iffi banner
माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महात्मा गांधींच्या शांतता आणि अहिंसेच्या संदेशांचे पुनरुज्जीवन : 55 व्या इफ्फीमध्ये प्रतिष्ठित आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकासाठी दहा चित्रपटांमध्ये स्‍पर्धा


इफ्फी महोत्सवात दिले जाणार आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक : शांती आणि मानवतेला चित्रपटाव्‍दारे आदरांजली

#IFFIWood, 12 नोव्हेंबर 2024

गोव्यात लवकरच सुरु होणाऱ्या 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रतिष्ठीत आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकासाठी नामनिर्देशित झालेल्या चित्रपटांच्या नावांची अधिकृत घोषणा झाली. पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट, दूरचित्रवाणी तसेच दृकश्राव्य संवाद परिषद (आयसीएफटी) आणि संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था (युनेस्को) यांच्या संयुक्त भागीदारी द्वारे हा जागतिक पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार आंतर सांस्कृतिक संवाद आणि शांततेला प्रोत्साहन देतानाच महात्मा गांधीजींचे  आदर्श विचार, विशेषतः अहिंसा, सहिष्णुता आणि सामाजिक एकोपा या तत्वांना मूर्त स्वरुपात सादर करणाऱ्या चित्रपटांचा सन्मान करतो.

यावर्षी, या पुरस्कारासाठी दहा उल्लेखनीय चित्रपटांचे नामांकन करण्यात आले असून त्यापैकी प्रत्येक चित्रपट वेगवेगळ्या भागाचे, संस्कृतीचे आणि शैलीचे प्रतिनिधित्व करत असूनही गांधीवादी तत्वांविषयी त्यांची वचनबद्धता त्यांना एका छत्राखाली आणते.इसाबेल डॅनेल (एफआयपीआरईएससीआय-आंतरराष्ट्रीय चित्रपट परीक्षक महासंघ या संस्थेच्या सन्माननीय अध्यक्ष), सर्ज मायकेल (सीआयसीटी-आयसीएफटीचे उपाध्यक्ष), मारिया ख्रिस्टीना इग्लेसियास (युनेस्कोच्या सांस्कृतिक क्षेत्र विषयक कार्यक्रमांसाठीचे माजी प्रमुख), डॉ.अहमद बेदजॉई (अल्गीयर्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलाविषयक संचालक) आणि शुयान हुन (सीआयसीटी-आयसीएफटी युवा शाखेच्या सर्जकता आणि नवोन्मेष विषयक मंचाचे संचालक) यांसारख्या प्रख्यात व्यक्तींचा समावेश असलेले प्रतिष्ठित परीक्षक मंडळ या चित्रपटांचे परीक्षण करणार आहे. या चित्रपटांची नैतिक खोली, कलात्मक उत्कृष्टता आणि प्रेक्षकांना विशेषतः तरुणांना गुंगवून ठेवण्याची आणि शिक्षित करण्याची त्यांची क्षमता यांच्या आधारावर या चित्रपटांचे मूल्यमापन करण्यात येईल.

खालील चित्रपट आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक 2024 साठी नामनिर्देशित झाले आहेत:

  • क्रॉसिंग

अँड देन वुई डान्स्ड या 2019 सालच्या चित्रपटासाठी सुप्रसिध्द असलेल्या लीवन अकीन या स्वीडनच्या दिग्दर्शकाने इस्तंबूलच्या ट्रान्सजेंडर समुदायातील व्यक्तींचे अन्वेषण करणारा हा मर्मभेदक चित्रपट तयार केला आहे. लिया या निवृत्त शिक्षिकेने तिची पुतणी/भाची टेकला हिच्या शोधासाठी केलेल्या प्रवासाद्वारे हा चित्रपट वर्ग, लिंग आणि लैंगिकता यांच्या संकल्पनांतून विहार करतो. सारखेपणा आणि कायापालट यांवर भर देणाऱ्या या चित्रपटाने बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये टेडी ज्युरी पारितोषिक जिंकले आहे.

  • फॉर राना  

इराणी चित्रपट निर्माता इमान याझदी यांच्या या पहिल्याच चित्रपटाचा प्रीमियर  बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये सादर झाला. पोटच्या मुलीच्या हृदय प्रत्यारोपणासाठी धडपडणाऱ्या जोडप्याची हृदयद्रावक कथा मांडतानाच हा चित्रपट आपल्यासमोर प्रेम, हानी तसेच वैद्यकीय पर्याय निवडीची नैतिकता यांच्या संदर्भात गहन प्रश्न उभे करतो.

  • लेसन लर्न्ड (फेकेते पाँट)

बॅलिंट झिम्लर या हंगेरीच्या दिग्दर्शकाच्या जबरदस्त पदार्पणातील लेसन लर्न्ड हा चित्रपट हंगेरीमधील शैक्षणिक आपत्तीचे एका क्षुब्ध मुलाच्या नजरेतून परीक्षण करतो. तीक्ष्ण सामाजिक भाष्याबद्दल नावाजलेल्या या चित्रपटाची लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 2024 मध्ये बरीच प्रशंसा झाली.

  • मिटिंग विथ पोल पॉट (रेन्देझ-वोस अवेक पोल पॉट)

एलिझाबेथ बेकर यांच्या “व्हेन द वॉर वॉज ओव्हर” पासून प्रेरित, कंबोडियाचे चित्रपट निर्माते रिथी पॅन यांचा हा चिंतनशील चित्रपट 1978 साली कंबोडिया मध्ये असलेल्या पोल पॉटच्या शासनाच्या भीतीला विरोध करणाऱ्या तीन फ्रेंच पत्रकारांची कथा सांगतो. कान्स 2024 या महोत्सवात सादर झालेल्या या चित्रपटाने त्यातील भावनात्मक खोली आणि ऐतिहासिक अचूकतेसाठी परीक्षकांची वाहवा मिळवली.

  • सतू- सशाचे वर्ष

लाओसमध्ये आयोजित रेनडान्स चित्रपट महोत्सव 2024 मध्ये पदार्पणात पुरस्कार मिळवणारा जोशुआ ट्रिग यांचा हा चित्रपट आईचा शोध घेणाऱ्या भटक्या मुलाची मार्मिक कथा सांगतानाच जगणे, मैत्री आणि लवचिकता या संकल्पनांचा शोध घेतो.

  • ट्रान्सामाझोनिया

पिआ मराईस या दक्षिण आफ्रिकेच्या चित्रपट निर्मात्याने सदर चित्रपटाच्या माध्यमातून ब्राझीलच्या अमेझॉनमध्ये घडणारे वातावरणीय नाट्य सजीव केले आहे. या चित्रपटात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांपासून स्वतःच्या देशी समुदायाचे संरक्षण करण्यासाठी लढणाऱ्या हीलर स्त्रीचे चित्रण आहे. यावर्षीच्या लोकार्नो आणि टोरांटो या चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट पर्यावरणीय तसेच सामाजिक न्यायाचे छेदांचे दर्शन घडवतो.

  • अनसिंकेबल (सिंकेफ्री)

वास्तव जीवनातील 1981 मध्ये घडलेल्या आरएफ2 शोकांतिकेवर आधारलेला अनसिंकेबल हा थरारक दानिश चित्रपट या अपघातात वडिलांच्या सहभागाचा शोध घेणाऱ्या हेन्रिकच्या तपासाचे वर्णन करतो. या चित्रपटात दुःख, अपराधीपणा आणि कुटुंबातील गुंतागुंतीचा आकर्षक पट मांडला आहे.

  • आमार बॉस

दिग्दर्शक नंदिता रॉय आणि शिबोप्रसाद मुखर्जी यांच्या या हृदयस्पर्शी चित्रपटाद्वारे दिग्गज अभिनेत्री राखी गुलजार यांनी 20 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या आई आणि मुलाची हृदयंगम कथा सांगणारा हा चित्रपट कुटुंब व्यवस्था आणि महत्त्वाकांक्षा यांच्यातील गुंतागुंतीचा शोध घेतो.

  • जुईफूल

आसामी चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री जदुमोनी दत्ता यांचा हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ईशान्य भारतातील हिंसक सीमा संघर्षांच्या पार्श्वभूमीवर दोन मातांमधील नात्याचे वर्णन करतो. या चित्रपटातून संघर्ष, करून आणि मातृत्वाच्या व्यक्तिगत तसेच सामाजिक आयामांचा शोध घेण्यात आला आहे.

  • श्रीकांत

तुषार हिरानंदानी दिग्दर्शित या चरित्रपटात राजकुमार राव आणि आलया एफ. यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट एमआयटी या शिक्षणसंस्थेत प्रवेश घेण्यासाठी सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करणाऱ्या आणि व्यापारविश्वात यशस्वी होऊन दाखवलेल्या श्रीकांत बोल्ला या अधू दृष्टी असलेल्या उद्योजकाच्या प्रेरणादायक सत्यकथेचे चित्रण करतो.

आयसीएफटी युनेस्को गांधी पदकाविषयी माहिती

46 व्या इफ्फी मध्ये सुरु करण्यात आलेल्या आयसीएफटी युनेस्को गांधी पदक पुरस्काराद्वारे उच्च कलात्मक आणि चित्रपटीय मापदंड असलेल्या चित्रपटांसोबतच समाजातील सर्वात गंभीर समस्यांचे नैतिक प्रतिबिंब सादर करण्याला प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटांचा गौरव करण्यात येतो. चित्रपटाच्या परिवर्तनकारी सामर्थ्याच्या माध्यमातून मानवतेच्या सामायिक मूल्यांच्या अधिक गहन आकलनाची जोपासना करण्यासाठी या पारितोषिकाची सुरुवात करण्यात आली.
आयसीएफटी युनेस्को गांधी पदक हे केवळ एक पारितोषिक नव्हे; तर चित्रपटांमध्ये असलेल्या प्रेरित करण्याच्या, शिक्षित करण्याच्या आणि एकत्रीकरणाच्या क्षमतेचा सोहोळा आहे. गोवा येथे आयोजित इफ्फी 2024 महोत्सवाच्या समारोप समारंभात आयसीएफटी युनेस्को गांधी पदकाच्या विजेत्याची घोषणा करण्यात येईल. यावेळी पारितोषिक प्राप्त चित्रपटाला प्रमाणपत्र आणि प्रतिष्ठित गांधी पदक देऊन गौरवण्यात येईल.


अधिक माहितीसाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा: https://iffigoa.org/

PIB Mumbai | S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 
iffi reel

(Release ID: 2072822) Visitor Counter : 100