माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईतील चित्रपट क्षेत्रातील प्रमुख संस्थांचा घेतला आढावा
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ॲनिमेशन क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठीच्या राष्ट्रीय केंद्राच्या प्रगतीचा घेतला आढावा; एव्हीजीसी क्षेत्रासाठी संपूर्ण उद्योगाच्या अभिमुखतेवर दिला भर
Posted On:
23 SEP 2024 7:26PM by PIB Mumbai
मुंबई, 23 सप्टेंबर 2024
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईतील भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) प्रांगणाला भेट देऊन केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (सीबीएफसी) आणि भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या विविध उपक्रमांचा विस्तृत आढावा घेतला.
आपल्या दौऱ्यात अश्विनी वैष्णव यांनी गुलशन महल या वारसा इमारतीला आणि भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयालाही भेट दिली. ही स्थळे भारतीय चित्रपटांचा मूक युगापासून ते आजवरचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा प्रदर्शित करतात तसेच देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीत चित्रपटांच्या अतुलनीय योगदानावर प्रकाश टाकतात.
केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी केंद्रीय मंत्र्यांना प्रमाणपत्र प्रक्रियेतील नवीनतम उपक्रम आणि एकूणच चित्रपट उद्योगाबद्दल माहिती दिली.
अश्विनी वैष्णव यांनी आपल्या आढाव्यात चित्रपट क्षेत्रातील रोजगार वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांवर भर दिला. उच्च दर्जाच्या आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य असलेल्या नोकऱ्या निर्माण करणाऱ्या योजना तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. भारताचा चित्रपट सृष्टीचा वारसा पुनर्संचयित आणि जतन करण्याच्या अनुकरणीय कार्यासाठी त्यांनी एनएफडीसी – एनएफएआय या संस्थांची प्रशंसा केली.
देशाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या चित्रपटांचे जतन करण्याच्या प्रयत्नांना अधिक बळकटी हवी ,यामुळे भावी पिढ्यांना या समृद्ध कलात्मक वारशाचा आनंद घेता येईल आणि त्यातून शिकता येईल, असे ते म्हणाले. ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठीच्या राष्ट्रीय केंद्राच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांमध्ये संपूर्ण उद्योगाभिमुखतेच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.
वैष्णव यांनी ॲनिमेशन क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठीच्या राष्ट्रीय केंद्राच्या प्रगतीचाही आढावा घेतला आणि भारतीय मनोरंजन उद्योगातील उदयोन्मुख क्षेत्रे म्हणून ॲनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्सच्या महत्त्वावर भर दिला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम क्षेत्राच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा, एनएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक प्रितुल कुमार, सीबीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सिंग तसेच एनएफडीसी आणि सीबीएफसी चे इतर अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
आपल्या एनएफडीसी भेटीच्या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'एक पेड मा के नाम' या उपक्रमांतर्गत एनएफडीसीच्या आवारात वृक्षारोपण देखील केले.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2058003)
Visitor Counter : 43