आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसेभेच्या अध्यक्षांनी 79 व्या आमसभेच्या निमीत्ताने बोलावलेल्या प्रतिसूक्ष्मजीवजंतीय प्रतिरोध अर्थात अँटीमायक्रोबायल रेसिस्टन्सविषयचीच्या उच्चस्तरीय बैठकीत, भारताकडून प्रतिसूक्ष्मजीवजंतीय प्रतिरोधाचा सामना करण्यासाठी वचनबद्धतेचा पुनरुच्चार


प्रतिजैविक प्रतिकार या वाढत्या आरोग्य समस्येला तोंड देण्यासाठी तातडीने जागतिक सहकार्याची आवश्यकता आहे: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, अनुप्रिया पटेल

प्रतिजैविक प्रतिकार हा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर भेडसावणारा मोठा धोका असून आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांमध्ये झालेल्या प्रगतीला हा धोका झाकोळून टाकतो आहे : अनुप्रिया पटेल

Posted On: 27 SEP 2024 12:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2024

 

आरोग्यविषयक विविध कार्यक्रमांमध्ये साथीच्या रोगासाठी सज्जता, आरोग्य प्रणाली मजबूत करणे आणि सार्वत्रिक आरोग्य संरक्षण यावर लक्ष केंद्रित करून  प्रतिजैविक प्रतिकार या समस्येवरील प्रतिबंधात्मक धोरणांचा तातडीने समन्वय साधण्याची गरज आहे. 

प्रतिजैविक प्रतिकार या वाढत्या आरोग्य समस्येला तोंड देण्यासाठी तातडीने जागतिक सहकार्याची आवश्यकता आहे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, अनुप्रिया पटेल यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसेभेच्या अध्यक्षांनी 79 व्या आमसभेच्या निमीत्ताने बोलावलेल्या प्रतिसूक्ष्मजीवजंतीय प्रतिरोध अर्थात अँटीमायक्रोबायल रेसिस्टन्सविषयचीच्या उच्चस्तरीय बैठकीत सांगितले. 

प्रतिजैविक प्रतिकार हा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात जागतिक स्तरावर भेडसावणारा मोठा धोका असून आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांमध्ये झालेल्या प्रगतीला हा धोका झाकोळून टाकतो आहे, असे या बैठकीला संबोधित करताना अनुप्रिया पटेल म्हणाल्या. आरोग्यविषयक विविध कार्यक्रम केवळ देखरेखीइतके मर्यादित न ठेवता मूळात समस्या उद्भवू  नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि शमन यासाठी साधनसामग्रीच्या वापरावर अधिक भर द्यायला हवा तसेच साथीच्या रोगासाठी सज्जता, आरोग्य प्रणाली मजबूत करणे आणि सार्वत्रिक आरोग्य संरक्षण यावर लक्ष केंद्रित करून प्रतिजैविक प्रतिकार या समस्येवरील प्रतिबंधात्मक धोरणांचा तातडीने समन्वय साधण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. 

प्रतिजैविक प्रतिकार या समस्येला तोंड देण्यासाठी भारताने एप्रिल 2017 मध्ये राष्ट्रीय कृती धोरण आखले असून तेव्हापासून या दिशेने महत्वपूर्ण प्रगती केली आहे, असे त्या म्हणाल्या. याशिवाय भारताने मानव आणि प्राणी या दोन्हींच्या आरोग्य क्षेत्रांमध्ये देखरेख ठेवण्यासाठी विस्तृत नेटवर्क विकसित करण्यात  केलेली प्रगतीही त्यांनी अधोरेखित केली. तसेच संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण यात सुधारणा, मानव आणि प्राणी या दोन्ही घटकांच्या आरोग्य क्षेत्रांमध्ये योग्य प्रतिजैविकांच्या वापराला प्रोत्साहन, रुग्णालयातून होणारे संक्रमण कमी करणे, इत्यादी उपक्रम हाती घेतले असून “आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या व्यापक आणि देशव्यापी प्रशिक्षणाद्वारे संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण (IPC) मजबूत केले गेले आहे, असे त्या म्हणाल्या. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुविधांमध्ये स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रण या बाबींमध्ये सुधारणा केल्याचे त्यांनी सांगितले.

"देशात आरोग्यसेवा संबंधित संक्रमणांचे (एचएआय) देशव्यापी पद्धतशीर आणि प्रमाणित निरीक्षण सुरू केले गेले आहे. प्रतिजैविकांची प्रिस्क्रिप्शन आधारित -अर्थात डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधानुसार विक्री सुनिश्चित करण्यासाठी नियम लागू आहेत. प्रतिजैविकांच्या न्याय्य वापराला प्रोत्साहन देण्यासाठी, राष्ट्रीय उपचार मार्गदर्शक तत्वांमध्ये नियमितपणे सुधारणा केली जाते” असेही त्या म्हणाल्या. 

प्रतिजैविकांचा अनावश्यक वापर कमी करण्यासाठी डॉक्टरांकडून होणारी त्यांची शिफारस कमी करण्याच्या उद्देशाने आणि प्रतिजैविक प्रतिकाराला लढा देण्यासाठी भारताने  प्रतिजैविक स्टीवर्डशिप (AMS) कार्यक्रम विकसित केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. हा कार्यक्रम संसाधन-मर्यादित स्वरूप लक्षात घेऊन तयार केला आहे आणि देशातील अनेक रुग्णालये त्यांचा वापर करत आहेत. 

भारताने त्याच्या अद्ययावत राष्ट्रीय कृती धोरण -प्रतिजैविक प्रतिकार  2.0 चा भाग म्हणून आंतर-क्षेत्रीय सहकार्यालाही प्राधान्य दिले आहे, ज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रासाठी अर्थसंकल्पित कृती योजना आणि सु-परिभाषित देखरेख आणि मूल्यमापन यंत्रणा यांचा समावेश आहे. सध्या देशात अस्तित्वात असलेली  एक आरोग्य ही संरचना म्हणजे  प्रतिजैविक प्रतिकार संदर्भात मानव, प्राणी आणि पर्यावरणीय क्षेत्रात अधिकाधिक समन्वय साधण्याचा प्रयत्न होय. नवकल्पना व्यतिरिक्त, पर्यावरणावरील प्रतिजैविक प्रतिकाराचा प्रभाव कमी करण्यावर उपाय शोधण्यासाठी परिचालनात्मक संशोधनाला प्राधान्य देण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी प्रतिजैविक प्रतिकार यावरील उच्च-स्तरीय मंत्रिस्तरीय जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली तसेच राष्ट्रीय आणि जागतिक प्रयत्नांद्वारे एएमआरशी लढा देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. 

“व्यापक क्षेत्रीय आणि आंतर-क्षेत्रीय प्रयत्नांद्वारे प्रतिजैविक प्रतिकार या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे. एकत्र काम करून, आम्ही प्रतिजैविक प्रतिकारामुळे निर्माण होणारे धोके कमी करू शकतो आणि जगभरातील सार्वजनिक आरोग्याचे भविष्य सुरक्षित करू शकतो”, असे त्या म्हणाल्या. 

 

* * *

S.Tupe/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2059367) Visitor Counter : 38