माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
1 0

55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्वीडिश निर्माता लेवन अकीन यांच्या ‘क्रॉसिंग’ या चित्रपटाचा प्रतिष्ठित आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक देऊन गौरव


‘क्रॉसिंग’ या चित्रपटाच्या व्यक्तिगत आणि सामाजिक विकासावरील प्रभावामुळे या वर्षीच्या इफ्फीमधील वेगळा चित्रपट ठरतो

#IFFIWood, 28 नोव्‍हेंबर 2024

 

गोवा येथे आयोजित 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्वीडिश निर्माता लेवन अकीन यांच्या ‘क्रॉसिंग’ या चित्रपटाने प्रतिष्ठित आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकावर नाव कोरले. शांतता, अहिंसा आणि मानवी हक्कांना प्रोत्साहन देणारी तत्वे असलेल्या चित्रपटाला हा पुरस्कार देण्यात येतो आणि या संकल्पनांचे सशक्त सादरीकरण केल्यामुळे ‘क्रॉसिंग’ची या पदकासाठी निवड आली. पुरस्कार विजेत्याला युनेस्को गांधी पदक आणि प्रमाणपत्र देण्यात येते.

‘क्रॉसिंग’ चित्रपटातील जबरदस्त चित्रपटीय गुणधर्म आणि त्यात दाखवलेला  लिंग समानता तसेच सामाजिक अंतर्दृष्टी या तत्वांचा विचारप्रवर्तक शोध याबद्दल परीक्षकांनी सदर पुरस्कारासाठी या चित्रपटाची निवड केली. “प्रेम आणि अंतर्दृष्टी यांची कथा सांगणारा अप्रतिम चित्रपट” अशा शब्दात परीक्षकांनी या चित्रपटाचा गौरव केला आहे.

आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरचित्रवाणी तसेच दृक्श्राव्य संपर्क मंडळ (आयसीएफटी) आणि युनेस्को यांच्या संयुक्त सहयोगाने दिला जाणारा हा पुरस्कार सहिष्णुता, आंतर सांस्कृतिक संवाद आणि शांततेच्या संस्कृतीचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटाला दिला जातो.

क्रॉसिंग हा चित्रपट फार पूर्वी गायब झालेल्या भाचीला शोधण्यासाठी एका तरुण माणसासोबत जॉर्जिया ते इस्तंबूल असा प्रवास करणाऱ्या एका वयस्कर स्त्रीची कहाणी सांगतो. अत्यंत सशक्त आणि संवेदनशील अभिनेत्री मझिया अराबुली हिने रंगवलेली या स्त्रीची व्यक्तिरेखा वचनपूर्ती करतानाच लिंगविषयक समस्या आणि समानतेच्या संदर्भात अनपेक्षित दुवे उघड करते. सामाजिक आणि सांस्कृतिक संकल्पनांवर मार्मिक भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची कथा प्रेम, समजूत आणि पिढ्यानपिढ्या संक्रमित होणाऱ्या मर्मबंधांची सुंदर वीण उलगडते.

यावर्षी या पुरस्कारासाठी वेगवेगळे धर्म, संस्कृती आणि शैली यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पण तरीही गांधीजींच्या तत्वांप्रतीच्या वचनबद्धतेने एकाच सूत्रात बांधलेल्या 10 चित्रपटांचा विचार करण्यात आला. नामनिर्देशित चित्रपटांची नावे वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:
 
इफ्फीमध्ये गांधी पदकासाठी नेमलेल्या परीक्षक मंडळात खालील सदस्यांचा समावेश आहे:

  • इसाबेल दानेल, एफआयपीआरईएससीआय- आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक महासंघाच्या अध्यक्ष
  • सर्ज मायकेल, सीआयसीटी-आयसीएफटीचे उपाध्यक्ष
  • मारिया क्रिस्टीना, इग्लेसियस युनेस्कोच्या सांस्कृतिक क्षेत्र कार्यक्रमाच्या माजी प्रमुख
  • डॉ. अहमद बेदजॉई, अल्गीयर्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कला दिग्दर्शक
  • शिऊआन हून, सीआयसीटी-आयसीएफटीच्या युवा शाखेतील सर्जनशीलता आणि नवोन्मेष विषयक मंचाचे संचालक

पीआयबीच्या पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी परीक्षकांचा संवाद येथे ऐकता येईल
 
आयसीएफटी युनेस्को गांधी पदकाविषयी माहिती

46 व्या इफ्फीमध्ये सुरू करण्यात आलेल्या या आयसीएफटी-युनेस्को गांधी पुरस्काराने गौरवण्यात येणारा चित्रपट केवळ उच्च कलात्मक आणि चित्रपटीय मानदंड दर्शवत नाही तर तो समाजातील सर्वात महत्त्वाच्या समस्यांबाबत नैतिक जाणीव देखील निर्माण करतो. चित्रपटामध्ये असलेल्या परिवर्तनीय सामर्थ्याच्या माध्यामातून मानवतेच्या सामायिक मूल्यांच्या गहन समजुतीचे संगोपन करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.
हा केवळ एक पुरस्कार नव्हे तर तो चित्रपटांच्या प्रेरित करण्याच्या, शिक्षित करण्याच्या आणि एकत्र आणण्याच्या शक्तीचा उत्सव आहे.

जसे दिग्गज अंतर्धान पावतात, इफ्फी देखील संपन्न होतो मात्र खऱ्या अर्थाने त्याचा शेवट होत नाही. या 9 दिवसांच्या चित्रपटीय सोहोळ्याची सांगता होत असताना,आमचे इफ्फीच्या निवडक कथांचे संग्रह, निर्मात्यांचे संवाद आणि गोवा येथे झालेल्या इफ्फीमधील अशा अनेक उत्स्फूर्त क्षणांसाठी पुढील लिंकवर क्लिक करा (https://pib.gov.in/iffi/55/ 

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | S.Tupe/S.Chitnis/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2078757) Visitor Counter : 17