प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार
भारत आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने फ्रान्समध्ये पॅरिस येथे 6 सप्टेंबर 2024 रोजी मुख्य विज्ञान सल्लागारांची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे
प्रविष्टि तिथि:
03 SEP 2024 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2024
मुख्य विज्ञान सल्लागारांची गोलमेज परिषद 2024 (CSAR) शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 रोजी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्कोच्या फ्रान्समधील पॅरिस येथील मुख्यालयात होणार आहे. या गोलमेज परिषदेचे आयोजन भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय आणि युनेस्कोचे नैसर्गिक विज्ञान क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. मुख्य विज्ञान सल्लागारांच्या गोलमेज परिषदेची संकल्पना 2023 मध्ये भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात शेर्पा - ट्रॅक उपक्रमाअंतर्गत मांडण्यात आली होती.
या परिषदेत 28 देशांचे प्रतिनिधी त्यांचे मुख्य विज्ञान सल्लागार (CSA) किंवा नामांकित समकक्ष यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार असून त्याव्यतिरिक्त 6 आंतरराष्ट्रीय संस्था या गोलमेज परिषदेत सहभाग घेणार आहेत. यावेळी “मुक्त विज्ञानाला चालना देणे, ज्ञानामधील विषमता कमी करणे आणि जागतिक स्तरावर विज्ञान सल्ला विषयक क्षमता वाढवणे” या विषयावर चर्चा होईल. भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद आणि युनेस्कोच्या सहाय्यक महासंचालक (अतिरिक्त महासंचालक - नैसर्गिक विज्ञान) डॉ. लिडिया ब्रिटो या गोलमेज परिषदेच्या सहअध्यक्षस्थानी असतील.

6 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या या मुख्य विज्ञान सल्लागारांच्या गोलमेज परिषदेआधी विज्ञानावरील विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने विज्ञान सल्ला यंत्रणा किती प्रभावी आणि कार्यक्षम ठरू शकते या विषयावर उपस्थित तज्ञांमध्ये विचारविनिमय सत्र होईल त्यातूनच देश, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान सल्ला क्षमता निर्माण करण्यासाठी एक नवीन विचारप्रवाह निर्माण होईल. या खुल्या सत्रामुळे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि त्यांचे समकक्ष, विविध सदस्य देशांचे युनेस्कोचे स्थायी प्रतिनिधी मंडळ आणि आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक आणि विज्ञान सल्लागार संस्थांचे प्रतिनिधी यांना परस्पर संवाद साधण्याची संधी मिळू शकेल.
यासोबतच सी एस ए आर 2024 च्या माध्यमातून हे प्रयत्न असेच पुढे सुरु ठेवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने पुढाकार घेऊन आणखी व्यापक प्रयत्न करण्याचा मार्गही मोकळा होईल.
* * *
JPS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2051492)
आगंतुक पटल : 137