राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची आशियाई सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था संघटनेच्या 16 व्या सभेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थिती


सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांकडून केले जाणारे लेखापरीक्षण आणि मूल्यांकन सार्वजनिक निधीचे संरक्षण करण्यासोबतच लोकांचा शासनावरचा विश्वास वृद्धिंगत करते : राष्ट्रपती मुर्मू

Posted On: 24 SEP 2024 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2024

 

आशियाई सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था संघटनेच्या 16 व्या सभेचे (ASOSAI)यजमानपद भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG-कॅग ) भूषवत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (24 सप्टेंबर, 2024) नवी दिल्ली येथे या सभेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होत्या. 

देशाच्या सार्वजनिक वित्तव्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यात कॅग महत्त्वाची भूमिका बजावते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. भारतीय राज्यघटनेने कॅगच्या कार्यालयाला व्यापक अधिकार आणि पूर्ण स्वायत्तता विनाकारण दिलेली नाही, असे सांगतानाच कॅगचे कार्यालय राज्यघटना निर्मात्यांच्या अपेक्षांनुसार काम करत  असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. कठोर नैतिक आणि मौलिक आचारसंहितेचे पालन हे कार्यालय करत असून यामुळे कामकाजात सर्वोच्च प्रामाणिकपणा सुनिश्चित होतो. 

   

सार्वजनिक क्षेत्रातील लेखापरीक्षणांचे अधिकारक्षेत्र पारंपारिक लेखापरीक्षणाच्या पलीकडे विस्तारले असून यात  सार्वजनिक कल्याणकारी योजना आणि प्रकल्पांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे, ते सर्व नागरिकांना समानतेने सेवा देण्याची सुनिश्चिती समाविष्ट असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. वाढत्या तंत्रज्ञान-चालित जगात तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक सार्वजनिक सेवा दिल्या जात आहेत. त्यामुळे देखरेखीची कार्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी लेखापरीक्षण संस्थांनी तांत्रिक उत्क्रांतीसोबत अद्ययावत असणे  आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. 

राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या, आज आपण एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहोत जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा ॲनालिटिक्स, मशीन लर्निंग आणि भू-स्थानिक तंत्रज्ञान यासारखे उदयोन्मुख डिजिटल तंत्रज्ञान आधुनिक प्रशासनाचा कणा बनत आहेत. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, या डिजिटल अर्थव्यवस्थेचे कार्य आणि नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवा वृद्धिंगत करण्यासाठी पाया म्हणून काम करतात. अधिक सुलभता, कार्यक्षमता आणि सर्वसमावेशकतेसाठी,  डिजिटल ओळखपासून  ई-शासन मंचांपर्यंत सार्वजनिक सेवा आणि वस्तूंच्या वितरणात क्रांती घडवून आणण्याची क्षमता डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये आहे. 

राष्ट्रपती म्हणाल्या,जगाच्या अनेक भागांमध्ये, महिला आणि समाजातील दुर्बल  घटकांचा  डिजिटल तंत्रज्ञानात प्रवेश कमी आहे, डिजिटल कौशल्ये विकसित करण्याच्या कमी संधी आहेत आणि डिजिटल अर्थव्यवस्थेत त्यांचे प्रतिनिधित्व कमी आहे,  ही दरी अत्यावश्यक सेवेमधल्या प्रवेशाची त्यांची क्षमता मर्यादित करण्यासोबतच असमानता कायम ठेवते. येथेच सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सर्वसमावेशक आणि प्रवेशयोग्य अशा प्रकारे आरेखित आणि कार्यान्वित करण्यात आल्या असल्याची सुनिश्चिती करण्याची वैशिष्ट्यपूर्ण  जबाबदारी आणि संधी लेखापरीक्षक म्हणून त्यांना लाभली आहे. 

आर्थिक जग अनेकदा अपारदर्शक लेखा पद्धतींनी वेढलेले असते.  या स्थितीत सार्वजनिक संसाधने कार्यक्षमतेने, प्रभावीपणे आणि अत्यंत सचोटीने व्यवस्थापित केली जातात हे पाहणे ही स्वतंत्र सर्वोच्च लेखापरीक्षा संस्थांची जबाबदारी आहे. सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थांकडून केले जाणारे लेखापरीक्षण आणि मूल्यांकन सार्वजनिक निधीचे संरक्षण करण्यासोबतच लोकांचा शासनावरचा विश्वास वृद्धिंगत करते, असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केले. 

कॅग अर्थात भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक संस्थेला सार्वजनिक लेखापरीक्षणाचा समृद्ध इतिहास आहे. आशियाई सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था संघटनेच्या 16 व्या सभेचे यजमान म्हणून भारताची सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था, विचारमंथनात मोठे योगदान देऊ शकेल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. वर्ष 2024 ते 2027 या कालावधीसाठी ASOSAI चे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल भारताच्या सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थेचे त्यांनी अभिनंदन केले. कॅगच्या सक्षम नेतृत्वाखाली ASOSAI नवी उंची गाठेल, सदस्यांमध्ये अधिक सहकार्य आणि नवोन्मेषाला चालना देईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. 

राष्ट्रपतींचे भाषण येथे पहा.

 

* * *

S.Tupe/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2058335) Visitor Counter : 47