आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
देशातील युवांचे आरोग्य आणि हित जपण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, प्रतापराव जाधव यांनी तंबाखूमुक्त युवा मोहीम 2.0 चा केला प्रारंभ
देशात दरवर्षी सुमारे 13 लाख लोक तंबाखूमुळे मृत्युमुखी, तंबाखू युवांमध्ये फॅशन स्टेटमेंट बनले आहे मात्र त्यामुळे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका : प्रतापराव जाधव
"कुठल्याही राष्ट्राच्या विकासाचा त्याच्या युवा लोकसंख्येच्या आरोग्याशी जवळचा संबंध असतो"
Posted On:
24 SEP 2024 6:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2024
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्ली येथील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित एका हायब्रीड कार्यक्रमात तंबाखूमुक्त युवा अभियान 2.0 च्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रारंभ केला. देशभरातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या तंबाखू मुक्ती केंद्रांचे दूरस्थ पद्धतीने उदघाटन केले. तंबाखूच्या हानिकारक परिणामांपासून युवांच्या आरोग्याचे संरक्षण आणि हित जपणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
"देशात दरवर्षी सुमारे 13 लाख लोक तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडतात, तंबाखू युवांमध्ये फॅशन स्टेटमेंट बनले आहे मात्र त्यामुळे कर्करोगासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात," असे प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
तंबाखूच्या सेवनापेक्षा आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी त्यांनी युवांना प्रोत्साहित केले. जाधव म्हणाले ''उत्तम आरोग्याचा संबंध स्वतःच्या आणि आपल्या निकटवर्तीयांच्या आनंदाशी जोडलेला असतो.'' कुठल्याही राष्ट्राच्या विकासाचा त्याच्या युवा लोकसंख्येच्या आरोग्याशी जवळचा संबंध असतो, असे अधोरेखित करून तंबाखू सोडण्याची आणि सेवनाला विरोध करण्याची प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. युवा तंबाखूच्या सेवनाला बळी पडू नये याची जबाबदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी ज्येष्ठांना केले.
या वर्षीच्या 60 दिवसांच्या मोहिमेमध्ये पाच प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले :
- तंबाखूच्या धोक्यांबद्दल विशेषत: तरुण आणि ग्रामीण समुदायांमध्ये सार्वजनिक जागरूकता वाढवणे;
- शाळा आणि महाविद्यालये तंबाखूपासून मुक्त ठेवण्यासाठीच्या तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन सुधारणे;
- युवांच्या हाती तंबाखू पडू नये यासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची विशेषतः COTPA 2003 आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स प्रतिबंधक कायदा 2019 ची अंमलबजावणी प्रभावी करणे;
- तंबाखूचे उच्चाटन करण्यासाठी आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्र काम करतात अशा तंबाखूमुक्त गावांना प्रोत्साहन देणे; आणि
- सोशल मीडियाचा, डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून तंबाखूमुळे होणारे नुकसान आणि सोडल्यामुळे युवांना होणाऱ्या फायद्यांविषयी ठाम संदेश पोहोचवणे.
सर्व सहभागींनी तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त राहण्यासाठी ‘तंबाखूला नाही म्हणण्याची’ प्रतिज्ञा केली. या प्रसंगी विद्यार्थी आणि वलयांकित व्यक्तींसह छायाचित्रे काढण्यात आली. प्रसिद्ध व्यक्ती, खेळाडू आणि इन्फ्लुएन्सर ज्यामध्ये अपरशक्ती खुराना, मनू भाकर, नवदीप सिंह, अंकित बैंयापुरिआ, गौरव चौधरी आणि जान्हवी सिंह आदींचा समावेश होता, त्यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि आपले मनोगत मांडले.
तंबाखू वापराच्या घातक परिणामांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सर्व शाळांमध्ये दाखवण्याकरता जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या शैक्षणिक व्हिडिओचे प्रसारण यावेळी करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना, गावे तंबाखूमुक्त करण्यासाठी एसओपी अर्थात प्रमाणित कार्यवाही प्रक्रिया आणि कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्यांसाठी तंबाखू नियंत्रण कायदे 2024 च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना अशा तीन महत्त्वाच्या पुस्तिका या कार्यक्रमात प्रकाशित करण्यात आल्या. तंबाखू सेवनामुळे झालेल्या कर्करोगातून वाचलेल्यांचा गट ‘व्हॉईस ऑफ टोबॅको व्हिक्टिम्स’ (व्हीओटीव्ही) च्या सदस्यांचा अनुभव कथनाचा व्हिडिओ कार्यक्रमात दाखवण्यात आला. दोन प्रसिद्ध मोटारसायकलस्वार गट – हर्ले ओनर्स गृप आणि दिल्ली बायकर्स ब्रेकफास्ट रन – यांच्या जनजागृतीपर रॅलीला झेंडा दाखवून सुरुवात झाली.
कार्यक्रमाचा समारोप केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सर्व भागधारकांना समाज माध्यमांद्वारे या मोहिमेत सक्रीय राहण्याचे आवाहन करून केला. मोहिमेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आणि प्रगतीविषयी समाज माध्यमांवर वेळोवेळी माहिती देऊन मोहिमेचा संदेश देशभरातील जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करून या मोहिमेला पाठिंबा दर्शवण्यासाठी मंत्रालयाने सर्वांना प्रोत्साहन दिले.
पार्श्वभूमी:
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गेल्या वर्षी, 31 मे 2023 रोजी जागतिक तंबाखूमुक्त दिवसाचे औचित्य साधून पहिल्या तंबाखूमुक्त युवा मोहिमेची सुरुवात केली. मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी 500 हून अधिक प्रेक्षक प्रत्यक्ष उपस्थित होते व त्याशिवाय अनेकजण दूरदृश्य माध्यमातून सहभागी झाले होते. केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्र, जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी व इतर प्रसिद्ध व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. तंबाखूमुक्त शिक्षण संस्थांमधील 300 पेक्षा जास्त शालेय विद्यार्थी, माय भारत उपक्रमातील एनएसएसचे स्वयंसेवक आणि नागरी संस्था-संघटनांचे प्रतिनिधींचाही कार्यक्रमात सहभाग होता.
या कार्यक्रमाची लिंक: https://youtube.com/live/aosbWe7eNOY?feature=share
तंबाखूला नकार प्रतिज्ञेची लिंक: https://pledge.mygov.in/say-no-to-tobacco/
* * *
N.Chitale/SonaliK/Reshma/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2058316)
Visitor Counter : 59