श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ.मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे रोजगाराच्या डेटावरील उच्चस्तरीय बैठक संपन्न

Posted On: 08 OCT 2024 5:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2024

केंद्रीय श्रम आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली 07.10.2024 रोजी नवी दिल्ली येथे, रोजगाराचा डेटा (विदा) आणि परदेशी स्थलांतर विषयक सध्याचा कल यांच्याशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर भर देणारी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय श्रम व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे देखील या बैठकीला उपस्थित होत्या.

परदेशातील रोजगार आणि देशांतर्गत रोजगार निर्मिती या दोन्हीसाठीचा समन्वय आणि डेटा संकलन प्रक्रियेला बळ देणे,तसेच परदेशात रोजगार मिळवून देणाऱ्या संस्थांवरील देखरेख आणि परदेशात रोजगार मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये वाढवणे,हे परराष्ट्र मंत्रालय  आणि नीती आयोग यांच्याशी झालेल्या चर्चेचे उद्दिष्ट होते.

डॉ.मांडवीय यांनी, ईसीआर (इमिग्रेशन बंधनकारक असलेल्या)/नॉन-ईसीआर (इमिग्रेशन बंधनकारक नसलेल्या) देशांमध्ये नोकरी/शिक्षणासाठी जाणाऱ्या नागरिकांबाबतचा संपूर्ण डेटा उपलब्ध करून देणारी यंत्रणा आवश्यक असल्याचे सांगितले. रोजगाराची मागणी आणि पुरवठा दोन्ही बाजूंचा सर्वसमावेशक अंदाज घेण्यासाठी राष्ट्रीय करिअर सेवा (NCS) पोर्टल, माय (MY) भारत प्लॅटफॉर्म, MADAD, eMigrate, eShram पोर्टल्स, राज्य पोर्टल इत्यादींचे एकत्रीकरण करायला हवे, अशी सूचनाही त्यांनी केली.

रोजगाराची आकडेवारी मिळवण्यात औद्योगिक संघटना महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, यावरही त्यांनी भर दिला.विविध मंत्रालयांकडून रोजगाराशी संबंधित डेटाचे संकलन सुलभ बनवण्यासाठी मध्यवर्ती संस्था म्हणून नीती आयोगाची असलेली महत्वाची भूमिका त्यांनी अधोरेखित केली.

परदेशी नोकरी देणाऱ्या संस्थांबरोबरच्या करारांचे प्रमाणीकरण करावे, तसेच स्थलांतर आणि परदेशातील प्रवास भागीदारी व्यवस्था आणि सामाजिक सुरक्षा करारांच्या  तरतुदींची परिणामकारकता, याबाबत अभिप्राय मिळविण्यासाठी त्यांचे पुनरावलोकन केले जावे, यावर जोर देण्यात आला.

नीती आयोगाने देशातील रोजगार पोर्टलवरील विविध अभ्यासांमधून मिळालेली माहिती इतरांना सांगितली, आणि सरकारी योजना आणि विविध क्षेत्रांमधील रोजगाराबाबतच्या डेटाचे संकलन करण्यासाठी एकीकृत व्यासपीठाच्या गरजेवर भर दिला.

या बैठकीने, विशेषत: अनौपचारिक क्षेत्रातील सध्याच्या डेटामधील तफावत भरून काढणे, आणि धोरण आणि रोजगार निर्मितीच्या उपक्रमांना चालना देण्यासाठी सर्वसमावेशक, बहु-क्षेत्र रोजगार डेटा पोर्टल विकसित करण्याप्रति असलेली सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली.

रोजगार डेटासाठीचा समन्वय मजबूत करणे, परदेशातील नोकरीच्या संधींचा विस्तार करणे आणि परदेशातील भारतीय कामगारांच्या सुरक्षिततेवर भर देणे, यासाठी वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, बैठकीचा समारोप झाला.प्रस्तावित युनिफाइड एम्प्लॉयमेंट डेटा पोर्टल रोजगाराच्या डेटाचे केंद्रीकरण करण्यासाठीचे एक परिवर्तनकारक साधन म्हणून काम करेल, तर eMigrate आणि NCS च्या एकत्रीकरणामुळे रोजगाराच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील प्रवेशसंधी विस्तृत होतील.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2063219) Visitor Counter : 29