माहिती आणि प्रसारण मंत्रालय
55 व्या इफ्फी मध्ये मनीषा कोईराला आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी 'बिग स्क्रीन ते स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स' यावर मोकळेपणाने केली चर्चा
अभिनेत्यांनी चाकोरी सोडून नवीन माध्यमांसह प्रयोग करावेत : मनीषा कोईराला
“चांगल्या मालिकांमध्ये वेगळ्या प्रकारची जादू असते, प्रारुपाची लवचिकता अद्भुत असू शकते:” विक्रमादित्य मोटवाने
#IFFIWood, 24 नोव्हेंबर 2024
कला अकादमीच्या खचाखच भरलेल्या सभागृहात ज्येष्ठ अभिनेत्री मनीषा कोईराला आणि दूरदर्शी चित्रपट निर्माते विक्रमादित्य मोटवाने यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. 'हीरामंडी' मधील प्रतिष्ठित मल्लिकाजान आणि 'उडान', 'लुटेरा' सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे आणि 'सेक्रेड गेम्स' या सारख्या मालिकेचे दिग्दर्शक यांची आज 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भेट झाली. चित्रपट उद्योगातील दोन दिग्गज 'फ्रॉम बिग स्क्रीन टू स्ट्रीमिंग' या विषयावरील वैचारिक 'इन कन्व्हर्सेशन' सत्रात सहभागी झाले, ज्यात देशभरातील चित्रपट रसिक, विद्यार्थी, माध्यमकर्मी आणि चाहते गोव्यात जमले होते.
यावेळी झालेल्या खुल्या चर्चेत, मनीषा कोईराला यांनी सांगितले की चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणे असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मालिका किंवा चित्रपट असो, या दोन्हीसाठी कलाकारांकडून समान स्तराची मेहनत, तयारी, प्रामाणिकपणा आणि मानसिकता आवश्यक आहे. "माझ्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत, हीरामंडी हा मी आतापर्यंत काम केलेला सर्वात मोठा सेट होता," असे त्यांनी स्पष्ट केले. "मला थिएटरमध्ये जायला आवडतं, तसेच घरी बसून चांगला आशय असलेले चित्रपट मालिका पाहण्यातही मजा येते," असं सांगत त्यांनी दोन्ही अनुभवांबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं. त्यांच्या मते, दोन्हीचे स्वतःचे असे महत्त्व आहे आणि ओटीटीवर भरपूर उत्कृष्ट सामग्री उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मची क्षमता मान्य करून त्या पुढे म्हणाल्या, "मी ओटीटी सामग्री खूप जास्त पाहते.
अभिनेते अजूनही ओटीटी शोमध्ये काम करण्यास संकोच करतात का असे विचारले असता, मनीषा यांनी स्पष्टपणे उत्तर दिले की त्याबद्दल इंडस्ट्रीमध्ये सतत चर्चा सुरू असते. "कोणतीही नवीन आणि अपरिचित गोष्ट सुरुवातीला संशयास्पद वाटते," मात्र "चांगले परिणाम लोकांना ते स्वीकारण्यास प्रोत्साहित करतात." त्यांनी मान्य केले की स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील प्रकल्पांबाबत चित्रपट उद्योगात अजूनही थोडी साशंकता आहे. मात्र त्यांनी आशा व्यक्त केली की "हे पुढील पिढ्यांमध्ये नाहीसे होईल." मनीषा आणि विक्रमादित्य मोटवाने या दोघांनीही सांगितले की शाहिद कपूर, आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच्यासह अनेक कलाकारांनी आधी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित चित्रपटांमध्ये काम केले आहे, जे या माध्यमाच्या वाढत्या स्वीकृतीचे संकेत आहेत.
जेव्हा विक्रमादित्य मोटवाने यांनी विचारले की ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करताना मोठ्या पडद्यावरून 'खाली' आल्यासारखे वाटते का, त्यावर मनीषा यांनी सांगितले, "अभिनेत्यांनी चाकोरी तोडली पाहिजे. मला फक्त एका शैलीपुरते मर्यादित राहायचे नव्हते. एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला विविध पैलूचा शोध घ्यावासा वाटतो. "स्ट्रीमिंग आमूलाग्र बदल घडवून आणणारे ठरणार आहे. हे नवीन संधी उपलब्ध करून देत आहे आणि उदयोन्मुख चित्रपट निर्माते, लेखक आणि अभिनेत्यांना प्रकाशझोतात येण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.
मनीषा यांनी हे देखील नमूद केले की पूर्वीच्या तुलनेत आता ज्येष्ठ अभिनेत्रींना ऑफर केल्या जाणाऱ्या भूमिकांमध्ये देखील वैविध्य येत आहे. "प्रेक्षकांना धन्यवाद, ओटीटी हळू हळू साचेबद्धपणा सोडत आहे," मनीषा म्हणाल्या. “सिनेमा मध्ये देखील आता ज्येष्ठ अभिनेत्यांना अधिक सकस भूमिका दिल्या जात आहेत. '90 आणि 2000 च्या दशकापासून बराच बदल घडत आहे. यामधून खूप काही शिकण्यासारखे आहे,” ज्येष्ठ अभिनेत्री म्हणाल्या.
संभाषणाला दिग्दर्शकाचा दृष्टीकोन जोडताना, विक्रमादित्य मोटवाने, ज्यांना दोन्ही स्वरूपातील यशस्वी प्रकल्पांचे श्रेय दिले जाते, ते आपले मत व्यक्त करताना म्हणाले, “चांगल्या मालिकांमध्ये वेगळी जादू असते. सृजनशील दृष्टीकोनात, मालिकांचे अनेक हंगाम यशस्वी करणे आव्हानात्मक असते. प्रवाहीपणा कायम ठेवणे कठीण असते. कलाकार आणि क्रू सदस्यांची एनर्जी या कालावधीत टिकून राहणेही महत्त्वाचे आहे.”
दोन्ही प्रारुपांमधील आपल्या अनुभवाबद्दल बोलताना, हा दूरदर्शी दिग्दर्शक म्हणाला, “मला साचेबद्धपणा मोडायला आवडतो. माझ्या पहिल्या चार फिल्म्स, हे सर्व सिनेमा होते. भाषेचा विचार करता, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म तुम्हाला थोडे अधिक स्वातंत्र्य देतात. ओटीटी प्लॅटफॉर्म अधिक स्वातंत्र्य देतात. नाट्यप्रदर्शनासाठी, बजेट आणि लांबीची मर्यादा असते, कथा सर्वसामान्य प्रेक्षकांना भावतील अशा असायला हव्यात.” उत्पादन आणि उत्पादन-पश्चात प्रक्रिया सारखीच असते, ते म्हणाले. “शुटींगची (चित्रीकरण) प्रक्रिया वेगवान होत आहे. ज्युबिलीचे 10 भाग 90 दिवसांत शूट झाले, सेक्रेड गेम्स'चे 80 दिवसांत चित्रीकरण करण्यात आले,” ते पुढे म्हणाले. शुटिंगच्या वेळी अधिक सहज निवड करता यावी, असे दिग्दर्शकाला वाटते.
ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी लेखन करण्याबद्दल बोलताना, विक्रमादित्य यांनी सांगितले की, ही संपूर्णपणे वेगळी प्रक्रिया आहे. लिहिताना एपिसोड्स आणि टायमिंग दोन्ही लक्षात ठेवावे लागते, असे त्यांनी नमूद केले. मनीषा आणि विक्रम या दोघांनीही मान्य केले की मोठ्या पडद्यावरील आणि ओटीटी रिलीजमध्ये समतोल असायला हवा.
मालिकेला दिग्दर्शन देणं थोडं कठीण आहे, हे विक्रम यांनी प्रांजळपणे मान्य केलं. “शो रनरसाठी हे अवघड आहे. अनेक आंतरराष्ट्रीय मालिकांचे वेगवेगळ्या सीझनसाठी वेगवेगळे शो रनर राहिले आहेत. ओटीटी हे भारतासाठी अगदी नवीन व्यासपीठ आहे. आपण त्यामध्ये हळूहळू प्रगती करायला हवी, आणि ती होईल”, विक्रम यांनी विश्वास व्यक्त केला.
संभाषणाचा समारोप करताना विक्रमादित्य म्हणाले की, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहण्याचा अनुभव अधिक चांगला असायला हवा. अनावश्यक मध्यंतर आणि लांबलचक जाहिराती प्रेक्षकांना आवडत नाहीत, असे मला वाटते, असे ते म्हणाले. “तरीही, मोठ्या पडद्यावरची सिनेमाची जादू कायम राहील,” ते पुढे म्हणाले.
मोठ्या पडद्यावर सिनेमाची जादू नेहमीच असेल," त्यांनी पुढे सांगितले. त्यांनी असेही नमूद केले की OTT प्लॅटफॉर्म दर्जेदार कौटुंबिक मनोरंजन आणि खासगीपणाचे स्वातंत्र्य देतात. "दोन्ही स्वरूपांचे परिपूर्ण मिश्रण सिनेमा विश्वात चमत्कार घडवेल," विक्रमादित्य मोटवाने म्हणाले.
ओटीटी विरुद्ध मोठा पडदा, या चर्चेत, दोन्ही दिग्गज तज्ञांनी सहमती दर्शवली की, ‘जेव्हा सीमांचा विस्तार होतो, तेव्हा अनेक नवीन अद्भुत गोष्टी घडतात’.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | S.Patil/Sushma/Rajshree/Darshana | IFFI 55
(Release ID: 2076695)
Visitor Counter : 54