पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश

Posted On: 05 SEP 2024 1:21PM by PIB Mumbai

आदरणीय मान्यवर, विशेष अतिथीगण आणि माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवात तुम्हा सर्वांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. या अनोख्या उपक्रमासाठी मी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे अभिनंदन करतो.

मित्रांनो,

वेद हा असा ग्रंथ आहे ज्याची रचना हजारो वर्षांपूर्वी करण्यात आली होती. वेदांमधील सर्वात लोकप्रिय मंत्रांपैकी एक मंत्र सूर्याविषयी आहे.  आजही कोट्यवधी भारतीय दररोज त्याचा जप करतात. जगभरातील अनेक संस्कृतींनी आपापल्या पद्धतीने सूर्याचा आदर केला आहे. जगभरातील बहुतांश भागात सूर्याशी संबंधित सण देखील असतात. हा आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव सूर्याच्या प्रभावाचा उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण जगाला एकत्र आणतो. हा एक असा सण आहे जो आपल्याला एक चांगला ग्रह बनवण्यासाठी  मदत करेल.

मित्रांनो,

2015 मध्ये, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची सुरुवात एक लहानसे  रोप म्हणून झाली, तो एक आशा आणि आकांक्षाचा  क्षण होता. आज ते धोरण आणि कृतीतून प्रेरणा देणारा विशाल वृक्ष बनत आहे. इतक्या कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने शंभर देशांच्या सदस्यतेसह मोठा टप्पा गाठला आहे.

याशिवाय आणखी 19 देश पूर्ण सदस्यत्व मिळविण्यासाठी मसुदा  कराराला मान्यता देत आहेत. ‘एक जग, एक सूर्य, एक ग्रीड’ या संकल्पनेसाठी या संघटनेचा विकास महत्त्वाचा आहे.

मित्रांनो,

गेल्या काही वर्षांत भारताने हरित ऊर्जा क्षेत्रात अनेक मोठी पावले उचलली आहेत. नवीकरणीय ऊर्जेसंबंधी पॅरिस कराराप्रति वचनबद्धता पूर्ण करणारा आम्ही पहिला जी 20 देश आहोत. सौरऊर्जेची उल्लेखनीय वाढ यामुळे हे शक्य झाले आहे.  गेल्या 10 वर्षांत आमची सौरऊर्जा क्षमता 32 पटीने वाढली आहे. हा वेग आणि प्रमाण आम्हाला 2030 पर्यंत पाचशे (500) गिगावॅट बिगर-जीवाश्म क्षमता साध्य करण्यात मदत करेल.

मित्रांनो,

भारताची सौरऊर्जा क्षेत्रातील वाढ सुस्पष्ट दृष्टिकोनाचा परिणाम आहे. भारतात असो किंवा जगात, सौर ऊर्जेचा वापर वाढवायचा असेल तर त्यासाठी  जागरूकता, उपलब्धता आणि किफायतशीर हा मूलमंत्र  आहे. सौरऊर्जा क्षेत्रामध्ये देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शाश्वत ऊर्जा स्रोतांच्या गरजेबाबत  जागरूकता वाढल्यास आपण  उपलब्धता वाढवू शकतो. विशिष्ट योजना आणि प्रोत्साहनांद्वारे आम्ही सौर ऊर्जेचा पर्याय देखील किफायतशीर  बनवला आहे.

मित्रांनो,

सौर ऊर्जेचा अवलंब करण्यासाठी कल्पना आणि सर्वोत्तम पद्धतींची ची देवाणघेवाण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी हा एक आदर्श मंच आहे. भारताकडेही सामायिक करण्यासारखे खूप काही आहे. मी तुम्हाला अलिकडेच केलेल्या धोरणात्मक उपायाचे उदाहरण देतो. काही महिन्यांपूर्वी आम्ही पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना सुरू केली. आम्ही या योजनेत 750 अब्ज रुपयांची गुंतवणूक करत आहोत. आमचे लक्ष्य 10 दशलक्ष कुटुंबांना त्यांच्या स्वतःच्या छतावर सौर पॅनेल स्थापित करण्यात मदत करणे हे आहे. आम्ही थेट लोकांच्या बँक खात्यात वित्तीय सहाय्य  हस्तांतरित करत आहोत. अतिरिक्त वित्तपुरवठाची गरज भासल्यास कमी व्याज, तारण  मुक्त कर्जे देखील सक्षम केली जात आहेत. आता ही घरे त्यांच्या गरजेसाठी स्वच्छ विजेची निर्मिती करत आहेत. शिवाय, ते ग्रीडला अतिरिक्त वीज विकून पैसे देखील कमवू शकतील. प्रोत्साहन आणि संभाव्य कमाईमुळे ही योजना लोकप्रिय होत आहे. सौरऊर्जेकडे स्वस्त आणि आकर्षक पर्याय म्हणून पाहिले जात आहे. मला खात्री आहे की अनेक देशांना ऊर्जा संक्रमणावरील त्यांच्या कार्यातून अशा प्रकारची मौल्यवान माहिती  मिळाली असेल.

मित्रांनो,

अल्पावधीत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने मोठी प्रगती केली आहे. 44 देशांमध्ये, सुमारे 10 गिगावॅट वीज विकसित करण्यात या आघाडीने मदत केली आहे. सौर पंपांच्या जागतिक किमती कमी करण्यात देखील आघाडीने महत्वाची भूमिका बजावली आहे. विशेषत: आफ्रिकन सदस्य देशांमध्ये खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक सक्षम केली जात आहे. आफ्रिका, आशिया-प्रशांत आणि भारतातील अनेक होतकरू सौर स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमाचा लवकरच लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांमध्ये विस्तार केला जाईल. योग्य दिशेने टाकलेली ही उल्लेखनीय  पावले आहेत.

मित्रांनो,

ऊर्जा संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी, संपूर्ण जगाने एकत्रितपणे काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली पाहिजे. हरित ऊर्जा गुंतवणुकीच्या केंद्रीकरणातील असमतोल दूर करणे आवश्यक आहे. विकसनशील देशांना मदत करण्यासाठी उत्पादन आणि तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करणे आवश्यक आहे. छोटे विकसित देश आणि लहान द्वीपकल्पीय  विकसनशील देशांचे सक्षमीकरण हे आपले सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. उपेक्षित समुदाय, महिला आणि तरुणांचा समावेश महत्त्वाचा आहे. मला विश्वास आहे की आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवात अशा मुद्द्यांवर चर्चा होईल.

मित्रांनो,

हरित भविष्यासाठी जगासोबत काम करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. गेल्या वर्षी जी 20 परिषदेदरम्यान , आम्ही जागतिक जैव इंधन आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतला. आम्ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहोत. सर्वसमावेशक, स्वच्छ आणि हरित ग्रह  बनवण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला भारताचा पाठिंबा असेल.

पुन्हा एकदा, मी तुम्हा सर्वांचे आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवात स्वागत करतो. सूर्याची ऊर्जा जगाला शाश्वत भविष्यासाठी मार्गदर्शन करो या सदिच्छेसह  धन्यवाद, खूप खूप आभार.

***

SonalT/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2052473) Visitor Counter : 59