माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 5

चित्रपटाच्या यशात योगदान देण्याविषयीच विचार सुरू असतो, मला त्या चित्रपटातून काय मिळते याचा विचार करत नाही- नित्या मेनन


एखाद्या अभिनेत्यासाठी लवचिकता आणि लोकांसोबत खुलेपणा आणि अनुभव अतिशय महत्त्वाचे असतात- नित्या मेनन

55 व्या इफ्फीमध्ये नित्या मेनन यांच्यासोबत संवाद

#IFFIWood, 21 नोव्‍हेंबर 2024

 

55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(इफ्फी) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या नित्या मेनन यांनी अभिनयाच्या कलेविषयीचा त्यांचा समग्र दृष्टीकोन मांडला. गोव्यात, पणजी येथे कला अकादमीत इफ्फीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'इन कन्वर्सेशन' या सत्रात ‘ भूमिका आणि कलाकार: बारकाव्याचे सामर्थ्य’ याविषयी त्या बोलत होत्या.

तिरुचित्रांबलम् आणि ओके कनमनी यांसारख्या चित्रपटांमधील व्यक्तिरेखेचे बारकावे दाखवणाऱ्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीने अतिशय सूक्ष्म वैशिष्ट्यांचे सामर्थ्य, भावनिक प्रामाण्य आणि वास्तविक विश्वातील गुंतागुतीच्या भूमिका  साकारण्यामधील आव्हाने यांची माहिती दिली. 

अंतर्मनातील भाव आणि चित्रपटांची निवडः प्रक्रियेवरील विश्वास

नित्या यांनी यापूर्वी त्यांची चित्रपटांची निवड प्रक्रिया आणि हलक्याफुलक्या भूमिका स्वीकारण्याबद्दल त्यांच्यावर झालेली टीका याविषयीच्या विवेचनाने संवादाची सुरुवात केली.  अभिनयासाठी विशेष प्रकारचा असा काही दृष्टीकोन न ठेवता आपल्या भूमिका साकारण्यासाठी आपण जी तयारी करतो त्यात, जगाचे निरीक्षण, ती दृश्ये स्वतःच्या डोळ्यासमोर आणणे आणि जाणीवपूर्वक त्या विशिष्ट पात्राच्या गुणवैशिष्ट्यांसोबत स्वतःला जोडणे यांचा समावेश असतो. आपल्यासाठी अभिनय म्हणजे एक भावनिक जोडणी असते, तो एक वैयक्तिक अनुभव असेलच असे नाही, उदाहरणार्थ एखाद्या आईची भूमिका साकारण्यासाठी प्रत्यक्ष तो अनुभव असण्यापेक्षा ममता आणि भावनिक उत्कटता (इमोशनल कोशंट) गरजेची असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आत्मविश्वासाची कमतरता व मनाचा ताठरपणा यामुळे अभिनेत्याच्या कामात अडचणी येतात अशी भावना त्यांनी व्यक्त केली. लवचिकता व लोकांमध्ये खुल्या दिलाने मिसळणे आणि अनुभव याबरोबरच आत्मविश्वास महत्त्वाचा आहे असे त्या पुढे म्हणाल्या. धावपळीच्या दिनक्रमाचा ताण न घेता व्यक्तीरेखेच्या भावना समजून घेण्यासाठी अभिनेत्याच्या आसपास शांत वातावरण असण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. निरनिराळ्या संस्कृतीच्या तसेच वेगवेगळ्या भागातील प्रेक्षकांशी खोलवर जोडले जाण्याच्या क्षमतेमुळे मी साकारलेली व्यक्तीरेखा सर्वांना आपलीशी वाटते. माझ्याकडे असलेला मनाचा ठाव घेणारा दृष्टीकोन व भावनिक मोकळेपणा यांना याचे श्रेय जाते असे त्यांनी सांगितले. 

एखाद्या कलाकाराच्या अंतर्गत भावना किंवा त्याचे चारित्र्य यांचा तो साकारत असलेल्या व्यक्तीरेखेवर मोठा परिणाम होतो, असे सांगताना त्या म्हणाल्या, "पूर्वी दुःखी भावना व्यक्त करणे अथवा रडणे माझ्यासाठी सोपे होते कारण माझे अंतःकरण वेदनांनी भरलेले आहे असे मला वाटायचे.  तेव्हा काही अशी भावनिक दृश्ये असायची; जी भावनांचा निचरा करणारी होती आणि त्यांच्या चित्रीकरणानंतर मला खूपच मोकळे वाटायचे. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा चित्रपटातील दृश्यासाठी रडणे खूपच कठीण आहे असे, मला वाटते.  बहुधा वय वाढतेय तशी मी आनंदी होत चाललेय. भावनांचा सच्चेपणा सर्वात महत्त्वाचा आहे. माझ्या भावनांच्या सच्चेपणामुळे माझ्या कामालाही चालना मिळते, व्यक्तीरेखेच्या सभोवतालच्या बाह्य परिस्थितीमुळे नाही."

गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपट उद्योगानेही स्त्रियांना अधिक चांगल्या संधी दिल्या, आदर दिला. आता चित्रपटसृष्टी महिलांना काम करण्यासाठी अधिक चांगली ठरते आहे, असे त्या म्हणाल्या. "प्रेक्षकांच्या जाणीवांना अंतर्बाह्य ढवळून काढणे हे चित्रपटनिर्मितीचे उद्दीष्ट असले पाहिजे. जर एखादा चित्रपट प्रेक्षकांना भावनिक अथवा बौद्धिकदृष्ट्या आपलासा वाटला नाही तर त्याचे महत्त्वच उरणार नाही", असेही त्या म्हणाल्या.

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Shailesh/Surekha/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076006) Visitor Counter : 5