पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार


नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरण प्रकल्पाची करणार पायाभरणी

पंतप्रधानांच्या हस्ते शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची होणार पायाभरणी

भारतीय कौशल्य संस्था मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्र महाराष्ट्र या संस्थांचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

Posted On: 08 OCT 2024 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील 7600 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते  नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सुमारे 7000 कोटी रुपये खर्चाच्या अद्ययावतीकरण प्रकल्पाची पायाभरणी केली जाईल. हा प्रकल्प उत्पादन, हवाई क्षेत्र , पर्यटन, लॉजिस्टिक आणि आरोग्यसेवा यासह अनेक क्षेत्रांच्या विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावेल.नागपूर आणि विदर्भाच्या विस्तीर्ण प्रदेशाला याचा मोठा लाभ मिळेल.

पंतप्रधान शिर्डी विमानतळावरील 645 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी करतील. यामुळे शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध होतील. प्रस्तावित टर्मिनलच्या बांधकामाची संकल्पना साई बाबा यांच्या अध्यात्मिक कडुनिंबाच्या झाडावर आधारित आहे.

सर्वांसाठी परवडणारी आणि सुलभ आरोग्य सेवा सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेला अनुसरून, पंतप्रधान महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलडाणा, वाशीम, भंडारा, हिंगोली आणि अंबरनाथ (ठाणे), या ठिकाणच्या एकूण 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे कार्यान्वयन सुरू करतील. ही रुग्णालये पदवी पूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या वाढीव जागांसह, रुग्णांना विशेष तृतीय  श्रेणीतील आरोग्य सेवा देखील पुरवतील.

भारताला ‘जगाची कौशल्यविषयक राजधानी’ म्हणून नावारुपाला आणण्याच्या त्यांच्या संकल्पनेच्या अनुषंगाने, पंतप्रधान भारतीय कौशल्य संस्था  (आयआयएस) मुंबईचे  देखील उद्घाटन करतील. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत प्रशिक्षण घेतलेल्या आणि उद्योगजगतातील कार्यासाठी सज्ज असलेल्या मनुष्यबळाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात येत आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेलअंतर्गत उभारण्यात आलेल्या या संस्थेची स्थापना टाटा शैक्षणिक आणि विकास निधी ही संस्था आणि भात सरकार यांच्या संयुक्त सहयोगातून करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून मेकॅट्रॉनिक्स, कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय), डाटा अनॅलिटिक्स, औद्योगिक स्वयंचलीकरण तसेच रोबोटिक्स यांसारख्या अत्यंत उच्च श्रेणीच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच, पंतप्रधान यावेळी महाराष्ट्रात विद्या समीक्षा केंद्राचे (व्हीएसके)देखील उद्घाटन करणार आहेत. ही   व्हीएसके,विद्यार्थी, शिक्षण आणि प्रशासकांना स्मार्ट उपस्थिती, स्वाध्याय यांसह अशाच प्रकारच्या इतर अनेक लाइव्ह चॅटबॉटच्या माध्यमातून महत्त्वाचा शैक्षणिक तसेच प्रशासकीय डाटा सुलभतेने पुरवणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यालयांना साधनसंपत्तीचे परिणामकारकरित्या व्यवस्थापन करण्यासाठी  उच्च दर्जाचा दृष्टीकोन  प्राप्त होणार असून विद्यालयांना राज्य सरकार आणि पालक यांच्यातील बंध बळकट करणे आणि प्रतिसादात्मक पाठबळ पुरवणे शक्य होईल. अध्यापन पद्धती आणि विद्यार्थी अध्ययन प्रक्रिया यांच्यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने हे केंद्र निवडक संस्थात्मक साधनसंपत्तीचा देखील पुरवठा करेल.


N.Chitale/R.Agashe/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2063300) Visitor Counter : 167