कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जीवन प्रमाण द्वारे निवृत्तिवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणाकरिता 1 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत डीएलसी मोहीम 3.0 चे आयोजन


देशातील सर्व जिल्हा टपाल कार्यालयांमध्ये डीएलसी मोहीम 3.0 यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभाग हा टपाल विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसोबत करणार सहयोग

Posted On: 13 SEP 2024 12:02PM by PIB Mumbai

 

निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाने निवृत्तीवेतन वितरक बँका, निवृत्तिवेतनधारक कल्याण संघटना, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि जीवन प्रमाण यांच्या सहकार्याने 2022 आणि 2023 मध्ये डिजिटल लाइफ सर्टिफिकेट अर्थात हयातीचा दाखला मोहीम यशस्वीरित्या आयोजित केली होती. वर्ष 2023 मध्ये, डीएलसी मोहीम 2.0 100 कोटी शहरांमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळी 1.45 कोटी निवृत्तिवेतनधारकांनी त्यांचे डीएलसी सादर केले. डीएलसी मोहीम 3.0 ही 1 ते 30 नोव्हेंबर, 2024 दरम्यान आयोजित केली जाईल असे निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाने सूचित केले आहे. डीएलसी मोहीम 3.0 देशभरातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि प्रमुख शहरांमध्ये आयोजित केली जाईल. निवृत्तीवेतन वितरक बँका, निवृत्तिवेतनधारक कल्याण संघटना, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि जीवन प्रमाण 157 शहरांमध्ये डीएलसी मोहीम राबवतील. सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये डीएलसी मोहीम 3.0 आयोजित करण्यासाठी, निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभाग हा टपाल विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेशी समन्वय साधेल आणि डीएलसी मोहीम 3.0 देशभरातील सर्व जिल्हा टपाल कार्यालयात आयोजित केली जाईल.

सर्व जिल्हा टपाल कार्यालयांमध्ये डीएलसी मोहीम 3.0 ची रूपरेषा ठरवण्यासाठी 12.9.2024 रोजी सचिव (पी अँड पीडब्ल्यू) व्ही. श्रीनिवास यांनी टपाल सेवा विभागाचे महासंचालक संजय शरण, टपाल विभागाच्या उपमहासंचालक राजुल भट्ट, आयपीपीबी चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विश्वेश्वरन, आयपीपीएम चे मुख्य महाव्यवस्थापक गुरशरण राय बन्सल यांच्यासोबत बैठक घेतली. निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहसचिव ध्रुबज्योती सेनगुप्ता, संचालक रविकिरण उबाळे हे या चर्चेत सहभागी झाले होते. जिल्हा टपाल कार्यालयांमध्ये डीएलसी मोहीम 3.0 आयोजित करण्यासाठी जिल्हा टपाल कार्यालये, निवृत्तिवेतनधारक कल्याणकारी संघटना, निवृत्तीवेतन वितरक बँका, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि जीवन प्रमाण यांच्याशी समन्वय साधतील यावर सहमती झाली. निवृत्तीवेतनधारकांना अँड्रॉइड स्मार्ट फोनवरून फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून जिल्हा टपाल कार्यालयांमध्ये जीवन प्रमाण दाखल करता येईल. आवश्यकतेनुसार डीएलसी दाखल करण्यासाठी टपाल विभाग वृद्धांना/ निवृत्तीवेतन धारकांना ही सेवा घरपोच उपलब्ध करेल. डीएलसी 3.0 मोहिमेला बॅनर, सोशल मीडिया, एसएमएस आणि लहान व्हिडिओंद्वारे जनजागृती करून व्यापक प्रसिद्धी दिली जाईल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय शिबिरांदरम्यान तांत्रिक सहाय्य करतील. निवृत्तीवेतनधारकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी सरकारचे प्रयत्न व्यापक आणि घनिष्ट करून निवृत्तीवेतनधारकांच्या राहणीमान सुलभतेत मोठे योगदान देण्याचा या सहयोगामागचा उद्देश आहे.

***

S.Tupe/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2054489) Visitor Counter : 89