कृषी मंत्रालय
पंतप्रधानांच्या हस्ते उद्या 5 ऑक्टोबर, 2024 रोजी महाराष्ट्रात वाशीम येथे पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता जारी करण्यात येणार
देशातील 9.4 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या थेट हस्तांतरणाचा लाभ मिळणार
महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण
प्रविष्टि तिथि:
04 OCT 2024 1:27PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 5 ऑक्टोबर, 2024 रोजी महाराष्ट्रात वाशीम येथे पीएम किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 18 वा हप्ता जारी करणार आहेत. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातील 9.4 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळणार असून, कोणत्याही मध्यस्थाच्या सहभागाविना थेट लाभ हस्तांतरणाच्या (डीबीटी) माध्यमातून सुमारे 20,000 कोटी रुपयांहून अधिक निधी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, मृदा आणि जलसंवर्धन विभागाचे मंत्री आणि वाशीम तसेच यवतमाळ या जिल्ह्यांचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. देशभरातील 732 कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीकेज), एक लाखांहून अधिक प्राथमिक कृषी सहकारी संस्था तसेच 5 लाख सामान्य सेवा केंद्रे यांमध्ये उपस्थित असलेले सुमारे अडीच कोटी शेतकरी वेबकास्टच्या मदतीने या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांना निधी जारी होत असल्यानिमित्त राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये उद्याचा दिवस पीएम-किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून उद्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान उद्या 5 ऑक्टोबर, रोजी पीएम-किसान योजनेचा 18 वा हप्ता जारी करतील
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 1.20 कोटी शेतकऱ्यांना याआधी जारी करण्यात आलेल्या 17 हप्त्यांद्वारे सुमारे 32,000 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले असून संपूर्ण देशभरात सर्वाधिक निधी हस्तांतरित झालेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी आहे. या अठराव्या हप्त्याद्वारे राज्यातील 91.51 लाख शेतकऱ्यांना 1,900 कोटी रुपये वितरीत केले जातील.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना आणखी पाठबळ देण्याच्या उद्देशाने, त्यांना 2,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळवून देण्यासाठी पीएम-किसान योजनेच्या हप्त्याच्या वितरणासोबतच, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण देखील करण्यात येईल.
कृषीविषयक पायाभूत सुविधांना चालना देण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असेलल्या या कार्यक्रमात नव्या सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ) अंतर्गत पूर्ण झालेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण देखील होणार आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या ‘मेक इन इंडिया’ तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना अनुसरुन, पशुपालकांना पशुधनात वाढ करण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या लिंग-वर्गीकृत वीर्य उत्पादन तंत्रज्ञानाची सुरुवात देखील केली जाईल.
त्यानंतर, कुसुम-सी (एमएसकेव्हीवाय 2.0) योजनेअंतर्गत सुमारे 3,000 मेगावॉट वीजनिर्मिती करणाऱ्या तसेच सामाजिक विकास अनुदानांचे ई-वितरण करणाऱ्या ग्राम पंचायतींना पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ई-वितरण पद्धतीने बक्षिसपत्रे वितरीत करण्यात येतील. ऊर्जाविषयक शाश्वत उपायांमध्ये योगदान देणाऱ्या आणि शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासोबतच भाडेपट्टीने जमीन देण्याच्या माध्यमातून त्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध करून देणाऱ्या आणि एमएसकेव्हीवाय 2.0 अंतर्गत मंजूर झालेल्या 19 मेगावॉट क्षमतेच्या पाच सौर उर्जा पार्क्सचे देशार्पण देखील यावेळी करण्यात येईल.
हे पाच सौर उर्जा पार्क्स खालील ठिकाणी उभारण्यात आले आहेत:
(i) धोंडलगाव, छ.संभाजी नगर – 3 मेगावॉट
(ii) बामणी बु. नांदेड – 5 मेगावॉट
(iii) कोंडगिरी, कोल्हापूर – 3 मेगावॉट
(iv) जलालाबाद, अकोला – 3 मेगावॉट
(v) पळशी बु. बुलढाणा – 5 मेगावॉट
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2062027)
आगंतुक पटल : 139