रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
राष्ट्रीय महामार्गांवर विनाअडथळा अखंड वाहतूक सुरु राहावी या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 100 टोल नाक्यांवर भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात जी आय एस आधारित सॉफ्टवेअरच्या आधारे ठेवणार देखरेख
1033 या राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाइनद्वारे वाहतूककोंडी संदर्भात मिळालेल्या अभिप्रायांच्या आधारे हे टोलनाके निश्चित करण्यात आले आहेत
टोल प्लाझांवर वाहनांची रांग निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असेल तेव्हा प्रत्यक्ष देखरेख आणि मागोवा प्रणालीमुळे वाहतूककोंडी बद्दल संदेश आणि मार्गिकेबाबत सूचना मिळतील
Posted On:
02 SEP 2024 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 सप्टेंबर 2024
टोल प्लाझांवर वाहनांची अखंड वाहतूक सुरु राहावी, या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड या कंपनीने, टोल प्लाझांवर वाहनांना कराव्या लागणाऱ्या प्रतीक्षा कालावधीच्या ‘वास्तविक वेळेच्या नोंदीसाठी ’एक जी आय एस आधारित सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या वेब आधारित सॉफ्टवेअर द्वारे प्रत्यक्ष देखरेखीसाठी एन एच ए आय ने सुरुवातीला सुमारे 100 टोल प्लाझांची निवड केली आहे. 1033 या राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाइनद्वारे वाहतूककोंडी संदर्भात मिळालेल्या अभिप्रायांच्या आधारे हे टोलनाके निश्चित करण्यात आले आहेत. ही देखरेख प्रणाली टप्प्याटप्प्याने आणखी टोल नाक्यांवर कार्यान्वित केली जाणार आहे.
हे सॉफ्टवेअर, टोल प्लाझाचे नाव आणि ठिकाण यांसह तिथे प्रत्यक्ष उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगांचे मीटरमध्ये अंतर, एकूण प्रतीक्षा कालावधी आणि टोल प्लाझा जवळ वाहनांची गती याविषयी विस्तृत माहिती देईल. टोल प्लाझावर वाहनांची रांग निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास प्रत्यक्ष देखरेख आणि मागोवा प्रणालीमुळे वाहतूककोंडी बद्दल संदेश आणि मार्गिकेबाबत सूचना देखील मिळतील.
हे टोल प्लाझा देशभरातील संबंधित एन एच ए आय क्षेत्रीय कार्यालयांना वेब-आधारित सॉफ्टवेअरद्वारे जोडले आहेत. या सॉफ्टवेअरमुळे एन एच ए आयच्या अधिकाऱ्यांना वाहनांच्या रांगा आणि तासानुसार तसेच दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक आधारावर गर्दीच्या स्थितीचे तुलनात्मक विश्लेषण मिळेल आणि त्यांना त्यादृष्टीने वाहतूक कोंडीवर उपाययोजना करणे शक्य होईल.
याव्यतिरिक्त, हे सॉफ्टवेअर सध्याच्या हवामान परिस्थितीशी संबंधित ताजी माहिती आणि एखाद्या भागातील स्थानिक सणांविषयी माहिती प्रदान करेल, ज्यामुळे वाहतूक भार व्यवस्थापित करण्यासाठी आणि टोल प्लाझावरील गर्दी कमी करण्यासाठी एनएचएआय अधिकाऱ्यांना सुनियोजित उपाय करता येतील.
टोल प्लाझावर लावल्या जाणाऱ्या या प्रत्यक्ष देखरेख आणि मागोवा प्रणालीमुळे संपूर्ण देशभरातील टोल प्लाझांवर राष्ट्रीय महामार्ग वापरणाऱ्यांना कोंडी विरहित रहदारी आणि त्रासमुक्त पथकर यांचा अनुभव घेता येईल.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2051004)
Visitor Counter : 67