माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताचा सांस्कृतिक समन्वय आणि विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची दिमाखात सुरुवात
इफ्फीच्या उद्घाटन समारंभात भारतीय चित्रपटसृष्टीतील काही दिग्गजांचा करण्यात आला सत्कार
“सर्जनशील निर्मिती क्षेत्रविषयक अर्थव्यवस्थेला आकार देण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो”: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
इफ्फी भारतीय सिनेमाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते आणि त्यासाठी विविध उपक्रम हाती घेतो : राज्यमंत्री (माहिती आणि प्रसारण) डॉ. एल. मुरुगन
लोकांना एकत्र आणणे आणि एकमेकांची गोष्ट सांगणे हा चित्रपट महोत्सवाचा उद्देश असायला हवा : महोत्सवाचे संचालक शेखर कपूर
संपूर्ण जग हे कथा - कथनाचे व्यासपीठ आहे: श्री श्री रविशंकर
इफ्फी 2024 च्या उद्घाटन समारंभात भारतीय चित्रपटसृष्टीतील चार दिग्गज - राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांच्यावरील विशेष तिकिटाचे अनावरण
‘युवा चित्रपटनिर्माते’ – हेच भविष्य आहेत” ही 55 व्या इफ्फीची संकल्पना आहे
#IFFIWood, 20 नोव्हेंबर 2024
चित्रपट उद्योगातील बहुप्रशंसित व्यक्तिमत्त्व आणि उत्साही सिने-रसिकांच्या उपस्थितीत, गोव्याच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) चा प्रारंभ झाल्याचे घोषित करण्यात आले. भारताचा सांस्कृतिक समन्वय आणि विविधतेचे दर्शन घडवणाऱ्या बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले आणि सर्जनशीलता, सिनेमॅटिक प्रतिभा आणि चलचित्रपटांच्या माध्यमातून कथाकथनाची कला साजरी करण्याच्या नऊ दिवसांच्या महोत्सवाची दिमाखात सुरुवात झाली.जगभरातील चित्रपटप्रेमींची प्रदीर्घ प्रतीक्षेची, 55 व्या इफ्फीच्या सुरुवात ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते मायकेल ग्रेसी यांच्या ‘बेटर मॅन’ या चित्रपटाने सांगता झाली.
सिनेप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य उद्घाटन समारंभात सिनेविश्वातील काही दिग्गजांचा सत्कार करण्यात आला . या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिषेक बॅनर्जी आणि भूमी पेडणेकर या लोकप्रिय कलाकारांनी केले. चित्रपट क्षेत्रातील दिग्गज सुभाष घई, चिदानंद नाईक, बोमन इराणी, आर के सेल्वामणी, जयदीप अहलावत, जयम रवी, ईशारी गणेश, आर. सरथ कुमार, प्रणिता सुभाष, जॅकी भगनानी, रकुल प्रीत सिंग, रणदीप हुडा आणि नित्या मेनन यांना चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल गौरवण्यात आले.
भारतीय परंपरेनुसार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नारळाच्या रोपाला पाणी घालून चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले; यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे; माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू; महोत्सवाचे संचालक शेखर कपूर; सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी; आणि प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
"निर्मात्यांच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकतो."
भारतीय चित्रपट उद्योगाच्या विकासात इफ्फी हा एक महत्वाचा टप्पा ठरल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. ते म्हणाले की, आशय संपन्न सामुग्री निर्माण करणाऱ्यांची अर्थव्यवस्था विकसित करण्यावर अधिक भर दिला जात आहे, कारण ती गतिशील असून झपाट्याने वाढत आहे.
“भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती, पाककृती, समृद्ध वारसा, आणि भारतीय साहित्य आणि भाषांचा अनमोल खजिना आकर्षक आणि सृजनशीलतेने सादर करणारी नवोन्मेशी सामुग्री घेऊन अनेक जण पुढे येत आहेत,” असे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञान आणि क्युरेटर्सची मजबूत परिसंस्था यांचा मेळ साधत, निर्मात्यांच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकेल असे ते म्हणाले.
इफ्फी (IFFI) च्या माध्यमातून नवीन भागीदारी आणि नव्या कल्पना उदयाला येतील, तसेच नव्या उपक्रमांच्या माध्यमातून काही तरुण निर्मात्यांना मार्गदर्शन मिळेल, अशी आशा वैष्णव यांनी व्यक्त केली. "या कार्यक्रमादरम्यान मांडल्या गेलेल्या कल्पना येत्या काही वर्षांमध्ये या उद्योगाची दिशा ठरवण्यात उपयोगी ठरतील", असे ते म्हणाले.
“इफ्फी (IFFI) भारतीय सिनेमाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतो."
एका व्हिडिओ संदेशाद्वारे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन म्हणाले की, हा चित्रपट महोत्सव भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी विविध उपक्रम हाती घेतो. चित्रपट-पायरसीला आळा घालण्यासाठी भारत सरकार चित्रपट उद्योगाला पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपट सुविधा कार्यालयाची सिंगल-विंडो सिस्टीम सुरु केल्यामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मंजुरी मिळवणे सुलभ झाले आहे. विविध अनुदानांबरोबरच या उपक्रमामुळे चित्रपट निर्मात्यांसाठी व्यवसाय सुलभता वाढली आहे. डॉ. मुरुगन यांनी इफ्फी (IFFI ) मध्ये सुरू करण्यात आलेल्या क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो (CMOT), या उपक्रमाचा उल्लेख केला, ज्यामध्ये शंभर सृजनशील चित्रपट निर्मात्यांना चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शन मिळवण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल.
जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या इफ्फी (IFFI) मध्ये सहभागी होण्यासाठी 1000 हून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. प्रख्यात ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नॉयस यांना यंदाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना इफ्फी (IFFI) ला गौरव वाटत असल्याचे डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले.
"चित्रपट महोत्सवाचा उद्देश, लोकांना जवळ आणणे आणि एकमेकांची कथा एकमेकांना सांगणे हा असला पाहिजे"
“चला एकमेकांना एक गोष्ट सांगू”, अशी विनंती दिग्गज चित्रपटकर्मी शेखर कपूर यांनी केली. ते म्हणाले, "ध्रुवीकरण झालेल्या जगात, देशात आणि अनेक देश आणि समुदायांमध्ये, एकमेकांशी बोलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे कथा सांगणे". आणि म्हणून त्यांनी विनंती केली, "चला एकमेकांना एक गोष्ट सांगूया!" कथा एकमेकांशी निगडित होण्यासाठी आणि जाणण्यासाठी असतात, असेही ते म्हणाले. एकमेकांची कहाणी सांगितल्याने आपण एकमेकांच्या जवळ येऊ आणि जगातील अनेक समस्या सोडवल्या जातील आणि म्हणून आपल्याला चित्रपट महोत्सव भरवत राहावे लागतील, असे मत या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने व्यक्त केले. भारतात सर्वात मोठा चित्रपट उद्योग आहे आणि तो जगातील सर्वात मोठा आशय निर्माता आणि आशय ग्राहक आहे, असेही ते पुढे म्हणाले. हा चित्रपट महोत्सव केवळ चित्रपट निर्मात्यांनीच नव्हे तर प्रेक्षकांनीही साजरे करण्याचे आवाहन, इफ्फी महोत्सवाचे संचालक शेखर कपूर यांनी केले.
"संपूर्ण जग एक कथा सांगण्याचे व्यासपीठ आहे"
आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हेही मान्यवरांमध्ये उपस्थित होते. या प्रसंगी श्री श्री रविशंकर म्हणाले, "प्रत्येक जीवन हे एका चित्रपटासारखे आहे. मी लोकांना भेटलो आणि त्यांच्या कथा ऐकल्या. संपूर्ण जग हे कथा सांगण्याचे व्यासपीठ आहे". आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी असेही सांगितले की, आपल्या देशात प्राचीन काळापासून देव देखील काही प्रकारे मनोरंजन आणि कलेशी जोडलेले आहेत, जसे भगवान शिव डमरू वाजवतात, देवी सरस्वती वीणा वाजवतात, भगवान कृष्ण बासरी वाजवतात. भारतीय संस्कृती ही मनोरंजनात गुंतलेली आहे आणि त्यामुळेच आपल्याला आनंदी जीवन जगता येते. त्यांनी तरुण चित्रपट निर्मात्यांना भारतीय चित्रपट उद्योगाचा आनंद निर्देशांक वरच्या स्थानावर असावा हे सुनिश्चित करण्याचे आवाहन केले. कोलंबियाच्या गृहयुद्धावरील आणि श्री श्री रविशंकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या प्राथमिक दर्शनाचे अनावरण, निर्माते श्री महावीर जैन यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
"भारतीय चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या चार दिग्गजांवर या महोत्सवाममध्ये विशेष तिकिटाचे अनावरण करण्यात आले. यामध्ये राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी या दिग्गजांचा समावेश आहे. "
इफ्फीमध्ये यंदा राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव (एएनआर) आणि मोहम्मद रफी यांच्या चित्रपटातील महान कारकिर्दीला अभिवादन करण्यात येणार आहे. यामध्ये त्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येईल तसेच संवादात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. या माध्यमांमुळे महोत्सवासाठी आलेल्या प्रतिनिधींना या दिग्गज व्यक्तिमत्त्वांची चित्रपट क्षेत्रातील महान योगदानाची जवळून माहिती घेता येऊ शकेल. भारतीय चित्रपटसृष्टीतील या चार दिग्गजांवर एका विशेष तिकिटाचे अनावरण करण्यात आले. माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांच्यासह, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विशेष सचिव नीरजा शेखर, महाराष्ट्र टपाल मंडळाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल (सीपीएमजी) अमिताभ सिंह, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार, सहसचिव (चित्रपट), वृंदा मनोहर देसाई, महोत्सव संचालक शेखर कपूर, प्रसिध्द अभिनेते आणि दिग्गज अभिनेते अक्किनेनी नागेश्वर राव यांचे चिरंजीव नागार्जुन, आणि प्रसिध्द पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या स्नुषा फिरदौस रफी उपस्थित होते . यावेळी बोलताना माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू म्हणाले, "इफ्फी यावर्षी भारतीय चित्रपटसृष्टीतील चार दिग्गजांचा उत्सव साजरा करत आहे, याबद्दल सर्वांमध्येच अतिशय समाधानाची भावना निर्माण झाली असून इफ्फीमध्ये भारतीय चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची कारकीर्द साजरी करीत आहे, याचे सर्वांना कौतुक वाटत आहे!" असेही ते म्हणाले.
यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि महोत्सव संचालक शेखर कपूर यांनी 55 व्या इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे परीक्षक सदस्य - आशुतोष गोवारीकर (अध्यक्ष), अँथनी चेन, एलिझाबेथ कार्लसेन, फ्रान बोर्जिया आणि जिल बिलकॉक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आर. सरथ कुमार, प्रणिता सुभाष यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
पदार्पणातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट' या नव्याने समाविष्ट केलेल्या श्रेणीसाठी देखील ज्युरी सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात संतोष सिवन (ज्युरी अध्यक्ष), एम.व्ही. रघु, सुनील पुराणिक, शेखर दास आणि विनित कनोजिया यांचा समावेश आहे.
इंडियन पॅनोरमा मधील फीचर फिल्म श्रेणीसाठी ज्युरी सदस्यांमध्ये डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी (ज्युरी अध्यक्ष), मनोज जोशी, सुष्मिता मुखर्जी, हिमांशू शेखर खटुआ, ओयनम गौतम, आशु त्रिखा, एस.एम. पाटील, नीलाभ कौल, सुसंत मिश्रा, अरुण कुमार बोस, रत्नोत्तमा सेनगुप्ता, समीर हंचाटे आणि प्रिया कृष्णस्वामी यांचा समावेश आहे. तर इंडियन पॅनोरमा मधील नॉन फीचर फिल्म ज्युरीमध्ये सुब्बय्या नल्लामुथू (ज्युरी अध्यक्ष), रजनी आचार्य, रोनेल होबम, उषा देशपांडे, वंदना कोहली, मिथुनचंद्र चौधरी आणि शालिनी शाह यांचा समावेश आहे.
इफ्फीच्या उदघाटनपर सोहळ्यात ‘क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ अर्थात उद्याचे सर्जनशील कलावंत या उपक्रमाविषयी देखील घोषणा करण्यात आली. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या 55व्या आवृत्तीत ‘युवा चित्रपटनिर्माते’ – “भविष्य इथेच आहे” या संकल्पनेवर आधारित उदयोन्मुख प्रतिभावंत युवा चित्रपटनिर्मात्यांच्या क्षमतेला वाव दिला जातो.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | JPS/Tupe/Patil/Ashutosh/Rajshree/Suvarna/Sushma/Bhakti/Darshana | IFFI 55
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 2075271)
Visitor Counter : 40