पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्रात पालघर येथील वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभातील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
Posted On:
30 AUG 2024 6:09PM by PIB Mumbai
भारत माता की जय,
भारत माता की जय,
भारत माता की जय,
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री राजीव रंजन सिंह जी, सर्बानंद सोनोवाल जी, महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अजीत दादा पवार जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे इतर सहकारी, महाराष्ट्र सरकार मधील मंत्री, इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!
आज संत सेनाजी महाराज यांची पुण्यतिथी. मी त्यांना नमन करतो. माझा सर्व लाडक्या बहिणी, आणि लाडक्या भावांना तुमच्या या सेवकाचा नमस्कार।
मित्रहो,
आज या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यापूर्वी मला माझ्या मनातील भावना व्यक्त करायच्या आहेत. 2013 साली भारतीय जनता पक्षाने मला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून निश्चित केले तेव्हा मी सर्वप्रथम एक काम केले, ते म्हणजे मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर बसून प्रार्थना केली. भक्त ज्या भक्तीभावाने आपल्या लाडक्या दैवताची प्रार्थना करतो, त्याच भावनेने त्यांचा आशीर्वाद घेऊन मी राष्ट्रसेवेचा नवा प्रवास सुरू केला होता. सिंधुदुर्गात नुकतेच जे काही घडले, माझ्यासाठी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक राजा, एक महाराजा, एक राजपुरूष नाहीत, आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. आज मी माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत. भारतमातेचे महान सुपुत्र वीर सावरकर यांच्यासाठी सतत अपशब्द उच्चारतात, त्यांचा अपमान करत राहतात, तशा लोकांसारखे आम्ही नाही. असे लोक आहेत जे देशभक्तांच्या भावना दुखावतात आणि असे करून सुद्धा, वीर सावरकरांना शिव्या देऊनसुद्धा माफी मागायला तयार नाहीत, पण न्यायालयात जाऊन लढायला मात्र तयार आहेत. एवढ्या थोर महापुरूषाचा अपमान करून पश्चात्ताप न करणाऱ्यांचे संस्कार आता महाराष्ट्रातील जनतेने जाणून घ्यावेत.
आणि हे आमचे संस्कार आहेत की आज मी या धरतीवर येताच सर्वप्रथम माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो आहे. आणि इतकेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानणाऱ्यांचे अंत:करण दुखावले गेले आहे, त्याबद्दल मी मस्तक झुकवून, या आराध्य दैवताची भक्ती करणाऱ्यांची मी क्षमा मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आमच्या आराध्य दैवतापेक्षा काहीच मोठे नाही.
मित्रहो,
आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासातील ऐतिहासिक दिवस आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासामधलाही हा मोठा दिवस आहे. विकसित महाराष्ट्र हा विकसित भारताच्या संकल्पाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच गेली दहा वर्षे असो किंवा आता माझ्या सरकारचा तिसरा कार्यकाळ असो, महाराष्ट्रासाठी सातत्याने मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राकडे विकासासाठी आवश्यक क्षमता आहेत, आणि स्रोत सुद्धा आहेत. येथे समुद्र किनारे देखील आहेत, या किनाऱ्यांवरून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा शतकानुशतकांचा जुना इतिहास आहे. आणि इथेही भविष्यासाठी अनेक संधी आहेत. या संधींचा पुरेपूर लाभ महाराष्ट्र आणि देशाला मिळावा, यासाठी आज वाढवण बंदराची पायाभरणी करण्यात आली आहे. या बंदरासाठी 76 हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. हे देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असेल. हे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात खोल बंदरांपैकी एक महत्त्वाचे बंदर असेल. आज देशातील सर्व कंटेनर बंदरांमधून जितके कंटेनर ये-जा करतात, संपूर्ण देशातले, एकूण संख्येबद्दल मी बोलतो आहे. तर आजघडीला सगळ्या बंदरांमधून जितके कंटेनर ये-जा करतात, त्यापेक्षा जास्त कंटेनर एकट्या वाढवण बंदरात हाताळले जाणार आहेत. हे बंदर महाराष्ट्र आणि देशासाठी किती मोठे व्यापार आणि औद्योगिक प्रगतीचे केंद्र होईल, याची कल्पना तुम्ही करू शकता. आतापर्यंत या परिसराला प्राचीन किल्ल्यांमुळे ओळखले जात होते, आता मात्र या भागाची ओळख आधुनिक बंदरांमुळेही होणार आहे. त्याबद्दल मी पालघरच्या जनतेचे, महाराष्ट्रातील जनतेचे आणि देशातील जनतेचे मनापासून अभिनंदन करतो.
मित्रहो,
आमच्या सरकारने 2-3 दिवसांपूर्वीच दिघी बंदर औद्योगिक क्षेत्राच्या विकासालाही मंजुरी दिली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील जनतेसाठी ही दुहेरी आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडमध्ये या औद्योगिक क्षेत्राचा विकास होणार आहे. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचेही प्रतीक ठरेल. दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रामुळे पर्यटन आणि इको-रिसॉर्ट्सनाही चालना मिळणार आहे.
मित्रहो,
आज येथे मच्छीमार बंधू-भगिनींसाठी सुद्धा 700 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणीही करण्यात आली. देशातील विविध ठिकाणी 400 कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटनही येथून करण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांसाठी मी माझ्या मच्छीमार बंधू-भगिनींचे आणि तुम्हा सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. वाढवण बंदर असो, दिघी बंदर औद्योगिक क्षेत्राचा विकास असो, मत्स्यव्यवसाय योजना असो, अशी मोठमोठी कामे माता महालक्ष्मी देवी, माता जीवदानी आणि भगवान तुंगारेश्वर यांच्या आशीर्वादानेच होत आहेत. आई महालक्ष्मी देवी, माता जीवदानी आणि भगवान तुंगारेश्वर यांना मी शतश: नमन करतो.
मित्रहो,
एक काळ असा होता जेव्हा भारताची गणना जगातील सर्वात समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्रांमध्ये केली जात होती. भारताच्या या समृद्धीचा एक मोठा आधार होता - भारताची सागरी शक्ती, आपली ही ताकद महाराष्ट्रापेक्षा जास्त कोणाला कळेल? छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी व्यापार आणि सागरी शक्तीला नवी उंची दिली. त्यांनी नवीन धोरणे आखली आणि देशाच्या प्रगतीसाठी निर्णय घेतले. एके काळी आमची ताकद इतकी होती की दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांच्यासमोर संपूर्ण ईस्ट इंडिया कंपनीचा निभाव लागला नव्हता. पण, स्वातंत्र्यानंतर त्या वारशाची दखल घेतली गेली नाही. औद्योगिक विकासापासून व्यापारापर्यंत भारताची पीछेहाट झाली.
पण मित्रहो,
आता हा भारत आहे, नवा भारत आहे. नवा भारत इतिहासातून धडे घेतो, नवीन भारत आपली ताकद जाणतो. नवीन भारत आपला मानसन्मान जोखतो, गुलामगिरीच्या बेड्यांची प्रत्येक खूण मिटवत नवा भारत सागरी पायाभूत सुविधांमध्ये नवे टप्पे गाठत आहे.
मित्रहो,
गेल्या दशकात भारताच्या किनारपट्टीवरील विकासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. आम्ही बंदरांचे आधुनिकीकरण केले आहे. आम्ही जलमार्ग विकसित केला आहे. जहाज बांधणीचे काम भारतात व्हावे आणि भारतातील लोकांना रोजगार मिळावा, यावर सरकारने भर दिला आहे. यादृष्टीने लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. आज आपण त्याचे परिणामही अनुभवत आहोत. बऱ्याच बंदरांची क्षमता पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे, खाजगी गुंतवणूकही वाढली आहे आणि जहाजांचा वाहतूक वेळही कमी झाला आहे. याचा फायदा कोणाला होतोय? तर आमच्या उद्योगांना, आमच्या व्यापाऱ्यांना, ज्यांच्या खर्चात घट झाली आहे. याचा फायदा आपल्या तरुणांना होत आहे, त्यांना नवीन संधी उपलब्ध होत आहेत. ज्यांच्यासाठीच्या सुविधा वाढल्या आहेत अशा खलाशांना त्याचा लाभ होत आहे.
मित्रहो,
आज संपूर्ण जगाचे लक्ष वाढवण बंदरावर खिळले आहे. 20 मीटर खोली असलेल्या वाढवण बंदराशी बरोबरी करू शकणारी फार कमी बंदरे जगात आहेत. या बंदरात हजारो जहाजे आणि कंटेनर येतील, या संपूर्ण प्रदेशाचे आर्थिक चित्र बदलेल. सरकार वाढवण बंदरला रेल्वे आणि महामार्ग कनेक्टिव्हिटीनेही जोडणार आहे. या बंदरामुळे येथे अनेक नवे व्यवसाय सुरू होतील. येथे गोदामाच्या कामात बरीच प्रगती होईल आणि या बंदराचे स्थान म्हणजे जणु दुग्धशर्करा योगच. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग, सर्वकाही याच्यापासून अगदी जवळ आहे. वर्षभर इथून मालवाहतूक होईल आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हा लोकांना मिळेल, माझ्या महाराष्ट्रातील बंधू-भगिनींना मिळेल, माझ्या नव्या पिढीला मिळेल.
मित्रहो,
महाराष्ट्राच्या विकासाला माझे सर्वात मोठे प्राधान्य आहे. आज महाराष्ट्राला 'मेक इन इंडिया'चा फायदा होत आहे. आज महाराष्ट्राला आत्मनिर्भर भारत मोहिमेचा फायदा होत आहे. आज आपला महाराष्ट्र भारताच्या प्रगतीत खूप मोठा वाटा उचलत आहे, पण महाराष्ट्र विरोधी पक्ष नेहमीच तुमच्या विकासाला आणि तुमच्या कल्याणाला खीळ लावण्याचा प्रयत्न करतात हे दुर्दैव आहे. आज मी तुम्हाला याचे आणखी एक उदाहरण देतो.
बंधू आणि भगिनींनो,
वर्षानुवर्षे जगाशी व्यापार करण्यासाठी आपल्या देशाला एका मोठ्या आणि आधुनिक बंदराची गरज होती. यासाठी महाराष्ट्रातील पालघर हे सर्वात योग्य ठिकाण आहे. हे बंदर बारमाही काम करू शकते. मात्र, हा प्रकल्प 60 वर्षे रखडला होता. महाराष्ट्र आणि देशासाठी इतके महत्त्वाचे काम काही लोक सुरू होऊ देत नव्हते. 2014 मध्ये तुम्ही सर्वांनी आम्हाला दिल्लीत सेवेची संधी दिली, 2016 मध्ये आमचे सहकारी देवेंद्र जी यांचे सरकार सत्तेवर आले तेव्हा त्यांनी यावर गांभीर्याने काम सुरू केले. 2020 मध्ये येथे बंदर बांधण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला, मात्र त्यानंतर सरकार बदलले आणि अडीच वर्षे येथे कोणतेही काम झाले नाही. तुम्ही मला सांगा, जर या प्रकल्पातूनच येथे अनेक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. येथे सुमारे 12 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. तर महाराष्ट्राच्या या विकासावर कोणाचा आक्षेप आहे? महाराष्ट्राचा विकास रोखणारे कोण होते? महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळण्यावर आक्षेप घेणारे हे लोक कोण होते? त्या आधीच्या सरकारांनी हे काम पुढे का नेऊ दिले नाही? या गोष्टी महाराष्ट्रातील जनतेने कधीही विसरू नये. सत्य हे आहे की काही लोकांना महाराष्ट्र मागास ठेवायचा आहे, तर आमच्या एनडीए सरकारला, आमच्या महायुतीच्या सरकारला, महाराष्ट्राला देशात अग्रणी बनवायचे आहे.
मित्रहो,
जेव्हा समुद्राशी संबंधित संधींचा विचार केला जातो तेव्हा सर्वात महत्त्वाचे भागीदार आमचे मच्छिमार बंधू आणि भगिनी असतात. मच्छीमार बांधवांनो! आपली पाचशे सहव्वीस मासेमारी गावे, कोळीवाडे आणि 15 लाख मच्छिमार लोकसंख्येसह, महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय क्षेत्र खूप मोठे आहे. आत्ताच मी माझ्या पीएम मत्स्य संपदा लाभार्थी मित्रांसोबत बोलत होतो. त्यांच्या मेहनतीमुळे 10 वर्षात या क्षेत्राचे चित्र कसे पालटले आहे, देशाच्या योजना आणि सरकारच्या सेवा भावनेमुळे कोट्यवधी मच्छिमारांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे, हे आज आपण अनुभवत आहोत. तुमच्या मेहनतीने काय परिवर्तन घडले आहे हे जाणून तुम्हालाही आनंद होईल! आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मत्स्य उत्पादक देश बनला आहे. 2014 मध्ये देशात केवळ 80 लाख टन मासळीचे उत्पादन होत होते. आज भारतात सुमारे 170 लाख टन मत्स्य उत्पादन होत आहे.
म्हणजे अवघ्या 10 वर्षांत तुम्ही मत्स्य उत्पादन दुप्पट केले आहे. आज भारताची समुद्री खाद्य निर्यातही वेगाने वाढत आहे. 10 वर्षांपूर्वी देशातून 20 हजार कोटी रुपयांपेक्षा कमी कोळंबीची निर्यात होती. आज 40 हजार कोटी रुपयांहून अधिक कोळंबीची निर्यात होत आहे. म्हणजेच कोळंबीची निर्यात देखील आज दुपटीने अधिक झाली आहे. आम्ही जी नील क्रांती योजना सुरु केली होती, त्याचे यश सगळीकडे दिसत आहे. या योजनेमुळे रोजगाराच्या लाखो नवीन संधी तयार झाल्या आहेत. आमच्या सरकारच्या निरंतर प्रयत्नांमुळे, कोट्यवधी मच्छीमारांचे उत्पन्न वाढले आहे, त्यांचा जीवन स्तर सुधारला आहे.
मित्रहो,
मत्स्य उत्पादनात महिलांचा सहभाग वाढावा यासाठीही आमचे सरकार काम करत आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत हजारो महिलांना मदत करण्यात आली आहे. तुम्हाला माहीत आहे की मासेमारीला जाणाऱ्या लोकांना जीव धोक्यात घालावा लागत होता. घरातील महिला, संपूर्ण कुटुंबाला सतत चिंता वाटत रहायची. आधुनिक तंत्रज्ञान आणि उपग्रहाच्या मदतीने आम्ही हे धोके कमी करत आहोत. आज सुरू झालेली व्हेसल कम्युनिकेशन प्रणाली आपल्या मच्छीमार बंधू-भगिनींसाठी मोठे वरदान ठरणार आहे. सरकार, मासेमारीला जाणाऱ्या जहाजांवर एक लाख ट्रान्सपॉन्डर बसवणार आहे. याच्या मदतीने आपले मच्छिमार बांधव त्यांचे कुटुंबीय, बोट मालक, मत्स्यव्यवसाय विभाग आणि समुद्राचे रक्षण करणाऱ्यांच्या नियमित संपर्कात राहतील. चक्रीवादळ किंवा समुद्रात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास, आपले मच्छीमार बांधव त्यांना हवे तेव्हा उपग्रहाच्या मदतीने किनाऱ्यापलीकडील संबंधित लोकांना आपला संदेश पाठवू शकतील. संकटाच्या वेळी, तुमचे प्राण वाचवणे आणि तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचणे याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
मित्रहो,
आपल्या मच्छीमार बंधू-भगिनींची जहाजे सुरक्षित परत यावीत यासाठी 110 हून अधिक मासेमारी बंदरे आणि लँडिंग सेंटर्सही बांधली जात आहेत. शीतगृह साखळी असो, प्रक्रिया व्यवस्था असो, बोटींसाठी कर्ज योजना असो किंवा पंतप्रधान मत्स्य संपदा योजना असो, या सर्व योजना मच्छीमार बंधू-भगिनींच्या कल्याणासाठी बनवण्यात आल्या आहेत. आम्ही किनारपट्टीलगतच्या गावांच्या विकासावर अधिक लक्ष देत आहोत. तुमचे सामर्थ्य वाढवण्यासाठी मच्छिमार सरकारी संस्था, सहकारी संस्थांचे देखील बळकटीकरण केले जात आहे.
मित्रहो,
मागासवर्गीयांसाठी काम करणे असो किंवा वंचितांना संधी देणे असो, भाजपा आणि रालोआ सरकारने पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. तुम्ही पहा, इतकी दशके देशातील मच्छीमार बंधू-भगिनी आणि आदिवासींची काय स्थिती होती? जुन्या सरकारांच्या धोरणांमध्ये या समाजाकडे नेहमीच दुर्लक्ष केले गेले. देशात एवढे मोठे आदिवासी बहुल क्षेत्र आहे. तरीही आदिवासींच्या कल्याणासाठी एकही विभाग स्थापन करण्यात आला नाही. स्वतंत्र आदिवासी मंत्रालय भाजपच्या रालोआ सरकारनेच स्थापन केले होते. आमच्याच सरकारने मच्छिमारांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालयही स्थापन केले. नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या आदिवासी भागांना आता पंतप्रधान जनमन योजनेचा लाभ मिळत आहे. आपला आदिवासी समाज, आपला मासेमारी समाज आज भारताच्या प्रगतीत मोठे योगदान देत आहे.
मित्रहो,
आज मी महायुती सरकारचे आणखी एका गोष्टीसाठी विशेष कौतुक करेन. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासात, महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आहे. आज महाराष्ट्रात महिला अनेक उच्च पदांवर उत्कृष्ट काम करत आहेत . राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक या राज्य प्रशासनाला मार्गदर्शन करत आहेत. प्रथमच राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पोलीस दलाचे नेतृत्व करत आहेत. प्रथमच शोमिता बिस्वास राज्याच्या वन दलाच्या प्रमुख म्हणून नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. राज्याच्या कायदे विभागाच्या प्रमुख म्हणून सुवर्णा केवले पहिल्यांदाच मोठी जबाबदारी सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे जया भगत यांनी राज्याच्या प्रधान महालेखापाल म्हणून पदभार स्वीकारला आहे. आणि मुंबईत सीमाशुल्क विभागाचे नेतृत्व प्राची स्वरूप यांच्याकडे आहे. मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे या मुंबईच्या विशाल आणि कठीण भूमिगत मेट्रो-3 चे नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्रात उच्च शिक्षण क्षेत्रातही महिला आघाडीवर आहेत. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून काम पाहत आहेत. महाराष्ट्रातील कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू म्हणून डॉ. अपूर्वा पालकर एक नवीन सुरुवात करत आहेत. अशी कितीतरी मोठी आणि अतिशय जबाबदारीची पदे आहेत, जिथे महाराष्ट्रात नारी शक्ती आपली सर्वोत्तम कामगिरी करत आहे. त्यांचे हे यश एकविसाव्या शतकातील नारी शक्ती समाजाला नवी दिशा देण्यास सज्ज आहे याचा दाखला आहे. हीच नारीशक्ती विकसित भारताचा खूप मोठा आधार आहे.
मित्रहो,
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ हा रालोआ सरकारचा मंत्र आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण महाराष्ट्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेऊ, असा मला विश्वास आहे. तुम्ही महायुती सरकारवर तुमचा आशीर्वाद असाच कायम ठेवा. पुन्हा एकदा, मी तुम्हा सर्वांना देशातील सर्वात मोठे बंदर आणि अनेक मच्छीमार बांधवांसाठी सुरु केलेल्या योजनांसाठी शुभेच्छा देतो आणि तुमचे अभिनंदन करतो.
माझ्याबरोबर म्हणा,
भारत माता की–जय
दोन्ही हात वर करून पूर्ण ताकदीनिशी बोला -
भारत माता की–जय,
आज समुद्रातील प्रत्येक लाटही तुमच्या सुरात सूर मिसळत आहे.
भारत माता की–जय,
भारत माता की–जय,
भारत माता की–जय,
खूप-खूप धन्यवाद.
***
M.Chopade/M.Pange/V.Joshi/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2050367)
Visitor Counter : 110
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam