नौवहन मंत्रालय
‘दीपगृह पर्यटन परिषद 2024’ ने दुसऱ्या राष्ट्रीय दीपगृह महोत्सवाला प्रारंभ
Posted On:
19 OCT 2024 4:39PM by PIB Mumbai
दुसऱ्या राष्ट्रीय दीपगृह महोत्सवाच्या आजच्या पहिल्या दिवशी, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने पुरी येथे दीपगृह पर्यटन परिषद 2024 चे आयोजन केले होते, ज्यामध्ये सरकारी अधिकारी, पर्यटन तज्ञ आणि संरक्षणवादयांसह 100 पेक्षा जास्त जण सहभागी झाले. दीपगृह पर्यटनाची अफाट क्षमता आणि वारसा संवर्धनाशी पर्यटन विकासाची सांगड घालून या सागरी संरचनांचे जतन करण्यासाठी धोरणे आखणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
पारंपारिक दीपप्रज्वलनानंतर, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांचे बीजभाषण झाले. आपल्या भाषणात त्यांनी स्थानिक अर्थव्यवस्थांना चालना देण्यासाठी आणि भारताचा समृद्ध सागरी वारसा जतन करण्याचे साधन म्हणून दीपगृह पर्यटन विकसित करण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी सर्व अभ्यागतांना या ठिकाणांना भेट देण्यासाठी तसेच वारसा आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाफ अनुभवण्यासाठी आमंत्रित केले.
दीपगृह आणि दीपनौका महासंचालनालयाने तपशीलवार सादरीकरणाद्वारे भारतातील दीपगृह पर्यटनाची सद्यस्थिती आणि भविष्यातील संधी यांची माहिती देताना, सुरु असलेले विविध उपक्रम अधोरेखित केले. 60 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली 9 किनारी राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात 75 महत्वपूर्ण दीपगृहे विकसित करण्यात आली आहेत.
2023-24 या एका आर्थिक वर्षात, 75 समर्पित दीपगृहांनी 16 लाख पर्यटकांना आकर्षित केले. चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सप्टेंबर 2024 पर्यंत, 10 लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली आहे. या घडामोडींमुळे आसपासच्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, टूर ऑपरेटर्स, वाहतूक सेवा आणि स्थानिक दुकाने तसेच कारागीरांमध्ये 150 प्रत्यक्ष आणि 500 अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
सादरीकरणानंतर दोन सहभागात्मक पॅनेल सत्रे पार पडली. पहिले सत्र “दीपगृह पर्यटन आणि वारसा” यावर केंद्रित होते, तर दुसरे सत्र “दीपगृहांचे जतन आणि संवर्धन” या विषयावर केंद्रित होते. या परस्पर संवादाने भारतात दीपगृह पर्यटन बळकट करण्यासाठी प्रमुख उद्योगांमधील सहकार्याला प्रोत्साहन दिले.
या परिषदेच्या माध्यमातून, इतिहास आणि पर्यटनाच्या अद्वितीय मिलाफाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दीपगृहांबद्दल तसेच भावी पिढ्यांसाठी त्यांचे जतन कसे आवश्यक आहे, याबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाने दीपगृह पर्यटन क्षेत्रातील आगामी उपक्रम आणि सहकार्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
***
M.Pange/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2066374)
Visitor Counter : 96