युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
मोना अग्रवाल हिची कांस्य पदकाला गवसणी!
पॅरा नेमबाजी खेळामधील उगवती तारका
Posted On:
01 SEP 2024 11:16AM by PIB Mumbai
परिचय
पॅरा नेमबाजीच्या क्षेत्रात अलिकडच्या काळात उत्कृष्टता या शब्दाचे दुसरे समानार्थी नाव म्हणजे मोना अग्रवाल. पॅरालिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या आर 2 या वर्गवारीत 10 मीटर एअर रायफल एसएच 1 प्रकारात ब्राँझपदक जिंकून, मोना अग्रवाल हीने जागतिक क्रीडा पटलावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आपल्या जगण्याच्या सुरुवातीच्या काळातील आव्हानांवर मात करत या खेळात उल्लेखनीय यश मिळविण्यापर्यंतचा मोना अग्रवाल हिचा प्रवास, तिच्यातली जिद्द आणि तिच्या निर्धारी वृत्तीचे दर्शन घडवणारा प्रवास आहे.
सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण
8 नोव्हेंबर 1987 रोजी राजस्थानमधील सीकर इथे मोना अग्रवाल हिचा जन्म झाला. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच तिला एका मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला. वयाने केवळ नऊ महिन्यांची असतानाच मोना हीला पोलिओची लागण झाली, परिणामी तिच्या दोन्ही पायाच्या गुडघ्याखालच्या अवयव निकामी झाले. मात्र या परिस्थितीतही न डगमगता मोना अग्रवाल हीने जिद्दीने आपले शिक्षण सुरू ठेवले. तीने कला शाखेचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ती सध्या दूरस्थ शिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
धैर्य आणि निर्धारी वृत्तीचा प्रवास
वयाच्या 23 व्या वर्षी मोना अग्रवाल हीने आयुष्यातला एक सर्वात धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे, आपले घर सोडून स्वतंत्रपणे एकटीने आयुष्य जगण्याचा. या वाटचालीत तिच्या शारिरीक दिव्यंगत्वामुळे तिच्यासमोर अनेक आव्हाने आली, मात्र त्या सगळ्यांवर मात करत, तिच्या वाटेला अलेली मनुष्यबळ व्यवस्थापन प्रतिनिधी आणि मार्केटिंग प्रतिनिधीची जबाबदारी तिने उत्कृष्टरित्या पेलली. 2016 मध्ये, तिने पॅरा-अॅथलेटिक्सवर आपले लक्ष केंद्रित केले. तिने थ्रो इव्हेंट्स अर्थात साधने दूरवर फेकण्याच्या खेळांमधून स्पर्धांमध्ये पदार्पण केले आणि सर्व वर्गवारींमध्ये सुवर्ण पदकांवर आपले नाव कोरले. इतकेच नाही तर मोना अग्रवाल हीने राज्यस्तरीय पॅरा भारोत्तोलन स्पर्धांमध्येही भाग घेत, कित्येक पदके आपल्या नावावर केली आहेत.
भारतातील सिटिंग व्हॉलीबॉल खेळाची प्रणेती
मोना अगरवाल हीने अॅथलेटिक खेळांमध्ये केलेल्या कामगिरी व्यतिरिक्तही तिची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे भारतातील महिलांच्या सिटिंग व्हॉलीबॉल खेळाची प्रणेती अर्थात याची सुरुवात करणारी खेळाडू म्हणून. या खेळाअंतर्गत पहिल्या राष्ट्रीय सिटिंग व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत तिने राज्यस्थान संघाची कर्णधार म्हणून धुरा सांभाळत, संघाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही निवड झाली होती, मात्र त्यावेळी ती गरोदर असल्याने तिला त्या स्पर्धेत सहभागी होता आले नाही.
रायफल शूटिंगच्या दिशेने घेतलेले वळण
डिसेंबर 2021 मध्ये मोना अग्रवाल हीने वैयक्तिक खेळ प्रकाराकडे वळण्याचा निर्णय घेतला, आणि रायफल नेमबाजी या क्रिडा प्रकारात स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचे ठरवले. 2022 मध्ये तिने या खेळात राष्ट्रीय रौप्यपदकाला गवसणी घातली. तिच्या या पदकविजेत्या कामगिरीतूनच या खेळाच्या बाबतीतली नैसर्गिक प्रतिभा तिच्यात सुरुवातीपासूनच असल्याचे अवघ्या जगाला दिसून आले. 2023 च्या मध्यापर्यंत तिने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक आपल्या नावावर केले होते, तर चौथ्या आशियाई पॅरा क्रिडा स्पर्धेत तिने सहावे स्थान पटकावले होते. मोना अग्रवाल हिच्या या जिद्दीला यशाचे कोंदण लागले ते तिच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत. या स्पर्धेत तिने नवा आशियाई विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि सोबतच पॅरालिम्पिकसाठीचा कोटाही मिळवला. अल्पावधीतच नोंदवलेल्या या कामगिरीमुळे जागतिक पटलावर पॅरा नेमबाजी स्पर्धांमध्ये विजेतेपदाची वरच्या क्रमांकावरची दावेदार म्हणून तिचा दबदबाही निर्माण झाला.
प्रशिक्षण आणि पाठबळ
पॅरा नेमबाजी स्पर्धेत मोना अग्रवाल हीने आजवर केलेल्या या यशदायी प्रवासात भारत सरकार कायमच तिच्या सोबतीने वाटचाल करत आले आहे. खेलो इंडिया योजना आणि राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (National Centre of Excellence - NCoE) यांसारख्या केंद्र सरकारच्या वतीने राबवल्या जात असलेल्या महत्वाच्या उपक्रमाच्या माध्यमातून मोना हिला तिचे प्रशिक्षण आणि स्पर्धेसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी कायमच आर्थिक सहकार्य मिळत आले आहे. या उपक्रमांमुळेच मोना अग्रवाल हिला नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्ये राहण्याची आणि त्यासोबतच आवश्यक क्रीडा साहित्य आणि इतर साधने तसेच जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकल्या आहेत. एका अर्थाने मोनाच्या प्रतिभेला आकार देण्यात आणि पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यात मोना आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य मिळवून देण्यात केंद्र सरकारने उभारलेली पाठबळाची ही सर्वसमावेशक व्यवस्था निश्चितच महत्त्वाची ठरली आहे.
सारांश
खरे तर मोना अग्रवाल हिचा हा प्रवास म्हणजे चिकाटी, जिद्द आणि यशाची प्रेरणादायी गाथाच आहे. पॅरिस 2024 पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची तयारी करत असताना, तिचे मिळवलेले यश जगभरातील सर्वच उदयोन्मुख खेळाडूंसाठी केवळ आशेचाच नाही तर प्रेरणेचाही स्रोत आहे.
संदर्भ
INDIAN ATHLETES: PARIS PARALYMPICS 2024 pdf
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2050108
मोना अग्रवालची कांस्य पदकाला गवसणी!
***
S.Tupe/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2050574)
Visitor Counter : 78