राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान
Posted On:
22 OCT 2024 4:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (22 ऑक्टोबर 2024) नवी दिल्ली येथे पाचवे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान केले.
याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, पाणी ही प्रत्येक व्यक्तीची मूलभूत गरज आणि मूलभूत मानवी अधिकार आहे. स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेची खात्री स्वच्छ आणि समृद्ध समाज निर्माण होऊ शकत नाही. पाण्याची अनुपलब्धता आणि अस्वच्छतेचा वंचित वर्गाच्या आरोग्य, अन्न सुरक्षा आणि उपजीविकेवर गंभीर परिणाम होतो.
राष्ट्रपती म्हणाल्या की, पृथ्वीवर गोड्या पाण्याचे स्रोत मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत हे सर्वज्ञात असूनही आपण जलसंवर्धन आणि व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करतो. मानवनिर्मित कारणांमुळे हे स्रोत प्रदूषित आणि नष्ट होत आहेत. केंद्र सरकारने जलसंवर्धन आणि जलसंचयनाला चालना देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
राष्ट्रपती म्हणाल्या की, जलसंवर्धन हा आपल्या परंपरेचा भाग आहे. आपले पूर्वज गावाजवळ तलाव बांधायचे. मंदिरात किंवा त्याच्याजवळ जलाशय बांधायचे जेणेकरून पाणी टंचाईच्या काळात हे साठवलेले पाणी वापरता येईल. दुर्दैवाने आपण आपल्या पूर्वजांचे ज्ञान विसरत चाललो आहोत. काही लोकांनी वैयक्तिक स्वार्थासाठी जलाशयांवर अतिक्रमण केले आहे.
याचा केवळ दुष्काळात पाण्याच्या उपलब्धतेवरच परिणाम होत नाही तर अतिवृष्टी झाल्यास पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.
जलस्रोतांचे जतन आणि संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवण्याची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली. आपल्या सक्रीय सहभागाशिवाय जल-सुरक्षित भारत निर्माण करणे अशक्य आहे. आपण आपल्या घरातील पाण्याचे नळ व्यवस्थित बंद केले, घरावरील पाण्याच्या टाक्या भरून वाहणार नाहीत याची खबरदारी घेतली, घरोघरी जलसंचयनाची व्यवस्था केली आणि पारंपरिक जलसाठ्यांचे एकत्रितपणे नूतनीकरण केले तर अशा छोट्या छोट्या प्रयत्नातून आपण महत्वपूर्ण योगदान देऊ शकतो यावर त्यांनी प्रकाश टाकला.
जलस्रोतांशी निगडित दृष्टिकोन आणि कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय जल पुरस्कार हे एक स्तुत्य पाऊल असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुरस्कार विजेत्यांच्या "उत्कृष्ट सवयी" लोकांपर्यंत पोहोचतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाण्याच्या महत्त्वाविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्यांना सर्वोत्तम पाणी वापर पद्धती अवलंबण्यास प्रवृत्त करणे हे राष्ट्रीय जल पुरस्कारांचे उद्दिष्ट आहे. पाचवे राष्ट्रीय जल पुरस्कार नऊ श्रेणींमध्ये प्रदान करण्यात आले - सर्वोत्कृष्ट राज्य, सर्वोत्कृष्ट जिल्हा, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था, सर्वोत्कृष्ट शाळा किंवा महाविद्यालय, सर्वोत्कृष्ट उद्योग, सर्वोत्कृष्ट जल वापरकर्ता संघ, सर्वोत्कृष्ट संस्था (शाळा किंवा महाविद्यालयाव्यतिरिक्त), आणि सर्वोत्कृष्ट नागरी समाज.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -
S.Patil/S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2067039)
Visitor Counter : 67