गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्रात मुंबई येथे मुंबई समाचारच्या '200 नॉट आऊट' माहितीपटाचे प्रकाशन
'मुंबई समाचार' हे आशियातील सर्वात जुने आणि जगातील तिसरे सर्वात जुने कार्यरत वर्तमानपत्र आहे
प्रविष्टि तिथि:
08 SEP 2024 10:23PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज महाराष्ट्रात मुंबई येथे मुंबई समाचारच्या '200 नॉट आऊट' या माहितीपटाचे प्रकाशन केले. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की कोणतीही संस्था विशेषतः स्थानिक वर्तमानपत्र दोन शतकांहून अधिक काळ चालवणे खूप कठीण आहे. मुंबई समाचारने विश्वासार्हतेचा आदर्श निर्माण केल्याचे ते म्हणाले. शाह म्हणाले की, अशी विश्वासार्हता मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कोणत्याही विचारधारेशी न जोडलेला राजकारणी जसे चांगले काम करू शकत नाही,त्याप्रमाणे एखाद्या विचारधारेशी संलग्न कोणतेही वर्तमानपत्र चांगले काम करू शकत नाही असे ते म्हणाले. ते म्हणाले की, मुंबई समाचार कोणत्याही विचारधारेशी जोडलेले न राहता कायम वाचकांशी जोडलेले राहून सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचवत राहिले आहे .
अमित शहा म्हणाले की, दीर्घकाळ वर्तमानपत्र चालवणे आणि पत्रकारितेच्या उद्दिष्टांशी निष्ठा राखत काम करत राहणे हे अत्यंत कठीण काम आहे, जे मुंबई समाचारने साध्य केले आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, अल्पसंख्याकांमध्ये जर कुणी अल्पसंख्याक असतील तर ते पारशी बांधव आहेत. ते म्हणाले की, अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांनी पारशी समुदायाकडून शिकले पाहिजे, जे केवळ कर्तव्य पार पाडण्यासाठी आपले जीवन जगतात आणि ज्यांनी कधीही कोणतीही मागणी न करता प्रत्येक क्षेत्रात योगदान दिले आहे. मुंबई समाचारच्या माध्यमातून पत्रकारितेतील कामा परिवाराचे हे योगदान गुजरात, गुजराती आणि भारत कधीही विसरू शकत नाही असे ते म्हणाले. जेव्हा मुंबईचे नाव बॉम्बेवरून बदलण्यात आले तेव्हा न्यायालयात सादर करण्यात आलेला सर्वात मोठा पुरावा म्हणजे मुंबई समाचार हे शीर्षक होते असे ते म्हणाले. अमित शहा म्हणाले की, मुंबई समाचार हे आशियातील सर्वात जुने आणि जगातील तिसरे सर्वात जुने वर्तमानपत्र आहे. आणि जगातील हे एकमेव वर्तमानपत्र आहे ज्याने आपली विश्वासार्हता कायम राखली आहे असे ते म्हणाले.

50 मिनिटांचा हा माहितीपट एका मिनिटाचेही संकलन न करता हिंदी आणि इंग्रजीमध्ये डब करण्यात यावा असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. यामुळे संपूर्ण देशाला समजेल की हे स्थानिक भाषेतील वर्तमानपत्र दोन शतके उलटूनही अजूनही कार्यरत आहे आणि तिसरे शतक पूर्ण करण्यासाठी तयार आहे असे ते म्हणाले.
***
JPS/SushamaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2053071)
आगंतुक पटल : 127