श्रम आणि रोजगार मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी ईपीएफओचा जुलै 2024ची तात्पुरती वेतनपट आकडेवारी केली जारी
ईपीएफओ मध्ये जुलै 2024 मध्ये आजवरच्या सर्वोच्च 19.94 लाख निव्वळ सदस्यांची भर; ईपीएफओ मध्ये 10.52 लाख नवीन सदस्यांची नोंदणी
Posted On:
23 SEP 2024 7:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2024
केंद्रीय श्रम आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली येथे ईपीएफओच्या जुलै 2024ची तात्पुरती वेतनपट आकडेवारी जारी केली. त्यांनी नमूद केले की ईपीएफओत जुलै 2024 मध्ये 19.94 लाख निव्वळ सदस्यांचा समावेश झाला आहे, जी एप्रिल 2018 मध्ये वेतनपट आकडेवारी मागोवा घेण्यास सुरुवात झाल्यापासून सर्वाधिक नोंदवलेली वाढ आहे.
ईपीएफओ वेतनपट आकडेवारीची (जुलै 2024) ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
समग्र सदस्यसंख्या वाढ:
ईपीएफओ मध्ये जुलै 2024 मध्ये 10.52 लाख नवीन सदस्यांचा समावेश झाला, जे जून 2024 च्या तुलनेत 2.66% तर जुलै 2023 च्या तुलनेत 2.43% वृद्धी दर्शवते. नवीन सदस्यत्वातील या वाढीचे श्रेय रोजगाराच्या वाढत्या संधी, कर्मचारी लाभाबाबत वाढलेली जागरूकता आणि ईपीएफओ च्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या यशस्वी कार्यक्रमांना जाते.
पुन्हा सामील होणारे सदस्य:
प्रणालीतून बाहेर पडलेले अंदाजे 14.65 लाख सदस्य जुलैमध्ये पुन्हा ईपीएफओ मध्ये सामील झाले.
18 ते 25 वयोगट नवीन सदस्यत्वात आघाडीवर आहे:
जुलै 2024 मध्ये 8.77 लाख निव्वळ सदस्यांच्या समावेशासह 18-25 वयोगटात सर्वाधिक वाढ दिसून आली.
महिला सदस्यत्वात वाढ:
जुलै 2024 मध्ये सुमारे 3.05 लाख नवीन महिला सदस्य ईपीएफओ मध्ये सामील झाल्या, गत वर्षाच्या तुलनेत ही 10.94% वाढ दर्शवते. वेतनपट आकडेवारीचा मागोवा सुरु झाल्यापासून एकूण, 4.41 लाख निव्वळ महिला सदस्य यात जोडल्या गेल्या; जुलै 2023 च्या तुलनेत 14.41% वाढ झाली असून ती महिलांसाठीची सर्वाधिक मासिक वाढ दर्शवते. हे वाढत्या महिला सहभागासह अधिक समावेशक मनुष्यबळाकडे वळल्याचे निदर्शक आहे.
राज्यनिहाय योगदान:
जुलै 2024 मधील निव्वळ सदस्यांमध्ये 59.27% वाटा हा महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा आणि गुजरात राज्यांचा आहे. तर एकत्रितपणे 11.82 लाख सदस्यांचा समावेश झाला. एकूण नवीन सदस्यांपैकी 20.21% योगदान देत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.
उद्योगानुसार कल :
उत्पादन, संगणक सेवा, बांधकाम, अभियांत्रिकी, बँकिंग (बिगर-राष्ट्रीयीकृत) आणि खाजगी क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक मीडिया यासारख्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय सदस्य वृद्धी दिसून आली. उल्लेखनीय म्हणजे, 38.91% निव्वळ वाढ तज्ञ सेवांमधून आली आहे, ज्यात मनुष्यबळ पुरवठादार, कंत्राटदार आणि सुरक्षा सेवा यांचा समावेश आहे.
कर्मचारी नोंदणी अद्ययावत करणे ही निरंतर प्रक्रिया असून आकडेवारी जारी करणे ही देखील सातत्यपूर्ण प्रक्रिया असल्याने वरील वेतनपट आकडेवारी ही तात्पुरती आहे. त्यामुळे मागील आकडेवारी दर महिन्याला अद्ययावत केली जाते. एप्रिल-2018 पासून, ईपीएफओ सप्टेंबर 2017 नंतरच्या कालावधीचा समावेश असलेली वेतनपट आकडेवारी जारी करत आहे.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2057997)
Visitor Counter : 49