5 लाख कोटी रुपयाहून अधिक खर्च करण्यात आला आहे, ज्याने वर्तमान सरकारचे ईशान्येबाबतचे प्राधान्य दर्शवले आहे.

पंतप्रधानांनी नमूद केले की सरकारने ईशान्येसाठी PM-DevINE, विशेष पायाभूत सुविधा विकास योजना आणि नॉर्थ ईस्ट व्हेंचर फंड यासारख्या अनेक विशेष योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमुळे रोजगाराच्या अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, असेही ते म्हणाले.

ईशान्येकडील औद्योगिक क्षमतेला चालना देण्यासाठी सरकारने उन्नती योजनाही सुरू केल्याचे श्री मोदी यांनी नमूद केले. नवीन उद्योगांसाठी चांगले वातावरण निर्माण झाल्यावर नवीन रोजगारही निर्माण होतील, असे ते म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्र हे भारतासाठी नवीन असल्याचे नमूद करून श्री मोदी म्हणाले की, या नवीन क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने आसामची निवड केली. ते पुढे म्हणाले की जेव्हा ईशान्येमध्ये असे नवीन उद्योग उभारले जातील, तेव्हा देशातील आणि जगभरातील गुंतवणूकदार तेथे नवीन शक्यतांचा शोध घेतील.

आम्ही ईशान्येला भावना, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणशास्त्र या त्रिमूर्तीशी जोडत आहोत, श्री मोदी म्हणाले.  ते पुढे म्हणाले की, सरकार ईशान्येमध्ये केवळ पायाभूत सुविधा निर्माण करत नाही, तर भविष्यासाठी भक्कम पायाही घालत आहे. गेली अनेक दशके रेल्वे सुविधा नसल्यामुळे अनेक राज्यांबरोबरची कनेक्टिव्हिटी हे ईशान्येकडील सर्वात मोठे आव्हान होते, असे नमूद करून श्री मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने 2014नंतर भौतिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे पायाभूत सुविधांची गुणवत्ता आणि ईशान्येतील लोकांचे जीवनमान या दोन्हींमध्ये सुधारणा झाल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीलाही सरकारने गती दिली असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. बोगी-बील पुलाचे उदाहरण देत पंतप्रधान म्हणाले की, प्रलंबित बोगी-बील पूल पूर्ण होण्यापूर्वी संपूर्ण दिवस प्रवासात घालवावा लागत असे, त्यांच्या तुलनेत आता धेमाजी आणि दिब्रुगड दरम्यानचा प्रवास केवळ एक ते दोन तासांत पूर्ण करता येईल. "गेल्या दशकात सुमारे 5 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प पूर्ण झाले आहेत", असे पंतप्रधान मोदी म्हणाले. अरुणाचल प्रदेशातील सेला बोगदा, भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्ग, नागालँड, मणिपूर आणि मिझोराममधील सीमा रस्ते यासारख्या प्रकल्पांनी मजबूत रस्ते संपर्क विस्तारित केला आहे, असेही ते म्हणाले. गेल्या वर्षी जी-20 दरम्यान भारताने भारत-मध्य पूर्व-युरोप कॉरिडॉर (I-MAC) चा दृष्टिकोन जगासमोर मांडल्याची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की I-MAC भारताच्या ईशान्य भागाला जगाशी जोडेल.

ईशान्येकडील रेल्वे संपर्क सुविधेत अनेक पटींनी वाढ झाली आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, ईशान्येकडील राज्यांच्या सर्व राजधान्यांना रेल्वेने जोडण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये आता पहिल्या वंदे भारत रेल्वेनेही आपले कार्य सुरू केले आहे, असेही त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षात ईशान्येकडील राज्यांमधील विमानतळे आणि विमान उड्डाणांची संख्या जवळपास दुप्पट झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांवर जलमार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे, तर सबरूम लँडपोर्टवरून जल संपर्क सुविधा देखील सुधारत आहे, असे ते म्हणाले.

मोबाईल आणि गॅस पाइपलाइन संपर्क सुविधेचे काम वेगाने सुरू असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ईशान्येकडील प्रत्येक राज्य ईशान्य गॅस ग्रीडशी जोडले जात आहे आणि 1600 किमी पेक्षा जास्त लांबीची गॅस पाइपलाइन टाकली जात असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ईशान्येकडील राज्यांमध्ये 2600 हून अधिक मोबाइल टॉवर उभे करून सरकार इंटरनेट कनेक्टिव्हिटीवरही भर देत आहे, असे ते म्हणाले. ईशान्येकडील राज्यांमध्ये 13 हजार किलोमीटरहून अधिक लांबीचे ऑप्टिकल फायबर टाकण्यात आले आहेत, हे सांगून ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये 5G कनेक्टिव्हिटी पोहोचल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

ईशान्येकडील राज्यांमध्ये सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या अभूतपूर्व कामावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सांगितले की, कर्करोगासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी आधुनिक सुविधांनी युक्त वैद्यकीय महाविद्यालयांचा विस्तार करण्यात आला आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ईशान्येतील लाखो रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. सरकारने आयुष्मान वय वंदना कार्ड जारी केले असून हे कार्ड 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचार मिळतील हे सुनिश्चित करेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

ईशान्येकडील राज्यांच्या संपर्क सुविधा व्यतिरिक्त सरकारने या राज्यांची परंपरा, वस्त्रोद्योग आणि पर्यटनावरही भर दिला आहे, असे ते म्हणाले. याचे फलित म्हणून लोक आता ईशान्येकडील राज्यांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत, याचा उल्लेख त्यांनी केला. ईशान्येकडील राज्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही गेल्या दशकात जवळपास दुप्पट झाली आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, गुंतवणूक आणि पर्यटन वाढल्यामुळे नवीन व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. पायाभूत सुविधा ते एकत्रीकरण, संपर्क सुविधा ते समिपता, आर्थिक प्रगती ते भावनिकता अशा संपूर्ण प्रवासाने ईशान्येकडील राज्यांच्या विकासाला नव्या उंचीवर पोहोचवले आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

अष्टलक्ष्मी राज्यांतील तरुणांना भारत सरकार सर्वाधिक प्राधान्य देत असून त्यांचा निरंतर विकास व्हावा, हीच सरकारची इच्छा आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.  गेल्या दशकात ईशान्येकडील प्रत्येक राज्यात कायमस्वरूपी शांततेसाठी अभूतपूर्व सार्वजनिक पाठिंबा मिळाला असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे हजारो तरुणांनी हिंसाचाराचा मार्ग सोडला आहे आणि विकासाचा नवा मार्ग स्वीकारला यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.

गेल्या दशकात, ईशान्येकडील राज्यांकडून अनेक ऐतिहासिक शांतता करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे आणि राज्यांमधील सीमा विवाद देखील अतिशय सौहार्दपूर्ण रीतीने मिटवले गेले आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. यामुळे ईशान्येतील हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत, असे ते म्हणाले. अनेक जिल्ह्यांमधून AFSPA हटवण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. आपण सर्वांनी मिळून अष्टलक्ष्मीचे नवे भविष्य लिहायला हवे आणि त्यासाठी सरकार प्रत्येक पाऊल उचलत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

ईशान्य प्रदेशातील उत्पादने जगातील प्रत्येक बाजारपेठेपर्यंत पोहोचली पाहिजेत, अशी इच्छा व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले की, याच दिशेने केलेले प्रयत्न म्हणून एक जिल्हा एक उत्पादन अभियानाअंतर्गत या भागातील प्रत्येक जिल्ह्यातील उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले की अष्टलक्ष्मी महोत्सवातील ग्रामीण हाट बाजारात मांडलेल्या प्रदर्शनांमध्ये ईशान्य भागातील अनेक उत्पादने पाहता येतील. ईशान्य प्रदेशातील उत्पादनांसाठी मी व्होकल फॉर लोकल च्या मंत्राला प्रोत्साहन देत आहे, मोदी उद्गारले. ते म्हणाले की, ईशान्येकडील राज्यांमध्ये निर्मित उत्पादने परदेशी पाहुण्यांना भेटीदाखल देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून यातून ईशान्येच्या अद्भुत कला आणि हस्तकलांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळेल. नागरिकांनी ईशान्य भारतातील उत्पादनांना त्यांच्या जीवनशैलीत स्थान द्यावे, असा आग्रह पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

गुजरातमध्ये पोरबंदर येथे भरणाऱ्या माधवपूर मेळाव्यात सहभागी होण्याचे आमंत्रण पंतप्रधानांनी उपस्थितांना दिले. ते पुढे म्हणाले की, कृष्ण भगवान आणि ईशान्य प्रदेशची कन्या असलेली रुक्मिणी यांच्या लग्नसोहळ्याचे प्रतीक म्हणून हा माधवपूर मेळावा साजरा करण्यात येतो. वर्ष 2025 मध्ये होणाऱ्या या मेळाव्यात ईशान्य प्रदेशातील सर्वांनी उपस्थित राहावे, असा आग्रह त्यांनी केला. भगवान श्रीकृष्ण आणि अष्टलक्ष्मी यांच्या आशीर्वादाने 21 व्या शतकात ईशान्य प्रदेश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचलेला भारताला नक्कीच पाहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी भाषण संपवले.

केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ.माणिक साहा, मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग तसेच केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री डॉ.सुकांत मजुमदार यांच्यासह इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पार्श्वभूमी

नवी दिल्ली यथील भारत मंडपम येथे दिनांक 6 ते 8 डिसेंबर या कालावधीत अष्टलक्ष्मी महोत्सव हा तीन दिवसीय सांस्कृतिक उत्सव प्रथमच साजरा करण्यात येत आहे. ईशान्य भारतातील पारंपरिक कला, हस्तकला आणि सांस्कृतिक रितीरिवाजांच्या विविध प्रकारांना एकत्र आणून या प्रदेशातील विशाल सांस्कृतिक धाग्यांची वीण दर्शवण्यावर या महोत्सवात अधिक भर देण्यात आला आहे.

पारंपरिक हस्तकला, हातमाग, कृषी उत्पादने तसेच पर्यटन यासारख्या क्षेत्रांमधील आर्थिक संधींना चालना देण्यासाठी या महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या ठिकाणी कारागिरांची प्रदर्शने, ग्रामीण हाट, राज्य-विशिष्ट दालने तसेच  ईशान्य प्रदेशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या क्षेत्रांच्या संदर्भात तंत्रज्ञानसंबंधित सत्रे इत्यादी उपक्रम राबवण्यात आले आहेत. ईशान्य प्रदेशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने नेटवर्कचे जाळे उभारून ते अधिक मजबूत करणे, भागीदारी आणि संयुक्त उपक्रम यांच्यासाठी अनोखी संधी उपलब्ध करून देणारे, गुंतवणूकदारांची गोलमेज बैठक आणि खरेदीदार-विक्रेता भेटी यांसारखे उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.

या महोत्सवात ईशान्य भारतातील समृध्द हातमाग आणि हस्तकलाविषयक परंपरांचे दर्शन घडवणारे डिझाईन कॉन्क्लेव्ह आणि फॅशन शो यांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात ईशान्य प्रदेशाच्या संपन्न सांस्कृतिक वारशाचे ठळकपणे दर्शन घडवणाऱ्या, ईशान्य भारतातील चैतन्यमयी सांगीतिक कार्यक्रम आणि स्वदेशी पाककृती यांचा अनुभव देखील उपस्थितांना घेता येणार आहे.

 

 

 

 

S.Kakade/Sushama/Prajna/Nandini/Shraddha/Sanjana/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 2081783) Visitor Counter : 223