पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी केली


महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे केले उद्घाटन

नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरण प्रकल्पाची केली पायाभरणी

शिर्डी विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीसाठी केली पायाभरणी

इंडियन इन्स्टीट्युट ऑफ स्किल्स मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र, महाराष्ट्र चे केले उद्घाटन

महाराष्ट्रात सुरू केलेल्या प्रकल्पांमुळे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होईल, संपर्कव्यवस्थेला चालना मिळेल आणि युवा वर्गाचे सक्षमीकरण होईल-पंतप्रधान

Posted On: 09 OCT 2024 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात सुमारे 7600 कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नूतनीकरण प्रकल्पाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी यांचा समावेश होता. महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि इंडियन इन्स्टीट्युट ऑफ स्कील्स(IIS), मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र, महाराष्ट्र (VSK) यांचे  उद्घाटनही त्यांनी यावेळी  केले.

या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की महाराष्ट्राला 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण आणि विस्तार तसेच शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची उभारणी या प्रकल्पांसह महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची भेट दिली जात आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आजच्या विकास प्रकल्पांसाठी अभिनंदन केले.

30.000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी मुंबई आणि ठाण्याला दिलेल्या भेटीचे स्मरण करत पंतप्रधानांनी मेट्रो जाळ्याचा विस्तार, विमानतळांचे नूतनीकरण, महामार्ग प्रकल्प, पायाभूत सुविधा, सौर ऊर्जा आणि टेक्सटाईल पार्क यांसारखे हजारो कोटींचे विकास प्रकल्प यापूर्वीच विविध जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले. शेतकरी, मच्छिमार आणि पशुपालकांसाठी नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत तर वाढवण बंदर या भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर बंदराची पायाभरणीही महाराष्ट्रात झाली आहे, असे ते म्हणाले. “ महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधीही इतक्या वेगाने, इतक्या मोठ्या प्रमाणावर विविध क्षेत्रांमध्ये विकास झालेला नाही”, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली.

मराठीला अभिजात भाषा म्हणून नुकत्याच मिळालेल्या दर्जाची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा एखाद्या भाषेला योग्य तो सन्मान मिळतो तेव्हा केवळ शब्दांनाच नव्हे तर संपूर्ण पिढीला आवाज मिळतो. यामुळे कोट्यवधी मराठी बांधवांचे स्वप्न साकार झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा आऩंद महाराष्ट्राच्या जनतेने साजरा केला, असे त्यांनी सांगितले. आपल्याला महाराष्ट्रातील विविध गावांमधील लोकांकडून आनंदाचे आणि कृतज्ञतेचे संदेश मिळत होते, अशी माहिती त्यांनी दिली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे श्रेय आपले नसून महाराष्ट्राच्या जनतेचे हे आशीर्वाद आहेत, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील प्रगतीची कामे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महान विभूतींच्या आशीर्वादामुळेच सुरू आहेत, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 

हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकांचे काल प्रसिद्ध झालेले  निकाल आणि हरियाणाच्या मतदारांनी देशातील जनतेच्या मनाचा कल  स्पष्टपणे दाखवून दिला  आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. दोन कार्यकाळ  यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सलग तिसऱ्यांदा हरियाणात मिळालेला विजय ऐतिहासिक होता असे ते म्हणाले.

वैयक्तिक लाभासाठी विभाजनवादी  राजकारण करणाऱ्या आणि मतदारांची दिशाभूल करणाऱ्यांपासून पंतप्रधान मोदी यांनी  सावध राहण्यास सांगितले. भारतातील मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करून त्यांना मतपेढीमध्ये  रूपांतरित करण्याच्या प्रयत्नांकडे त्यांनी लक्ष वेधले आणि हिंदू धर्मातील  जातिवादावर स्वतःच्या  फायद्यासाठी भाष्य करणाऱ्यांप्रती  तिरस्कार व्यक्त केला. राजकीय फायद्यासाठी भारतातील हिंदू समाज तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात मोदींनी इशारा दिला. समाज तोडण्याच्या प्रयत्नांना महाराष्ट्रातील जनता नाकारेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

गेल्या 10 वर्षांत सरकारने देशाच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा ‘महायज्ञ’ सुरू आहे असे  पंतप्रधान म्हणाले. “आज आपण केवळ इमारती बांधत नाही तर निरोगी आणि समृद्ध महाराष्ट्राचा पाया रचत आहोत”, असे सांगत त्यांनी लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे  उद्घाटन करण्यात आल्याचे नमूद केले.   ठाणे, अंबरनाथ, मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भांकदरा आणि गडचिरोली हे जिल्हे लाखो लोकांसाठी सेवेची केंद्रे बनतील असे ते म्हणाले. 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमुळे महाराष्ट्रात आणखी 900 वैद्यकीय जागा तयार होतील आणि राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या सुमारे 6,000 होईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. लाल किल्ल्यावरून देशात 75,000 नवीन वैद्यकीय जागा निर्माण करण्याच्या आपल्या संकल्पाची आठवण करून देत पंतप्रधान म्हणाले की  आजचा कार्यक्रम या दिशेने उचललेले एक मोठे पाऊल आहे.

सरकारने वैद्यकीय शिक्षण सुलभ केले आहे असे सांगून पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील तरुणांसाठी नवीन संधींची दारे खुली झाल्याचे नमूद केले.  गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत जास्त मुले डॉक्टर व्हावीत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.  मोदी म्हणाले की, एकेकाळी अशा प्रकारच्या विशेष अभ्यासासाठी मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध नसण्याचे मोठे आव्हान होते. सरकारने हा भेदभाव संपवला आणि महाराष्ट्रातील युवकांना  मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येईल असे पंतप्रधानानी  सांगितले . युवक मातृभाषेतून शिक्षण घेऊन  डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करतील असेही ते म्हणाले.

जीवन सुखकर करण्याचे  सरकारचे प्रयत्न हे गरिबीविरुद्ध लढण्याचे हे एक मोठे माध्यम आहे असे  पंतप्रधान म्हणाले. गरिबीला आपल्या  राजकारणाचे इंधन बनवल्याबद्दल मागील सरकारांवर टीका करत ते म्हणाले की त्यांच्या सरकारने एका दशकात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. देशातील आरोग्य सेवेतील परिवर्तनाबाबत  मोदी म्हणाले, “आज प्रत्येक गरीब व्यक्तीकडे मोफत वैद्यकीय उपचारांसाठी आयुष्मान कार्ड आहे”. ते पुढे म्हणाले की, 70 वर्षांवरील वृद्धांनाही आता मोफत वैद्यकीय उपचार मिळत आहेत.

जनौषधी केंद्रांमध्ये अत्यावश्यक औषधे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत तसेच हृदयविकाराच्या रुग्णांना हव्या असलेल्या स्टेंट्सच्या किंमती देखील 80 ते 85 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत याची दखल घेत पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की सरकारने कर्करोगावरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या किंमतीदेखील आता कमी केल्या आहेत.सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आता वैद्यकीय उपचार स्वस्त झाले आहेत हे सांगून पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “आज मोदी सरकारने देशातील अत्यंत गरीब व्यक्तीला देखील सामाजिक सुरक्षिततेचे कवच प्रदान केले आहे.”

जेव्हा एखाद्या देशातील युवावर्ग आत्मविश्वासाने भरलेला असतो तेव्हा अशाच देशावर जग विश्वास ठेवते असे त्यांनी ठामपणे सांगितले. आजच्या तरुण भारताचा आत्मविश्वास देशासाठी नव्या भविष्याची कथा लिहित आहे असे नमूद करत पंतप्रधान मोदी यांनी जगभरात शिक्षण, आरोग्यसुविधा तसेच सॉफ्टवेअर विकासाच्या प्रचंड संधी निर्माण होत असताना मनुष्यबळाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून जागतिक समुदाय भारताकडे पाहतो आहे ही बाब ठळकपणे मांडली.  भारतातील तरुणांनी या संधींसाठी सज्ज करण्याच्या इराद्याने सरकार त्यांची कौशल्ये जागतिक मापदंडांना अनुसरून असतील याकडे लक्ष पुरवत आहे. शैक्षणिक आराखडा प्रगत करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या विद्या समीक्षा केंद्रासह विविध प्रकल्पांची सुरुवात तसेच युवा वर्गाची प्रतिभा बाजारपेठेतील मागणीला अनुसरून असण्यासाठी भविष्यवेधी प्रशिक्षण देणाऱ्या मुंबई येथील भारतीय कौशल्य संस्थेचे उद्घाटन इत्यादी बाबींचा  उल्लेख केला. तसेच मोदी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना अंतर्वासितेच्या काळात 5000रुपयांचे विद्यावेतन देणाऱ्या भारताच्या इतिहासातील अशा पहिल्याच मोबादल्यासह अंतर्वासिता या सरकारच्या उपक्रमाची माहिती ठळकपणे मांडली. हजारो कंपन्या आज या उपक्रमाचा भाग होण्यासाठी नोंदणी करत आहेत आणि त्यायोगे तरुणांना मौल्यवान अनुभव मिळवण्यात मदत होणार असून त्यांच्यासाठी नव्या संधी खुल्या होत असल्याबद्दल  याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला.

भारतातील तरुणांसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचे उत्तम परिणाम दिसून येत आहेत असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.भारतातील शैक्षणिक संस्था आज जगभरातील प्रमुख शिक्षण संस्थांसोबत समान स्तरावर उभ्या आहेत असे ते म्हणाले.जागतिक विद्यापीठ मानांकनाने कालच जाहीर केल्यानुसार भारतातील उच्च शिक्षण आणि संशोधन यांची गुणवत्ता सतत वाढते आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले.  

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आजघडीला जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्यामुळे आज संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. आर्थिक प्रगतीमुळे अनेक क्षेत्रांत, विशेषतः कित्येक दशके दुर्लक्षित राहिलेल्या क्षेत्रांमध्ये नव्या संधी निर्माण वोट आहेत याची नोंद घेत पंतप्रधान म्हणाले, “जागतिक अर्थव्यवस्थेचे भविष्य भारतामध्ये आहे.” अधिक स्पष्टीकरणासाठी त्यांनी पर्यटन क्षेत्राचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, महाराष्ट्राचा अनमोल वारसा, सुंदर नैसर्गिक स्थळे आणि धार्मिक केंद्रे यांचा वापर करून या राज्याला एक अब्ज-डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या भूतकाळात वाया गेलेल्या संधींकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

सध्याच्या सरकारला विकास आणि वारसा अशा दोन्ही बाबी महत्त्वाच्या वाटतात यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारताच्या समृद्ध भूतकाळाकडून प्रेरणा घेऊन उज्ज्वल भविष्य घडवण्याचा मानस व्यक्त करत पंतप्रधानांनी शिर्डी विमानतळ परिसरात नवीन टर्मिनल, नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण यांसह महाराष्ट्रात सुरु असलेल्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख केला.

साई बाबांच्या भक्तांना शिर्डी विमानतळ परिसरातील नव्या टर्मिनलचा खूप फायदा होणार असून देश परदेशातून अधिक अभ्यागतांना शिर्डीला येणे सुलभ होईल. आधुनिक सुधारणांनी सुसज्जित केलेल्या सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाबद्दल देखील पंतप्रधानांनी त्यांचे विचार मांडले. या उद्घाटनामुळे, सोलापूर परिसरातील शनी शिंगणापूर, तुळजा भवानी तसेच कैलास मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांना भेट देणे अधिक सुलभ होणार  असून त्यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनविषयक अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळून रोजगाराच्या नवनव्या संधी देखील निर्माण होणार आहेत.

“आमच्या सरकारचा प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक धोरण हे केवळ एकाच ध्येयाप्रति समर्पित आहे, ते म्हणजे विकसित भारत!”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यासाठी गरीब, शेतकरी, युवा आणि महिलांचे कल्याण हाच सरकारचा दृष्टीकोन असल्याचे ते पुढे म्हणाले.म्हणूनच प्रत्येक विकास प्रकल्प हा गरीब ग्रामीण जनता, मजूर आणि शेतकरी यांना समर्पित असल्याचे ते म्हणाले. शिर्डी विमानतळावर बांधले जात असलेले स्वतंत्र कार्गो कॉम्प्लेक्स (मालवाहू विमान सेवा संकुल) शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार असून, इथून त्यांना विविध प्रकारची कृषी उत्पादने देशभरात आणि परदेशात निर्यात करता येतील, यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. ते पुढे म्हणाले की, शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर आणि नाशिक येथील शेतकऱ्यांना कांदा, द्राक्ष, पेरू आणि डाळिंब यांसारखी उत्पादने मोठ्या बाजारपेठेत सहज पोहोचवता येतील, त्यामुळे कार्गो कॉम्प्लेक्स त्यांच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सातत्याने आवश्यक ती पावले उचलत असून, सरकारने बासमती तांदळाचा किमान निर्यात दर रद्द करणे, बिगर-बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी हटवणे, उकड्या तांदळावरील निर्यात शुल्क निम्म्याने कमी करणे, यासारखे निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्कही निम्म्याने कमी केले . सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवर 20 टक्के कर लावण्याचा निर्णय घेतला असून, भारतातील शेतकऱ्यांना मोहरी, सोयाबीन आणि सूर्यफूल यांसारख्या पिकांच्या वाढलेल्या किमतीचा फायदा मिळावा, यासाठी रिफाइन्ड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील सीमा शुल्कात लक्षणीय वाढ केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. कापड उद्योगाला सरकार ज्या प्रकारे मदत करत आहे त्याचा महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, महाराष्ट्राला बळकट करणे, हा विद्यमान सरकारचा संकल्प आहे. त्यांनी राज्याच्या प्रगतीच्या गतीबद्दल आनंद व्यक्त केला आणि आजच्या सर्व विकास प्रकल्पांसाठी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले.

महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी दूरदृश्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुमारे 7000 कोटी रुपये खर्चाच्या आधुनिकीकरण प्रकल्पाची पायाभरणी केली. हा प्रकल्प उत्पादन, विमान वाहतूक, पर्यटन, लॉजिस्टिक आणि आरोग्यसेवा यासह अनेक क्षेत्रांच्या विकासाला चालना देईल, आणि नागपूर शहर आणि विदर्भाच्या विस्तृत प्रदेशाला त्याचा लाभ मिळेल.

पंतप्रधानांनी शिर्डी विमानतळावर 645 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. प्रस्तावित टर्मिनलच्या बांधकामाची  संकल्पना साई बाबा यांच्या अध्यात्मिक कडुनिंबाच्या झाडावर आधारित आहे.

सर्वांसाठी परवडणारी आणि सहज उपलब्ध आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधानांनी महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशीम, भंडारा, हिंगोली आणि अंबरनाथ (ठाणे), या 10 ठिकाणच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन सुरू केले. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या वाढीव जागांसह,  ही महाविद्यालये रुग्णांना प्रगत तृतीयक  आरोग्य सेवा देखील पुरवतील.

भारताला ‘जगाची कौशल्याची राजधानी’ म्हणून प्रस्थापित करण्याच्या आपल्या दृष्टीकोनाला अनुसरून, पंतप्रधानांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS) मुंबई, अर्थात भारतीय कौशल्य संस्थेचे उद्घाटनही केले. उद्योग क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी तयार करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत, टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि भारत सरकार यांच्या सहयोगाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

मेकॅट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ॲनालिटिक्स, इंडस्ट्रियल ऑटोमेशन आणि रोबोटिक्स यांसारख्या अती प्रगत क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्याची संस्थेची योजना आहे.

पंतप्रधानांनी यावेळी महाराष्ट्राच्या विद्या समीक्षा केंद्राचे (VSK) उद्घाटन केले. विद्या समीक्षा केंद्र, विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकांना स्मार्ट उपस्थिती, स्वाध्याय यांसारख्या थेट चॅटबॉट्सद्वारे महत्वाचा शैक्षणिक आणि प्रशासकीय डेटा सहज उपलब्ध करेल. हे केंद्र शाळांना साधन संपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन, पालक आणि देश यांच्यातील संबंध दृढ करणे, आणि प्रतिसादात्मक पाठबळ देण्यासाठी उच्च-गुणवत्तेचा दृष्टीकोन प्रदान करेल. हे केंद्र शिकवण्याच्या पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अनुभवात सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शनपर क्युरेटेड (तयार) साधन सामुग्री देखील पुरवेल.

 

 

* * *

JPS/N.Chitale/Shailesh/Sushma/Sanjana/Rajshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2063520) Visitor Counter : 117