महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते  सातव्या राष्ट्रीय पोषण माह 2024 चा शुभारंभ

Posted On: 31 AUG 2024 5:57PM by PIB Mumbai

 

गुजरातमध्ये गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथून आज सातव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा शुभारंभ करण्यात आला.  देशभरात पोषण विषयक जागरुकता आणि लोककल्याण यांना चालना देण्यावर केंद्रीत असलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, गुजरात सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्री भानुबेन बाबरिया, तसेच भारत सरकार आणि गुजरात राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. 

"एक पेड माँ के नाम" अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेने या दिवसाची सुरुवात झाली.  केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी, गुजरातच्या महिला आणि बाल विकास मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह या मोहिमेचे नेतृत्व केले आणि गांधीनगर येथील अंगणवाडी केंद्रात पोषण आणि पर्यावरणीय शाश्वततेचे महत्त्व दर्शवणाऱ्या फळझाडांच्या रोपांची लागवड केली.

महात्मा मंदिरात मुख्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी प्रमुख भाषण केले. या कार्यक्रमात बोलताना भूपेंद्रभाई पटेल यांनी या देशाच्या विकासाच्या वाढीसाठी सशक्त आणि निरोगी मनुष्यबळ निर्माण करण्यात पोषणाच्या महत्त्वावर भर दिला.

आपल्या भाषणात केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी जीवनचक्र दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करून मुलांचे आणि किशोरवयीन मुलामुलींचे चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यावर तसेच कुपोषणाशी लढा देण्यावर भर दिला. आपल्या भाषणात त्यांनी सुशासन, अभिसरण, क्षमता निर्माण, समुदायाचा सहभाग आणि मालकी अशा चार स्तंभांवर भर दिला. या चार स्तंभांवर  पोषण 2.0 चे यश अवलंबून आहे, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी पोषक पदार्थांच्या टोपल्या देण्यात आल्या तर लहान मुलांसाठी अन्नप्राशन आयोजित करण्यात आले होते.  विविध योजनांतील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या संबंधित योजनेचे पात्र वाटप करण्यात आले.

पोषण ट्रॅकर, पोषण भी पढाई भी आणि इतर पोषण कार्यक्रम असे विविध महत्त्वपूर्ण उपक्रम दाखवणारे प्रदर्शन देखील यावेळी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी महिला सुरक्षेशी संबंधित उपक्रमांबाबतही माहिती प्रदर्शित करण्यात आली होती.

स्तनपान आणि पूरक आहार अशा महत्त्वाच्या विषयांवर अनेक प्रादेशिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकांनी पोषणाचे महत्त्व अधोरेखित केले.

सातव्या राष्ट्रीय पोषण माह 2024 मध्ये रक्तक्षय (ॲनिमिया), ग्रोथ मॉनिटरिंग, पूरक आहार, पोषण भी पढाई भी, उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञान आणि एक पेड माँ के नाम या संकल्पनांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2050507) Visitor Counter : 73