पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे ‘सुभद्रा’ या सर्वात मोठ्या महिला-केंद्रित योजनेचा केला शुभारंभ


10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरणाची केली सुरुवात

पंतप्रधानांच्या हस्ते 2800 कोटींहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

1000 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची केली पायाभरणी

प्रधानमंत्री आवास योजनेच्या 26 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळ्यात पंतप्रधानांचा सहभाग

पंतप्रधानांच्या हस्ते अतिरिक्त घरांच्या सर्वेक्षणासाठी Awaas+ 2024 ॲप चे उद्घाटन

प्रधानमंत्री आवास योजना – शहरी 2.0 च्या कार्यान्वयनाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे केली जारी

"या राज्याने आमच्यावर मोठा विश्वास ठेवला असून, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही” : पंतप्रधान

केंद्रातील एनडीए सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकाळात गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठे निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

कोणताही देश, कोणतेही राज्य तेव्हाच प्रगती करते, जेव्हा तिथल्या निम्म्या लोकसंख्येचा, म्हणजेच आपल्या स्त्री शक्तीचा विकासात समान सहभाग असतो: पंतप्रधान

प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

सरदार पटेल यांनी असामान्य इच्छाशक्तीचे प्रदर्शन करून देशाला एकसंध केल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार

Posted On: 17 SEP 2024 5:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे ‘सुभद्रा’ या ओदिशा सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला. केवळ महिलांसाठीची ही सर्वात मोठी योजना असून, 1 कोटीहून अधिक महिलांना त्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधानांनी 10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यात निधी हस्तांतरित करण्याची सुरुवातही केली. पंतप्रधान मोदी यांनी रु. 2800 कोटीहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली आणि त्याचे लोकार्पण केले, तसेच रु.1000 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी पीएमएवाय-जी, अर्थात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)  अंतर्गत, सुमारे 14 राज्यांमधील जवळजवळ 10 लाख लाभार्थ्यांना मदतीचा पहिला हप्ता जारी केला, देशभरातील पीएमएवाय, अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण आणि शहरी) 26 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळ्यात ते सहभागी झाले, आणि पीएमएवाय (ग्रामीण आणि शहरी) योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या चाव्या सुपूर्द केल्या. त्यानंतर त्यांनी पीएमएवाय –जी  साठी अतिरिक्त घरांच्या सर्वेक्षणासाठी Awaas+ 2024 ॲप चे उद्घाटन केले आणि प्रधानमंत्री आवास योजना - शहरी (पीएमएवाय – यु ) 2.0 च्या कार्यान्वयनाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आजच्या या कार्यक्रमाचा भाग बनण्याची आपल्याला संधी मिळाली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त  केली, आणि ते म्हणाले की, परमेश्वराचा आशीर्वाद असतो, तेव्हाच जनतेची आणि भगवान जगन्नाथांची सेवा करण्याची संधी मिळते.

सध्या सुरु असलेला गणेशोत्सव, आजची  अनंत चतुर्दशी आणि विश्वकर्मा पूजा या शुभ दिवसाची  नोंद घेत पंतप्रधान म्हणाले की, भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे कौशल्य आणि श्रम यांची भगवान विश्वकर्माच्या रूपात पूजा केली जाते. या निमित्ताने त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. अशा मंगल प्रसंगी ओदिशा येथील माता आणि भगिनींसाठी सुभद्रा योजना सुरू करण्याची आपल्याला संधी मिळाली, असे पंतप्रधान म्हणाले.

भगवान जगन्नाथांच्या भूमीतून आज देशभरातील 30 लाखांहून अधिक कुटुंबांना पक्की घरे सुपूर्द केल्याचा उल्लेख करून, पंतप्रधान म्हणाले की, ग्रामीण भागात 26 लाख घरे, तर शहरी भागात 4 लाख घरे जनतेला सुपूर्द करण्यात आली. ओदिशा मध्ये आज पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आलेल्या हजारो कोटींहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांवर भाष्य करताना पंतप्रधानांनी याबद्दल ओदिशामधील आणि देशातील नागरिकांचे अभिनंदन केले.

नवीन भाजपा सरकार सत्तेत आल्यावर, नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात आपण सहभागी झालो होतो, त्यानंतरचा ओदिशाचा हा आपला पहिलाचा दौरा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी आठवण करून दिली की, निवडणूक प्रचारादरम्यान ते म्हणाले होते की, "डबल इंजिन"सरकार अस्तित्वात आले, तर ओदिशा प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर पुढे जाईल. ग्रामीण, वंचित, दलित, आदिवासी, महिला, तरुण, मध्यमवर्गीय कुटुंबांपासून, ते समाजाच्या विविध घटकांची स्वप्ने आता पूर्ण होतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.दिलेली आश्वासने जलद गतीने पूर्ण केली जात आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आतापर्यंत पूर्ण केलेल्या आश्वासनांबद्दल सांगताना ते म्हणाले की, श्री जगन्नाथ पुरी मंदिराचे चारही दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले, मंदिराचे रत्न भांडारही खुले करण्यात आले.ते पुढे म्हणाले की, भाजपा सरकार ओदिशाच्या नागरिकांच्या सेवेसाठी झटत आहे. लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. याबद्दल त्यांनी  ओदिशा सरकारचे अभिनंदन केले आणि प्रशंसा केली.

केंद्रातील सरकार आज 100 दिवस पूर्ण करत असल्याने आजचा दिवस खास असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या काळात भारतातील गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांच्या कल्याणासाठी मोठे निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 100 दिवसांच्या कामगिरीबद्दल सांगताना पंतप्रधान म्हणाले की, गरिबांसाठी 3 कोटी पक्की घरे बांधण्याचा निर्णय, तरुणांसाठी 2 लाख कोटी रुपयांच्या पंतप्रधान पॅकेजची घोषणा- जिथे खाजगी कंपन्यांमध्ये त्यांच्या पहिल्या नोकरीचा पहिला पगार सरकार भरेल, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 75,000 नवीन जागांची भर आणि 25,000 गावे पक्क्या रस्त्यांनी जोडायला मंजुरी, या निर्णयांचा यात समावेश असल्याचे ते म्हणाले.पंतप्रधानांनी पुढे माहिती दिली की, आदिवासी व्यवहार मंत्रालयासाठी अर्थसंकल्पीय तरतूद जवळजवळ दुप्पट करण्यात आली, सुमारे 60,000 आदिवासी गावांच्या विकासासाठी विशेष प्रकल्प जाहीर करण्यात आले , सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना सुरू करण्यात आली, आणि व्यावसायिक, व्यवसाय मालक आणि उद्योजकांसाठी आयकरात कपात करण्यात आली.

पंतप्रधानांनी माहिती दिली की गेल्या 100 दिवसांत देशाने 11 लाखांहून अधिक लखपती दिदी निर्माण होताना पाहिले आहे, तेलबिया आणि कांदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत, भारतीय शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून परदेशांत उत्पादित तेलांवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी बासमती तांदळावरील निर्यात शुल्कात कपात करण्यात आली आहे, कोट्यवधी शेतकऱ्यांना सुमारे 2 लाख कोटी रुपये लाभ होईल हे लक्षात घेऊन पिकांच्या किमान हमी भावात वाढ करण्यात आली आहे. गेल्या 100 दिवसांत प्रत्येकाच्या लाभासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत, असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.

देशातील निम्मी लोकसंख्या असलेली स्त्री शक्ती  सहभागी होते तेव्हा देशाची प्रगती वेगाने होते याकडे लक्ष वेधून घेत पंतप्रधान म्हणाले की महिलांची प्रगती आणि त्यांचे सबलीकरण ही ओदिशाच्या विकासाची गुरुकिल्ली ठरेल. ओदिशातील लोककथांपैकी एका कथेचा  उल्लेख करून त्यांनी सांगितले की भगवान जगन्नाथांच्या जोडीला देवी सुभद्रेचे अस्तित्व आपल्याला महिला सबलीकरणाविषयी सांगते. सुभद्रा देवीचे रूप असलेल्या सर्व माता, भगिनी आणि कन्यांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो, असे ते म्हणाले.

नवनिर्वाचित भाजपा सरकारने आपल्या सुरुवातीच्या निर्णयांमध्ये ओदिशातील माता, भगिनींना सुभद्रा योजनेची भेट दिल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की ओदिशातील 1 कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. योजनेअंतर्गत महिलेला  एकूण 50,000 रुपये रक्कम बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे दिली जाईल. भारतीय रिझर्व बँकेच्या डिजिटल चलन प्रायोगिक प्रकल्पाशी ही योजना संलग्न करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. देशातील पहिल्या डिजिटल चलन प्रकल्पाशी जोडून घेतल्याबद्दल त्यांनी ओदिशातील महिलांचे अभिनंदन केले.

राज्यभरातील अनेक यात्रांच्या आयोजनाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की यातून सुभद्रा योजना ओदिशातील प्रत्येक माता, भगिनी आणि कन्येपर्यंत पोहोचेल. त्यांनी सांगितले की योजनेच्या संपूर्ण माहितीविषयी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. अनेक कर्मचारी स्वेच्छेने या सेवेत उत्साहाने सहभागी झाले आहेत. जनजागृतीसाठी कार्यरत सरकार, प्रशासन, आमदार, खासदार आणि पक्ष कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

प्रधान मंत्री आवास योजनेत भारतातील महिला सबलीकरणाचे प्रतिबिंब आहे, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली आणि महिलांच्या नावे मालमत्ता नोंदणीकरण होत असल्याचे सांगितले. देशातील जवळपास 30 लाख कुटुंबांनी आज गृहप्रवेश केला आहे तर 15 लाख नव्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे देण्यात आली आहेत आणि 10 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात गेल्या 100 दिवसांत निधी जमा करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, हे पवित्र कार्य आम्ही ओदिशाच्या पवित्र भूमीवरून केले आहे आणि ओदिशातील गरीब कुटुंबांचा मोठ्या संख्येने यात समावेश आहे. त्यांनी सांगितले की आज कायमस्वरुपी घर प्राप्त केलेल्या लाखो कुटुंबांसाठी आयुष्याची नवी सुरुवात होत आहे.

आदिवासी कुटुंबाच्या गृहप्रवेश सोहळ्यात सहभागी झाल्याचा सकाळचा अनुभव कथन करताना पंतप्रधानांनी सांगितले की त्यांचा आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आपण कधीही विसरणार नाही. हा अनुभव, ही भावना खजिन्याइतकी मोलाची आहे. गरीब, दलित, वंचित आणि आदिवासी समुदायाच्या जीवनात बदल घडून आल्याने झालेल्या या आनंदाने मला अधिक कष्ट करण्याची ऊर्जा दिली आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

विकसित राज्यासाठी आवश्यक ते सर्व काही ओदिशामध्ये आहे अशी टिप्पणी करून पंतप्रधान म्हणाले की युवांचे कौशल्य, महिलांचे सामर्थ्य  , नैसर्गिक साधनसंपत्ती, उद्योगांसाठी संधी, पर्यटनाच्या प्रचंड शक्यता असे सगळे इथे हजर आहे. त्यांनी पुढे सांगितले की गेल्या 10 वर्षांत केंद्रात असताना सरकारने ओदिशाकडे प्राधान्याने लक्ष पुरवले आहे. 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत केंद्राकडून ओदिशाला आज तिप्पट निधी मिळतो आहे. यापूर्वी अंधारात राहिलेल्या योजनांवर आता अंमलबजावणी होत आहे याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला. आयुष्मान योजनेविषयी पंतप्रधानांनी सांगितले की ओदिशातील जनतेला 5 लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचारांचा लाभ मिळेल आणि कोणत्याही उत्पन्न गटातील 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनाही 5 लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचारांचा लाभ  दिला जाईल. पुढे त्यांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीत मोदींनी दिलेल्या आश्वासनाची ही पूर्तता आहे.

पंतप्रधानांनी ओदिशातील दलित, वंचित आणि आदिवासी समुदाय दारिद्र्याविरोधातील मोहिमेचे सर्वात मोठे लाभार्थी ठरतील, हे अधोरेखित केले.आदिवासी समुदायाच्या कल्याणासाठी वेगळ्या मंत्रालयाची निर्मिती, आदिवासींना त्यांची पाळेमुळे असलेल्या जमिनी, वन हक्क, युवा आदिवासींना शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळवून देणे असो किंवा ओदिशातील आदिवासी महिलेला देशाचे सन्माननीय राष्ट्रपती पद; या बाबी सरकारने प्रथमच केल्या आहेत.

पंतप्रधानांनी सांगितले की ओदिशातील अनेक आदिवासी क्षेत्रे आणि समुदाय अनेक पिढ्या विकासापासून वंचित राहिले होते. प्रधान मंत्री जनमन योजनेने आदिवासींमधील सर्वाधिक मागास जमातींना पाठबळ दिले, यामध्ये ओदिशातील 13 आदिवासी समुदायांचा समावेश आहे.

जनमन योजनेंतर्गत सरकार या सर्व समुदायांना विकास योजनांचा लाभ देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. आदिवासी भागांना सिकलसेल ॲनिमियापासून मुक्त करण्यासाठी देखील मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत गेल्या 3 महिन्यांत 13 लाखांहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

"भारत आज अभूतपूर्व पद्धतीने पारंपरिक कौशल्ये जतन करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे", असे पंतप्रधान म्हणाले. देशातील लोक शेकडो, हजारो वर्षांपासून लोहार, कुंभार, सोनार आणि शिल्पकार यासारख्या कामात गुंतलेले आहेत, असे  ते  म्हणाले. गेल्या वर्षी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सुरू करण्यात आलेल्या विश्वकर्मा योजनेत सरकार 13,000 कोटी रुपये खर्च करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 20 लाख लोकांनी नोंदणी केली असून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, असेही ते म्हणाले. या लोकांना आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी हजारो रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे, याशिवाय, कोणत्याही हमीशिवाय बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज दिल्या जाण्याच्या बाबींचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. गरीबांसाठी आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेची ही हमी विकसित भारताची खरी ताकद बनेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

अमाप खनिजे आणि नैसर्गिक संपत्तीने भरलेल्या ओदिशाच्या लांब किनाऱ्यांबाबत बोलताना पंतप्रधानांनी या संसाधनांना ओदिशाची ताकद बनवायला हवे, अशी टिप्पणी केली.  पुढील 5 वर्षांमध्ये, आपल्याला ओदिशाच्या रस्ते आणि रेल्वे संपर्क सुविधेला नव्या उंचीवर न्यायचे  आहे, असे ते म्हणाले.आज नव्याने उद्घाटन झालेल्या रेल्वे आणि रस्त्यांसंबंधीच्या प्रकल्पांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, लांजीगढ रोड - अंबोदला - डोईकालू रेल्वे मार्ग, लक्ष्मीपूर रोड - सिंगारम - टिकरी रेल्वे मार्ग, ढेंकनाल - सदाशिवपूर - हिंडोल रोड रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित करण्याची संधी  मला मिळाली  आहे. जयपूर - नवरंगपूर नवीन रेल्वे मार्गाची पायाभरणी करण्याबरोबरच पारादीप बंदरापासून संपर्क वाढवण्याचे कामही आज सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे ओदिशातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील,हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पुरी ते कोणार्क रेल्वे मार्ग आणि हाय-टेक 'नमो भारत रॅपिड रेल्वे'ही  लवकरच सुरू केली  जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. आधुनिक पायाभूत सुविधांमुळे ओदिशासाठी संधींचे नवीन दरवाजे उघडतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज देश ‘हैदराबाद मुक्ती दिन’ साजरा करत आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.  विलक्षण इच्छाशक्ती दाखवत देशाला एकसंध  करण्याच्या सरदार पटेल यांच्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. सरदार पटेल यांनी त्या वेळच्या अत्यंत अशांत परिस्थितीत भारतविरोधी कट्टरतावादी शक्तींना रोखून हैदराबाद मुक्त केले, असे ते म्हणाले.हैदराबाद मुक्ती दिन ही केवळ एक तारीख नाही, तर देशाच्या अखंडतेसाठी, आपल्या राष्ट्राप्रती असलेल्या उत्तरदायित्वासाठी ही एक प्रेरणा आहे, यावर मोदींनी भर दिला.

भारताला मागे ठेवण्याची शक्यता असलेल्या  आव्हानांवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील गणेश उत्सवाच्या महत्त्वावर भर दिला आणि राष्ट्र भावनेला नवसंजीवनी देण्यासाठी आणि वसाहतवादी राज्यकर्त्यांच्या फुटीरतावादी डावपेचांचा सामना करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या या उत्सवाचे आयोजन केले होते, असे ते म्हणाले. गणेश उत्सव भेदभाव आणि जातीयवादाच्या पलिकडे जाऊन एकतेचे प्रतीक बनला आहे , असे सांगून, गणेश उत्सवाच्या वेळी संपूर्ण समाज एकसंध दिसतो, असे पंतप्रधान म्हणाले.

आज धर्म आणि जातीच्या आधारे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात सर्वांनी सावध राहावे असा इशारा पंतप्रधानांनी दिला. गणेश उत्सवात पंतप्रधानांचा सहभाग आणि कर्नाटकातील गणेशमूर्ती जप्त केल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे काही गटांमध्ये निर्माण झालेले वैमनस्य याकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, समाजात विष कालवणारी  ही द्वेषपूर्ण विचारसरणी आणि मानसिकता अत्यंत घातक आहे. अशा द्वेषी शक्तींना फोफावू देऊ नका, असे आवाहन पंतप्रधानांनी सर्वांनी केले.

ओदिशा आणि देशाला यशाच्या नवीन उंचीवर स्थापित करण्यासाठी अनेक मोठे टप्पे आपण  गाठू,असा विश्वास पंतप्रधानांनी भाषणाच्या समारोपात व्यक्त केला.आगामी काळात देशाच्या विकासाची गती आणखी वेगवान होईल,अशी ग्वाही त्यांनी दिली.

ओदिशाचे राज्यपाल  रघुबर दास आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

पार्श्वभूमी

सुभद्रा योजनेअंतर्गत, 21-60 वयोगटातील सर्व पात्र लाभार्थ्यांना 2024-25 ते 2028-29 या 5 वर्षांच्या कालावधीत 50,000/- रुपयांची मदत दिली जाणार आहे. 10,000/- रुपयांची रक्कम वार्षिक दोन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या आधार-सक्षम आणि थेट बँक हस्तांतरण - सक्षम बँक खात्यात जमा केली जाणार आहे.या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी 10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरणाची सुरुवात केली.

पंतप्रधानांनी भुवनेश्वरमध्ये 2800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे  रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले आणि काही प्रकल्पांची पायाभरणी केली.हे रेल्वे प्रकल्प ओदिशातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवतील, प्रादेशिक विकासाला चालना देतील आणि संपर्क सुविधा सुधारणा घडवून आणतील.पंतप्रधानांनी 1000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणीही केली.

पंतप्रधानांनी सुमारे 14 राज्यांतील प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण अंतर्गत सुमारे 10 लाख लाभार्थ्यांना मदतीचा पहिला हप्ता जारी केला. या कार्यक्रमात,देशभरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण आणि शहरी या दोन्ही विभागात 26 लाख लाभार्थ्यांसाठी गृहप्रवेश सोहळाही आयोजित करण्यात आला होता.  पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण आणि शहरी) लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या चाव्या सुपूर्द केल्या,तसेच, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी अतिरिक्त घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी आवास+ 2024 या ॲपचा प्रारंभ केला. याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U) 2.0 कार्यान्वयन मार्गदर्शक तत्त्वे पंतप्रधानांनी जारी केली.

 

 

NC/Rajashree/Reshma/Shraddha/PM

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 2055661) Visitor Counter : 60