पंतप्रधान कार्यालय
मालदीवचे राष्ट्रपती एच ई मोहम्मद मुइज्जू यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त वक्तव्याचा मजकूर
Posted On:
07 OCT 2024 2:25PM by PIB Mumbai
आदरणीय राष्ट्रपति मुइज्जू,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यमांतील आमचे सहकारी, सर्वांना नमस्कार!
सर्वात आधी मी राष्ट्रपती मुइज्जू आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे हार्दिक स्वागत करतो.
भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध शतकानुशतके जुने आहेत. आणि भारत हा मालदीवचा सर्वात जवळचा शेजारी आणि जिवलग मित्र आहे. आमच्या "नेबरहुड फर्स्ट" धोरणामध्ये आणि "सागर" दृष्टीकोनानुसार मालदीवचे स्थान महत्त्वाचे आहे, या दोन्ही बाबतीत भारताने नेहमीच मालदीवसाठी प्रथम प्रतिसादकाची भूमिका बजावली आहे.
मालदीवच्या लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा पूर्ण करणे असो, नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिण्याचे पाणी पुरवणे असो किंवा कोविडच्या काळात लस पुरवणे असो, भारताने एक शेजारी म्हणून नेहमीच आपली जबाबदारी पार पाडली आहे. आणि आज आम्ही आमच्या परस्पर सहकार्याला धोरणात्मक दिशा देण्यासाठी “व्यापक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीचा” दृष्टीकोन स्वीकारला आहे.
मित्रहो,
विकासासाठी भागीदारी हा आमच्या परस्पर संबंधांचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आणि त्यासाठी आम्ही नेहमीच मालदीवच्या लोकांच्या प्राधान्यांना प्राधान्य दिले आहे. या वर्षी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मालदीवच्या 100 दशलक्ष डॉलर्सच्या सरकारी ट्रेझरी बिल्स'चे सदस्यत्व घेतले आहे. मालदीवच्या आवश्यकतेनुसार, 400 दशलक्ष डॉलर्स आणि तीन हजार कोटी रुपयांचा चलन स्वॅप करार देखील करण्यात आला आहे.
आम्ही मालदीवमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सर्वसमावेशक सहकार्याबद्दल चर्चा केली आहे. आज आम्ही पुनर्विकसित हनीमधू विमानतळाचे उद्घाटन केले. आता ग्रेटर ‘माले’ कनेक्टिव्हिटी प्रकल्पाच्या कामालाही वेग येणार आहे. थिलाफुशी मधील नवीन व्यावसायिक बंदराच्या विकासासाठी देखील सहाय्य केले जाईल.
भारताच्या सहकार्याने बांधलेली 700 पेक्षा जास्त सामाजिक गृहनिर्माण एकके आज सुपूर्द करण्यात आली आहेत. मालदीवच्या 28 बेटांवर पाणी आणि सांडपाणी प्रकल्प पूर्ण झाले आहेत. इतर सहा बेटांवरचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे. या प्रकल्पांमुळे तीस हजार लोकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे.
"हा दालू" येथे कृषी आर्थिक क्षेत्र आणि "हा अलिफु" येथे मत्स्य प्रक्रिया सुविधेच्या स्थापनेसाठी देखील सहकार्य केले जाईल. आम्ही समुद्रशास्त्र आणि नील अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातही एकत्र काम करणार आहोत.
मित्रहो,
आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी आम्ही मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारातील तडजोडी स्थानिक चलनात करण्याबाबतही काम केले जाईल. आम्ही डिजिटल कनेक्टिव्हिटीवर सुद्धा भर दिला आहे.
मालदीवमध्ये नुकताच रुपे कार्डचा शुभारंभ करण्यात आला. आगामी काळात भारत आणि मालदीव यांनाही युपीआय द्वारे जोडण्याचे काम केले जाईल. आम्ही अड्डू येथे भारताचा नवीन वाणिज्य दूतावास आणि बेंगळुरूमध्ये मालदीवचा नवीन वाणिज्य दूतावास सुरू करण्याबाबत चर्चा केली आहे. या सर्व उपक्रमांमुळे आमच्या दोन्ही देशांमधल्या लोकांचे परस्पर संबंध दृढ होतील.
मित्रहो,
आम्ही संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्याच्या विविध पैलूंवर तपशीलवार चर्चा केली. एकता हार्बर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलांचे प्रशिक्षण आणि क्षमता वाढीसाठी आम्ही आमचे सहकार्य सुरू ठेवू. हिंदी महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धीसाठी आम्ही एकत्र काम करू. जलविज्ञाान आणि आपत्ती प्रतिसादाच्या कामी सहकार्य वाढवले जाईल. कोलंबो सुरक्षा परिषदेत संस्थापक सदस्य म्हणून समाविष्ट होणाऱ्या मालदीवचे स्वागत आहे. हवामानातील बदल हे आपल्या दोन्ही देशांसाठी मोठे आव्हान आहे. या संदर्भात भारत सौर आणि ऊर्जा कार्यक्षमतेच्या बाबतीत आपले अनुभव मालदीवला सांगण्यास तयार आहे.
आदरणीय महोदय,
पुन्हा एकदा तुमचे आणि तुमच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत आहे. तुमची ही भेट आपल्या परस्पर संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू करणारी आहे. मालदीवच्या लोकांच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करत राहू.
खूप खूप धन्यवाद.
***
SonalT/MadhuriP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2063103)
Visitor Counter : 35
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam