राष्ट्रपती कार्यालय
भारताच्या राष्ट्रपतींनी दिली मॉरिटानियाला भेट
मॉरिटानियाच्या अध्यक्षांची घेतली भेट, शिष्टमंडळ स्तरीय चर्चेचे केले नेतृत्व
राष्ट्रपती मुर्मू यांनी मॉरिटानियामधील भारतीय समुदायाला केले संबोधित
भारतीय समुदायाचे कौशल्य, विद्वत्ता आणि अनुभव यांचे भारताच्या प्रगतीसाठी विशेष महत्त्व आहेः राष्ट्रपती मुर्मू
राजनैतिक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण, व्हिसा एग्झेम्प्शन आणि परदेशी कार्यालय संवाद या क्षेत्रातील चार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या आणि देवाणघेवाण
Posted On:
17 OCT 2024 2:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2024
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल (16 ऑक्टोबर, 2024) अल्जेरिया, मॉरिटानिया आणि मलावीच्या सरकारी भेटीच्या दुसऱ्या टप्प्यात मॉरिटानियाला भेट दिली. नूकशोत-उमटून्सी विमानतळावर दाखल झाल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मॉरिटानियाचे अध्यक्ष मोहम्मद औल्द गझनी यांनी अतिशय जिव्हाळ्याने आणि समारंभपूर्वक स्वागत केले. यावेळी मॉरिटानियाचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मॉरिटानियाला एखाद्या भारतीय राष्ट्रपतींनी दिलेली ही पहिलीच भेट आहे. यावेळी राष्ट्रपतींसोबत राज्यमंत्री सुकांता मजुमदार आणि खासदार मुकेशकुमार दलाल आणि अतुल गर्ग होते. मॉरिटानियामधील भारतीय राजदूतांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात राष्ट्रपतींनी मॉरिटानियामधील भारतीय समुदायाला संबोधित केले.
लहानशा परंतु अतिशय उत्साही असलेल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना राष्ट्रपतींनी भारतीय समुदायाने मॉरिटानियाच्या सामाजिक-आर्थिक विकासात दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांचे कौशल्य, विद्वत्ता आणि अनुभव भारताच्या प्रगतीसाठी देखील महत्त्वाचे आहेत, असे त्या म्हणाल्या.
मॉरिटानियाचे सरकार आणि तेथील जनतेने भारतीय समुदायाला दिलेल्या पाठबळाचे राष्ट्रपतींनी कौतुक केले. त्यांच्या समावेश आणि आतिथ्यशील भावनेमुळे मॉरिटानियामध्ये भारतीय समुदायाची भरभराट होत आहे, असे त्यांनी सांगितले. समुदायाच्या स्वागत समारंभानंतर राष्ट्रपतींनी राष्ट्रपती प्रासादाला भेट दिली जिथे त्यांनी अध्यक्ष मोहम्मद औल्द गझनी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि मॉरिटानिया दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या मार्गांबाबत चर्चा केली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेचे नेतृत्व केले आणि त्यांच्या उपस्थितीत राजनैतिक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण, व्हिसा एग्झेम्प्शन आणि परदेशी कार्यालय संवाद या क्षेत्रातील चार सामंजस्य करार करण्यात आले.
त्यापूर्वी मॉरिटानियाचे परराष्ट्र व्यवहार, सहकार्य आणि परदेशस्थ मॉरिटानियन्स कल्याण मंत्री मोहम्मद सालेम औल्द मर्जग यांनी राष्ट्रपतींची स्वतंत्र भेट घेतली.
त्यानंतर राष्ट्रपती मलावी या त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यासाठी रवाना झाल्या.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा-
H.Akude/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2065731)
Visitor Counter : 44