संरक्षण मंत्रालय
राजेश कुमार सिंग यांनी संरक्षण सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला
Posted On:
01 NOV 2024 11:25AM by PIB Mumbai
राजेश कुमार सिंग यांनी आज म्हणजे 1 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत साऊथ ब्लॉक येथे संरक्षण सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला.
राजेश कुमार सिंग हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1989 च्या तुकडीचे केरळ केडरचे अधिकारी असून 20 ऑगस्ट 2024 पासून ते विशेष कार्य अधिकारी या संरक्षण सचिव दर्जाच्या पदाचा कार्यभार सांभाळत होते.
पदभार स्वीकारण्यापूर्वी राजेश कुमार यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन शहिदांना पुष्पांजली वाहिली आणि अभिवादन केले. “ मातृभूमीच्या सेवेसाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या आपल्या शूर सैनिकांच्या ऋणात राष्ट्र नेहमीच राहील. त्यांचे अतुलनीय शौर्य आणि त्याग हे भारताला सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी आम्हाला नेहमीच बळ आणि प्रेरणा देणारे स्रोत आहेत.”, असे त्यांनी यावेळी सांगितले.
याआधी 24 एप्रिल 2023 ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत राजेश कुमार सिंग हे उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार या विभागाचे सचिव म्हणून वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात कार्यभार सांभाळत होते. त्याआधी त्यांनी मत्स्य पालन दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्रालयाच्या पशुपालन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
केंद्र सरकारमध्ये शहरी विकास मंत्रालयात बांधकाम आणि नागरी वाहतूक संचालक, आयुक्त (जमीन)-डी. डी. ए., पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय तसंच कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग यामध्ये संयुक्त सचिव आणि भारतीय अन्न महामंडळात मुख्य दक्षता अधिकारी अशा इतर अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.
31 ऑक्टोबर 2024 रोजी सेवानिवृत्त झालेले 1988 च्या तुकडीचे आंध्र प्रदेश केडरचे भारतीय प्रशासकीय अधिकारी गिरीधर अरमाने यांच्या जागी आर के सिंग नियुक्त झाले आहेत.
***
S.Kane/V.Sahajrao/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2070081)
Visitor Counter : 44