अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
"विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024" या 4 दिवसीय महामहोत्सवाचे उद्यापासून नवी दिल्ली येथे आयोजन
विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024 मध्ये 90 हून अधिक देश, 26 भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि 18 केंद्रीय मंत्रालये आणि संबंधित सरकारी संस्थांचा सहभाग
जपान भागीदार देश असेल आणि व्हिएतनाम आणि इराण प्रमुख देश म्हणून होणार सहभागी
कार्यक्रमादरम्यान संकल्पनाधारित चर्चासत्रे, राज्य आणि देश-विशिष्ट परिषदांसह 40 हून अधिक माहितीपर सत्रांचे आयोजन
Posted On:
18 SEP 2024 10:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2024
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय नवी दिल्लीतील भारत मंडपमच्या 70,000 चौरस मीटर क्षेत्रफळावर विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024 चे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. 19 ते 22 सप्टेंबर, 2024 दरम्यान आयोजित या जागतिक कार्यक्रमात 90 हून अधिक देश, 26 भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि 18 केंद्रीय मंत्रालये आणि संबंधित सरकारी संस्थां सहभागी होतील. हा कार्यक्रम अन्न प्रक्रिया क्षेत्रातील नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांच्या प्रामुख्याने अभिसरणाची खात्री देतो.
उद्यापासून सुरू होणाऱ्या विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024 चा देशांतर्गत आणि जागतिक सहभागींना खऱ्या अर्थाने अभूतपूर्व अनुभव देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय (एमओएफपीआय) तयारीला अंतिम रूप देत आहे. अन्नप्रक्रियेतील जागतिक बलस्थान म्हणून भारताच्या उदयोन्मुख भूमिकेवर प्रकाश टाकत यावर्षीचा चार दिवसीय कार्यक्रम ऐतिहासिक ठरण्याची ग्वाही देतो.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी; केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू हे या सोहोळ्याला उपस्थित असतील. चिराग पासवान आणि रवनीत सिंग बिट्टू हे उद्योग क्षेत्रातील धुरिणींशी प्रत्यक्ष संवाद साधतील तसेच मंत्री आणि विदेशातील शिष्टमंडळांसोबत द्विपक्षीय G2G बैठका घेतील.
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान भारतातील अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या वाढीसाठी आणि विकासासाठी सरकारचे उपक्रम आणि भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकताना या कार्यक्रमादरम्यान आयोजित मेळाव्याला संबोधित करतील.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी एक उच्च-स्तरीय सीईओ गोलमेज परिषद देखील आयोजित केली जाईल ज्याचे सह-अध्यक्षपद केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि चिराग पासवान भूषवतील. रवनीत सिंह बिट्टू हे देखील सीईओ गोलमेज बैठकीला संबोधित करतील.
याशिवाय, अपेडा, एमपीईडीए आणि कमोडिटी बोर्डांद्वारे आयोजित रिव्हर्स बायर सेलर बैठकीत 1000 पेक्षा जास्त खरेदीदार सहभागी होतील. एफएसएसएआय द्वारे दुसऱ्या विश्व खाद्यान्न नियामक शिखर परिषदेचे आयोजन 20-21 सप्टेंबर 2024 या कालावधीत विश्व भारतीय खाद्य महोत्सवाच्या संयोगाने केले जात आहे. जपान हा विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024 साठी भागीदार देश असेल. याशिवाय व्हिएतनाम आणि इराण प्रमुख देश म्हणून सहभागी होतील.
तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगात लक्षणीय बदल झाले आहेत आणि त्याचा लाभ कृषी क्षेत्रालाही झाला आहे.तंत्रज्ञान आधारित खाद्यान्न कृती (फूड-टेक ॲक्टिव्हिटी) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सुरक्षिततेच्या उपाययोजना यामुळे कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात बदल घडून येत आहेत.या क्षेत्रांतील अशी प्रगती या क्षेत्राच्या विकासाला गतिमान करत आहे.
या कार्यक्रमात 40 हून अधिक ज्ञानसत्रे आयोजित करण्यात आली आहेत, ज्यात विषयाशी संबंधीत चर्चा, तसेच राज्य आणि देश-निर्दिष्ट परिषदांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, जागतिक कृषी-अन्न कंपन्यांच्या 100 हून अधिक CXOs सह उद्योग-नेतृत्वांसोबत पॅनेल चर्चा देखील आयोजित केल्या जातील.
उद्घाटन सोहळ्यासाठी ज्येष्ठ अनुभवी धोरणकर्ते, परदेशी मान्यवर, उद्योग जगतातील नेते आणि शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी एकत्र येणार असून ते या कार्यक्रमासाठी एक प्रेरणादायी उपक्रम सादर करणार आहेत. खाद्यान्न उद्योगातील विविध पैलूंचे प्रदर्शन करणारे- आंतरराष्ट्रीय मंडप, राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांचे मंडप आणि विशेष म्हणजे पाळीव प्राण्यांचा मंडप,अशा विविध दालनांतून एक प्रदर्शन आयोजित केले जाईल.हॉल क्रमांक 14 मध्ये अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे उपक्रम मांडले जातील आणि मंत्रालयाच्या पॅव्हेलियनमधील अनेक स्टार्ट-अप नवकल्पनांवर हे प्रदर्शन प्रकाश टाकेल. याव्यतिरिक्त, एक तंत्रज्ञान पॅव्हेलियन असेल जेथे ऑटोमेशन, अन्न सुरक्षा आणि टिकाऊ पॅकेजिंगवर लक्ष केंद्रित करून अन्न प्रक्रियेतील अत्याधुनिक नवकल्पनांचे प्रदर्शन केले जाईल.यंत्रसामग्री, पॅकेजिंग आणि अन्न सेवा उपकरणांमधील आधुनिक प्रगती प्रदर्शित करण्यासाठी ही एक समर्पित जागा असेल.
वर्ल्ड फूड इंडिया 2024 याला व्यापक रुप देण्यासाठी, आयोजकांनी स्वाद सूत्र ही पाककला स्पर्धाही आयोजित केली आहे, ज्यामध्ये भारतभरातील प्रादेशिक पदार्थांना विशेष प्राधान्य देऊन त्यांचेही प्रदर्शन मांडण्यात येईल.
फलदायी चर्चा करण्यासाठी, नवीन सहयोग निर्माण करण्यासाठी आणि जागतिक अन्न उद्योगात भारताची वाढती प्रतिष्ठा अधोरेखित करण्यासाठी रचना केलेला जागतिक दर्जाचा कार्यक्रम देण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय सज्ज झाले आहे.
S.Patil/V.Joshi/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2056436)
Visitor Counter : 83