वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारी इ मार्केट (GeM) पोर्टलवर बियाण्यांच्या 170 श्रेणी विक्रीसाठी दाखल

Posted On: 04 NOV 2024 1:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2024

शेती व बागकामासाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारी इ मार्केट (GeM) पोर्टल वर बियाण्यांचे 170 श्रेणी   विक्रीसाठी दाखल झाले आहेत. या पोर्टलवर आता बियाण्यांची सुमारे 8,000 वाणे उपलब्ध असून येणाऱ्या शेतकी हंगामात राज्य तसेच केंद्रसरकारी कंपन्यांना देशभरात पुढील वितरणासाठी उपयोगी पडावीत यादृष्टीने त्यांची रचना केली आहे.

सर्व राज्यांतील बियाणे महामंडळे व संशोधन संस्थांची मते विचारात घेऊन GeM पोर्टलवर या बियाण्यांच्या श्रेणी/प्रकारांचा समावेश केला असून, भारत सरकारचे विद्यमान नियम तसेच  मानकांप्रमाणे या बियाण्यांची मागणी नोंदवण्यासाठी पोर्टलवर तयार प्रणाली उपलब्ध आहे. यामुळे बियाण्यांची मागणी नोंदवण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.

पोर्टलद्वारे बियाण्यांच्या मागण्या त्यांच्या श्रेणीबरहुकूम नोंदवल्या जाव्यात या सरकारच्या धोरणाला अनुसरून पोर्टलची रचना केली आहे. बियाण्यांच्या श्रेणी अथवा प्रकारानुरूप मागण्या नोंदवल्यामुळे निविदाप्रक्रिया जलद होईल, सरकारी मागण्या नोंदवण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता येईल, त्याचबरोबर देशभरातील बियाणेविक्रेत्यांचा सहभाग वाढेल.

सरकारी निविदाप्रक्रियेत मुक्तपणे सहभागी होण्यासाठी विक्रेत्यांनी या नव्या बियाणे श्रेणीरचनेचा लाभ घेऊन पोर्टलवर आपली हजेरी लावावी, तसेच  बियाणे महामंडळे व  राज्यसरकारी संस्थांनी दर्जेदार बियाणे किफायतशीर दरात मिळवण्यासाठी या श्रेणीबद्ध रचनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जेम पोर्टलच्या उप कार्यकारी अधिकारी रोली खरे यांनी केले आहे.

 


Jaydevi PS/U.Raikar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


 

 

 


(Release ID: 2070559) Visitor Counter : 69