राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतीय पोलीस सेवेतील परीविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 30 SEP 2024 3:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2024

 

भारतीय पोलीस सेवेतील 76 आरआर (2023 तुकडी) मधील  परीविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या  गटाने आज (30 सप्टेंबर, 2024) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

पोलीस परीविक्षाधीन अधिकारी (प्रोबेशनर ऑफिसर) वर्गाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, विविध अखिल भारतीय सेवांमध्ये, भारतीय पोलिस सेवा  विभागाला  स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे. कायदा आणि  सुव्यवस्था हा केवळ शासनाचा पायाच नाही; तो आधुनिक राज्याचा आधार आहे. सोप्या भाषेत, असे म्हणता येईल की, अनेक ठिकाणी आणि वेगवेगळ्या  परिस्थितींमध्ये, पोलिस म्‍हणजे  नागरिकांच्या दृष्‍टीने राज्याचा चेहरा-मोहरा असतात. तसेच राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेशी सर्वात प्रथम त्यांनाच सामोरे जावून  संवाद साधावा लागत  असतो.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, आगामी वर्षांमध्ये नवीन उंची गाठण्याचे उद्दिष्ट्य भारताने निश्चित केले आहे, त्यामुळे आता  आयपीएस अधिकाऱ्यांची भूमिकाही  अधिक महत्त्वाची बनली आहे. ज्‍या ठिकाणी कायद्याचे राज्य कायम असते अशाच ठिकाणी  आर्थिक वाढ आणि सामाजिक विकास होणे  शक्य असते.  कायदा आणि सुव्यवस्था राखल्याशिवाय  तसेच  न्याय सुनिश्चित केल्याशिवाय आणि नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण केल्याशिवाय साधलेली प्रगती अर्थहीन असते.

  

अलिकडच्या वर्षांत महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या संख्येत झालेली झपाट्याने वाढ  पाहून राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे पोलीस खात्याच्या   एकंदर स्वरूपात  चांगले बदल होतील. महिला अधिकारी वर्ग वाढला तर  पोलीस आणि समाज यांचे  संबंध सुधारू शकतील  आणि ते देशासाठी देखील फायदेशीर ठरेल.

राष्ट्रपती मुर्मू  म्हणाल्या  की, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांना आळा घालणे आणि शोध तसेच दक्षता घेणे यासह इतर बाबींमध्‍येही  तंत्रज्ञानातील प्रगतीचा फायदा झाला आहे. मात्र, दुसरी बाजू अशी आहे की, गुन्हेगार आणि दहशतवादीही तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. जगभरात सायबर-गुन्हे आणि सायबर युद्ध वाढत आहेत, अशावेळी  आयपीएस अधिकारी तंत्रज्ञानातील माहीतगार आणि गुन्हेगारांपेक्षा एक पाऊल पुढेच असले पाहिजेत, अशी अपेक्षा सर्वांकडून असणार आहे.

  

राष्ट्रपती म्हणाल्या की, आयपीएस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर असलेल्या अनेक  जबाबदाऱ्यांमुळे, त्यांनाही कधी कधी खूप ताण येऊ  शकतो. त्यामुळे पो‍लीसवर्गाने आपल्‍या मानसिक स्वास्थ्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. पोलिसांनी योग, प्राणायाम आणि विश्रांतीचे तंत्र अशा गोष्‍टी आपल्या दैनंदिन कामाचा भाग बनवावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी  परीविक्षाधीन अधिकारी वर्गाला केले. 'आयपीएस' मधील 'एस' म्हणजे सर्व्हिस - सेवा अर्थ आहे,  हे लक्षात ठेवण्याचा सल्लाही राष्‍ट्रपतींनी  दिला. त्या पुढे  म्हणाल्या की,  यामध्‍ये  सर्वात महत्‍वाची गोष्‍ट म्‍हणजे  या  देशाची  आणि इथल्या  नागरिकांची सेवा करणे महत्‍वाचे आहे.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करावे 

 

* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2060267) Visitor Counter : 20