माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खोट्या बातम्यांचा सामना करण्यासाठी आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी डिजिटल मीडियामध्ये जबाबदारीचे भान राखण्याचे केले आवाहन

Posted On: 16 NOV 2024 7:19PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय पत्रकार दिन 2024 निमित्त भारतीय प्रेस कौन्सिलने नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री, डॉ. एल. मुरुगन, प्रेस कौन्सिलच्या अध्यक्ष आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिव न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई आणि ज्येष्ठ पत्रकार कुंदन रमणलाल व्यास  हे यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खोट्या बातम्यांचा सामना करण्यासाठी आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी डिजिटल मीडियामध्ये जबाबदारीचे भान राखण्याचे आवाहन केले. 35,000 नोंदणीकृत वृत्तपत्रे, असंख्य वृत्तवाहिन्या आणि एक मजबूत डिजिटल पायाभूत सुविधा यांचा समावेश असलेली भारताची ऊर्जाशील आणि वैविध्यपूर्ण माध्यम परिसंस्था त्यांनी अधोरेखित केली. 4G आणि 5G नेटवर्कमधील गुंतवणुकीने भारताला जागतिक स्तरावर सर्वात कमी डेटा किमतीसह डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये आघाडीचे स्थान मिळवून दिले आहे, असे त्यांनी नमूद केले.

मात्र माध्यमे आणि वृत्तपत्रांच्या  बदलत्या स्वरूपामुळे  आपल्या समाजासमोर उभ्या ठाकलेल्या चार प्रमुख आव्हानांकडे त्यांनी लक्ष वेधले, ज्यामध्ये 1. खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती 2. आशय निर्मात्यांसाठी रास्त मोबदला 3. त्रुटी, आणि 4. बौद्धिक संपदा अधिकारांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव यांचा समावेश होता.

वैष्णव यांनी संबंधितांना राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन या आव्हानांना तोंड देण्यासाठी खुली चर्चा आणि सहयोगी प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ म्हणून माध्यमांची भूमिका जपण्याच्या आणि 2047 पर्यंत सौहार्दपूर्ण आणि समृद्ध विकसित भारत निर्माण करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

डिजिटल युगाच्या दिशेने अग्रेसर : खोट्या बातम्यांचा सामना करणे आणि नैतिक पत्रकारिता कायम राखणे

पारंपारिक मुद्रण ते उपग्रह वाहिनी आणि आता डिजिटल युगापर्यंतच्या पत्रकारितेच्या उत्क्रांतीचा उल्लेख करत डॉ. मुरुगन यांनी आज जलद गतीने बातम्या लोकांपर्यंत पोहोचतात असे नमूद केले. त्याचबरोबर त्यांनी खोट्या  बातम्यांच्या वाढत्या आव्हानावर भर दिला, ज्याचे वर्णन त्यांनी “व्हायरसपेक्षा वेगाने” असे केले.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2073950) Visitor Counter : 41