पंतप्रधान कार्यालय

सिंगापूरच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 05 SEP 2024 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2024

महामहिम,

आपण केलेल्या स्नेहमय स्वागताबद्दल मनःपूर्वक आभार.

आपण पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरची आपली ही पहिलीच भेट आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. आपल्या नेतृत्वाखालील 4G च्या आयोजनाने सिंगापूर आणखी वेगाने प्रगती साधेल, असा मला विश्वास आहे.

महामहिम,

सिंगापूर हा केवळ भागीदार देश नसून, तो प्रत्येक विकसनशील देशासाठी प्रेरणादायी आहे. भारतात अनेक ठिकाणी ‘सिंगापूर’ निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण सहयोग करत आहोत याचा मला आनंद आहे. आपण स्थापन केलेली मंत्रिस्तरीय गोलमेज यासाठी पथदर्शक यंत्रणा ठरेल.

कौशल्य विकास, डिजिटलायझेशन, गतिशीलता, प्रगत उत्पादन, सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्यसेवा, शाश्वतता आणि सायबर सुरक्षा यासारख्या क्षेत्रांमध्ये सहयोगी उपक्रम आखले गेले आहेत.

महामहिम,

सिंगापूर आमच्या ऍक्ट ईस्ट धोरणाला सहाय्य करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. लोकशाही मूल्यांवरील सामायिक विश्वास आपल्याला एकमेकांशी जोडतो. माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला सिंगापूरला भेट देण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे.

आपल्या सामरिक भागीदारीला एक दशक पूर्ण होत आहे. गेल्या दहा वर्षांत आपला परस्परांबरोबरचा व्यापार दुपटीपेक्षा अधिक वाढला आहे. परस्पर गुंतवणूक जवळजवळ तिप्पट वाढली असून, तिने दीडशे अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. सिंगापूर हा पहिला देश होता, ज्याच्या बरोबर आम्ही यूपीआय पर्सन-टू-पर्सन पेमेंट सुविधा सुरू केली. गेल्या दहा वर्षांत सिंगापूरचे 17 उपग्रह भारतीय भूमीवरून प्रक्षेपित करण्यात आले आहेत. कौशल्यविकासा पासून, ते संरक्षण क्षेत्रापर्यंत आपल्या सहकार्याला गती मिळाली आहे. सिंगापूर एअरलाइन्स आणि एअर इंडिया यांच्यातील करारामुळे कनेक्टिव्हिटी (दळणवळण) आणखी मजबूत झाली आहे.

आज आपण परस्परांबरोबरच्या संबंधांना व्यापक धोरणात्मक भागीदारीपर्यंत पुढे नेत आहोत, याचा मला आनंद आहे. महामहिम, सिंगापूरमध्ये राहणारे भारतीय वंशाचे 3.5 लाख लोक आपल्या संबंधांचा भक्कम पाया आहेत.

सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद फौज आणि लिटिल इंडिया, यांना सिंगापूरमध्ये जे स्थान आणि सन्मान मिळाला, त्याबद्दल आम्ही सिंगापूरचे नेहमीच आभारी आहोत. 2025 मध्ये आपल्या  नात्याला 60 वर्षे पूर्ण होतील. त्या निमित्ताने दिमाखदार सोहळा आयोजित करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येऊन कृती योजना आखायला हवी.

सिंगापूरमध्ये लवकरच भारताच्या पहिल्या तिरुवल्लुवर सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन होणार आहे, हे सांगताना मला आनंद वाटत आहे. थोर संत तिरुवल्लुवर यांनी सर्वात प्राचीन असलेल्या तमिळ भाषेत आपले विचार मांडून जगाला मार्गदर्शन केले. तिरुक्कुरल ही त्यांची साहित्य कृती सुमारे 2,000 वर्षांपूर्वी रचली गेली, तरीही त्यामधील विचार आजही प्रासंगिक आहेत. त्यांनी म्हटले आहे:

नयनोदु नानरीपुरिंद पायानुदैयार पांबु परतातुम उलगु.

याचा अर्थ: “न्याय आणि इतरांच्या सेवेचे मोल जाणतात, अशा लोकांची जग प्रशंसा करते.”

सिंगापूरमध्ये राहणारे लाखो भारतीयही या विचारांनी प्रेरित आहेत आणि दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यामध्ये योगदान देत आहेत, असा मला विश्वास आहे.

महामहिम,

सिंगापूरमधील शांगरी-ला चर्चे दरम्यान मी भारताचा हिंद प्रशांत महासागर दृष्टीकोन मांडला. प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीला चालना देण्यासाठी आम्ही सिंगापूरबरोबर काम करत राहू. मला दिलेला सन्मान आणि स्नेहमय आदरातिथ्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार.

टीप: पंतप्रधानांच्या भाषणाचा हा अनुवाद आहे. मूळ भाषण हिंदीत होते.

 
S.Patil/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


 

 



(Release ID: 2052345) Visitor Counter : 19