माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
1 1

55व्या इफ्फीचा समारोप सोहळा : एक पूर्वावलोकन


दिग्गज तारेतारकांच्या उपस्थितीत 55 व्या इफ्फीची होणार सांगता: सिनेमाची जादू सुरूच राहील

#IFFIWood, 27 नोव्‍हेंबर 2024

 

सिनेमाचा आनंद साजरा करणाऱ्या आणि भविष्याची जडणघडण  करणाऱ्या एका मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रवासावर उद्या पडदा पडणार आहे.  28 नोव्हेंबर 2024 रोजी गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम मध्ये 55 व्या भारतीय  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा  शानदार समारोप होणार आहे.

कथा सांगण्याची कला आणि जागतिक सिनेमाच्या भावनेचा उत्सव साजरा करणाऱ्या नऊ दिवसांच्या सिनेमॅटिक उत्कृष्टतेचा  समारोप या भव्य सोहळ्यात होणार आहे. 75 देशांमधील 200 हून अधिक चित्रपट, सिनेसृष्टीतील दिग्गजांचे मास्टरक्लास, आणि प्रेरणादायी पॅनेल चर्चेसह, या वर्षीच्या इफ्फीने सिनेमाची एकत्रित ताकद दाखवून दिली  आहे.

 

सोहळ्याची वैशिष्ट्ये

भारतीय सिनेमाचा उत्सव

समारोप सोहळ्यात भारताच्या सिनेमॅटिक जगताचे  चैतन्य आणि विविधता यांची सांगड घातली जाईल.  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर  भारतीय चित्रपटांच्या कलात्मकता, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक प्रभावांना मानवंदना देत महोत्सवाचे उत्कृष्ट क्षण एकत्र गुंफले जातील. सीमा ओलांडून संस्कृतींना जोडणारे माध्यम म्हणून सिनेमाचे सार या समारंभात प्रतिबिंबित होईल.

या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांची उपस्थिती पहायला मिळेल. यामध्ये सुकुमार, दिल राजू, आनंद तिवारी, अमृतपाल सिंग बिद्रा आणि ऑस्ट्रेलियन निर्माते स्टीफन वोली यांसारखे प्रतिष्ठित चित्रपट निर्माते यांचा समावेश आहे.

प्रसिद्ध संगीतकार अमाल मल्लिक आणि मामे खान यांच्यासह प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, जया प्रदा, श्रिया सरन, प्रतीक गांधी, समीर कोचर, श्रेया चौधरी, ऋत्विक भौमिक आणि नवीन कोहली उपस्थित राहणार आहेत. चित्रपटसृष्टीतील आयकॉन्सचा हा दिमाखदार  मेळावा हा भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटातील प्रतिभावंतांना एकत्र आणण्याच्या या महोत्सवाच्या क्षमतेला दिलेला दुजोरा आहे.

या संध्याकाळी प्रसिद्ध कलाकार आणि कलावंत संगीत, नृत्य आणि सिनेमॅटिक आकर्षणाचे मिश्रण असलेला कार्यक्रम सादर करतील. या सोहळ्यात स्टेबिन बेन, भूमी त्रिवेदी, आणि अमाल मलिक आणि अभिनेत्री श्रिया सरन यांसारख्या ख्यातनाम गायकांचे संगीत आणि नृत्य सादरीकरण, निकिता गांधी आणि दिग्विजय सिंग परियार यांचे संगीतमय कथाकथन यांचा समावेश असेल, जे भावपूर्ण प्रस्तुती आणि उत्साही सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.

चित्रपटातील उत्कृष्टतेचा सन्मान

ही संध्याकाळ चित्रपट निर्मिती क्षेत्रातील असाधारण कलाकृतींना प्रतिष्ठित पुरस्कार देऊन साजरी होईल.

उत्कृष्ट सिनेमॅटिक कामाचा गौरव करत बेस्ट फीचर फिल्मसाठी महोत्सवातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार, सुवर्ण मयूर- संबंधित विजेत्या संघाचे दिग्दर्शक -निर्माते या द्वयीला सुवर्ण मयूर चषक, प्रमाणपत्र आणि रोख पुरस्काराने नावाजले जाईल.  

या समारंभात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष आणि महिला) आणि पदार्पणातील सर्वोकृष्ट फीचर फिल्म यासाठी दिला जाणारा रौप्य मयूर पुरस्कार प्रदान होईल, विजेत्यांना रौप्य मयूर चषक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके दिली जातील. याशिवाय कोणत्याही प्रकारातील उत्कृष्टतेसाठी विशेष ज्युरी पुरस्कार देखील सिल्व्हर पीकॉक ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक या स्वरूपात दिला जाईल.

पदार्पणातील भारतीय चित्रपटांना उजेडात आणण्यासाठी या वर्षी सादर करण्यात आलेला, भारतीय फीचर फिल्मच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार समारंभात एका उदयोन्मुख चित्रपट निर्मात्याची सर्जनशीलता आणि क्षमता साजरी करेल.

इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन आणि ऑडिओव्हिज्युअल कम्युनिकेशन (आयसीएफटी) च्या सहकार्याने सहिष्णुता, आंतरसांस्कृतिक संवाद आणि शांतता यांसारखी आदर्श मूल्ये प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटांना आयसीएफटी-युनेस्को‌ गांधी पदक देऊन समारंभात युनेस्को गांधी पदक आणि प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. 

ऑस्ट्रेलियातील दिग्गज चित्रपट निर्माते फिलिप नॉयस यांना सत्यजित राय जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाईल ज्यात त्यांच्या चमकदार आणि व्यापक चित्रपट प्रवासाबद्दल अभिवादन म्हणून रौप्य मयूर पदक, प्रमाणपत्र, शाल, मानपत्र आणि रोख पारितोषिक यांचा समावेश आहे.

भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल विशेष ओळख पुरस्कार अभिनेता अल्लू अर्जुन यांना देण्‍यात येणार आहे.  भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आणि  त्यांच्या ब्लॉकबस्टर पुष्पा 2 ला विशेष मान्यता मिळाल्याबद्दल हा पुरस्‍कार  प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (ओटीटी) पुरस्कार देखील प्रदान केला जाईल.

समारोप समारंभात दिग्गज भारतीय दिग्दर्शक रमेश सिप्पी, अभिनेता-निर्माता निविन पॉली आणि अभिनेता प्रतीक गांधी यांसारख्या चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधला जाईल.

देशाचा समृद्ध नृत्य वारसा साजरे करणारा "रिदम्स ऑफ इंडिया" नावाचा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम या समारोप  संध्या कार्यक्रमाचा  केंद्रबिंदू असेल. कथ्थक (उत्तर भारत), मोहिनीअट्टम आणि कथकली (दक्षिण भारत), मणिपुरी आणि पुंग चोलम ड्रमर्स (पूर्व भारत) आणि गरबा (पश्चिम भारत) यांसारख्या शास्त्रीय नृत्य प्रकारांमधून प्रेक्षकांना संपूर्ण भारतातील  नृत्य क्षेत्राचा  चित्तवेधक  प्रवास घडवून आणला  जाईल.

वेगवान एलइडी दृश्‍ये , कोलम म्हणजे रांगोळ्यांचे  पारंपरिक आकृतिबंध आणि ‘आयकॉनिक’ संगीत या कार्यक्रमाचा  अनुभव अधिक  समृद्ध करणारा असेल. "देस मेरा रंगीला" या गाण्याने विविधतेतील  भारताची एकता ठळकपणे दाखवून भव्य समारोप होईल.

या वर्षीचा इफ्फी हा चित्रपटाच्या विविधतेचा आणि नाविन्यपूर्णतेचा उत्सव ठरला आहे, चित्रपटांची वेगवेगळी  शैली, भाषा आणि संस्कृतींचा समावेश असलेल्या विविध प्रकारच्या सिनेमांची निवड यामध्‍ये केली गेली.  प्रख्यात चित्रपट निर्मात्यांचे मास्टरक्लास, चित्रपट निर्मितीची कला आणि त्यातील वैशिष्‍ट्यपूर्ण कारागिरी, याविषयी  अनोखा  दृष्टीकोन प्रदान करणारा हा महोत्सव ठरला. विशेष म्हणजे सिनेमा क्षेत्राचे भविष्य कसे असेल, याचा वेध घेणा-या   चर्चासत्रांचाही यामध्‍ये  समावेश केला होता. सिनेमा आणि जागतिक सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्यात  या महोत्सवाची  भूमिका महत्‍वपूर्ण ठरली.

सिनेमाची  जादू आणि उत्कृष्‍ट  कलाकृतींचे गारूड  निर्माण झाल्यामुळे  या  चिरस्थायी आठवणी घेऊनच  प्रेक्षक इथून जातील ते पुन्‍हा  पुढच्या वर्षी आणखी नेत्रदीपक आवृत्तीचा आस्‍वाद घेण्‍यासाठी  परत येण्याचे वचन देऊन या समारंभाचा समारोप होईल.

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | S.Patil/Sushma/Nandini/Suvarna/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2078223) Visitor Counter : 70