पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा येथे सेमीकॉन इंडिया 2024 मध्ये आघाडीच्या  सेमीकंडक्टर कंपन्यांच्या सीईओंनी भारताची आणि पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची केली प्रशंसा

Posted On: 11 SEP 2024 3:40PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे सेमीकॉन इंडिया 2024 चे उद्घाटन केले. सेमीकॉन इंडिया 2024 चे  11 ते 13 सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले असून ‘सेमीकंडक्टरच्या भविष्याला आकार देणे ’ अशी यंदाची संकल्पना आहे. आहे. तीन दिवसीय परिषद भारताची सेमीकंडक्टर रणनीती आणि धोरण प्रदर्शित करतेज्यामागे भारताला सेमीकंडक्टरचे जागतिक केंद्र बनवण्याची कल्पना आहे. जगभरातील   आघाडीच्या सेमीकंडक्टर कंपन्या  या परिषदेत सहभागी होत आहेत . ही परिषद जागतिक नेते, कंपन्या आणि सेमीकंडक्टर उद्योगातील तज्ञांना एकत्र आणेल.  या परिषदेत 250 हून अधिक प्रदर्शक आणि 150 वक्ते सहभागी होत आहेत.

एसईएमआय (SEMI)  चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मनोचा यांनी सेमीकॉन 2024 मध्ये करण्यात आलेल्या स्वागताची प्रामुख्याने  'अभूतपूर्व' आणि 'भव्य ' या दोन शब्दांत प्रशंसा केली. त्यांनी या कार्यक्रमाची अभूतपूर्व व्याप्ती तसेच सेमीकंडक्टर्सच्या  संपूर्ण इलेक्ट्रॉनिक पुरवठा साखळीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जगभरातील 100 हून अधिक सीईओ आणि सीएक्सओ एकत्र आल्याचा  उल्लेख केला.

देश, जग, उद्योग आणि मानवतेच्या हितासाठी  सेमीकंडक्टर केंद्र निर्माण  करण्याच्या प्रवासात भारताचा विश्वासू भागीदार बनण्याच्या उद्योगाच्या वचनबद्धतेबद्दल त्यांनी आशावाद व्यक्त केला. भारतातील जलद वाढीच्या मॉडेलचा  पंतप्रधान मोदींचा कायदा असा उल्लेख करून मनोचा म्हणाले की, सेमीकंडक्टर उद्योग हा जगातील प्रत्येक उद्योगाचा  त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे मानवतेसाठी मूलभूत घटक  आहे. भारतातील 1.4 अब्ज लोक आणि जगातील 8 अब्ज लोकांसाठी काम करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टाटा इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रणधीर ठाकूर यांनी हे  ऐतिहासिक संमेलन आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आणि सेमीकंडक्टर उद्योग भारतातील भूमीवर  आणण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले.  या वर्षी 13 मार्च रोजी धोलेरा येथे भारतातील पहिली व्यावसायिक फॅब आणि आसाममधील जागीरोड येथे पहिल्या स्वदेशी OSAT कारखान्याची पंतप्रधानांनी पायाभरणी केल्याची आठवण करून दिली आणि सांगितले की दोन्ही प्रकल्पांना विक्रमी वेळेत सरकारकडून मंजुरी मिळाली. त्यांनी इंडिया  सेमीकंडक्टर मिशनद्वारा प्रदर्शित  सहकार्य आणि उत्कृष्ट से-डू अनुपात याला श्रेय दिले जे पंतप्रधानांच्या तातडीने कार्य करण्याच्या संदेशाला अनुरूप आहे. चिपमेकिंगसाठी महत्त्वाच्या असलेल्या 11 आवश्यक  क्षेत्रांचा उल्लेख करत डॉ. ठाकूर म्हणाले की, सरकारच्या प्रयत्नांमुळे ही सर्व क्षेत्रे  SEMICON 2024 मध्ये एकाच मंचावर एकत्र आली आहेत. ते म्हणाले  की  पंतप्रधानांची जागतिक पोहोच आणि भारताच्या सेमीकंडक्टर मिशनवर देण्यात आलेला भर यामुळे भविष्यातील विकासासाठी सर्व क्षेत्रांच्या प्रतिनिधींमध्ये महत्त्वपूर्ण  भागीदारी स्थापन होऊ शकली आहे.  सेमीकंडक्टर उद्योग विकसित भारत 2047 च्या दृष्टिकोनाचा  आधारस्तंभ बनेल आणि त्याचा रोजगार निर्मितीवर गुणात्मक प्रभाव पडेल  अशी ग्वाही त्यांनी पंतप्रधानांना दिली. त्यांनी भारताचे सेमीकंडक्टरचे  स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय पंतप्रधानांच्या नेतृत्वाला आणि दूरदृष्टीला  दिले आणि पंतप्रधानांचे वाक्य उद्धृत करत  म्हणाले, “हाच तो क्षण आहे, योग्य क्षण आहे. एनएक्सपी सेमीकंडक्टर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कर्ट सीवर्स यांनी सेमीकॉन 2024 चा भाग असल्याबद्दल नम्रपणे उत्सुकता व्यक्त केली आणि सांगितले की बदलत्या भारताच्या प्रवासाचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम आहे. महत्त्वाकांक्षा, विश्वास आणि सहयोग ही यशाची त्रिसूत्री असून आजचा हा कार्यक्रम सहयोगाचा आरंभ आहे. भारतातील बदलाबाबत ते म्हणाले की भारतातील काम हे जगासाठीच नव्हे तर देशासाठीही होत आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रातील वाढीचे परिणाम इतर क्षेत्रांवर दिसून येत असल्याचा उल्लेख करून त्यांनी सांगितले की येत्या काही वर्षांत या बदलामुळे भारत जगातील अत्यंत ताकदवान अर्थव्यवस्थेचे स्थान मिळवेल. एनएक्सपीने संशोधन आणि विकासासाठीचा खर्च दुपटीने वाढवून एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक केल्याची माहिती त्यांनी दिली. नवोन्मेष, लोकशाही आणि विश्वास या तीन घटकांचा समावेश करून व्यवसायांसाठी दीर्घकालीन पूरकतेचे वातावरण निर्माण केल्याचे श्रेय त्यांनी पंतप्रधानांना दिले.

रेनेसासचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिदेतोशी शिबाता यांनी आठवणीत राहील अशा सेमीकॉन इंडिया 2024 च्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले. भारतातील पहिला जोडणी व चाचणी प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात भागीदार होता आले हे अहोभाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. चाचणीसाठी पहिल्या सुविधेचे बांधकाम सुरू झाले असून नजीकच्या भविष्यात कारभाराची व्याप्ती बंगळुरू, हैदराबाद आणि नोएडा इथे वाढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढच्या वर्षात भारतातील मनुष्यबळात दुपटीने वाढ करून मूल्यवर्धित आधुनिक सेमीकंडक्टर डिझाईनशी संबंधित अनेक उपक्रम भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेमीकंडक्टर तंत्रज्ञान भारतात आणून पंतप्रधानांचे ध्येय साकारण्यास मदत होत असल्याबद्दल त्यांनी उत्साह व्यक्त केला.

आयएमईसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ल्युक वॅन डेन होवे यांनी सेमीकॉन 2024 बद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले आणि सांगितले की त्यांची दृष्टी आणि नेतृत्वाने भारतात सेमीकंडक्टर उत्पादनाचा मार्ग मोकळा केला. संशोधन आणि विकासासाठी दीर्घकालीन व्यवस्था निर्माण करून त्यात गुंतवणूक करण्याप्रति पंतप्रधानांच्या वचनबद्धतेचा संदर्भ देत ते म्हणाले की उद्योगासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आयएमईसी पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी आखणीला पाठबळ देण्यासाठी मजबूत आणि धोरणात्मक भागीदारी करण्यास तयार असल्याबाबत त्यांनी आश्वस्त केले. भरवशाच्या पुरवठा साखळीची गरज अधोरेखित करून होवे यांनी उद्गार काढले, “जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशापेक्षा अधिक विश्वासार्ह भागीदार कोण होऊ शकेल?!”

***

S.Patil/S.Kane/R.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2053806) Visitor Counter : 78