कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्या हस्ते 6-ए नामक नव्या एकल सुलभीकृत निवृत्तीवेतन अर्जाचे अनावरण तसेच 9-एचआरएमएस मंचाचे भविष्य मंचाशी एकत्रीकरण होणार


निवृत्तीवेतन धारकांच्या जीवनमानातील सुलभता सुधारण्याच्या उद्देशाने अर्जात सुलभीकरण करण्यात येणार

Posted On: 29 AUG 2024 2:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑगस्ट 2024

 

निवृत्तीवेतन विषयक नियम तसेच प्रक्रिया यांच्यात सतत सुधारणा करत राहून निवृत्तीवेतन धारकांच्या जीवनमानात आणखी सुलभता आणण्याप्रती केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग (डीओपीपीडब्ल्यू) समर्पित आहे. डीओपीपीडब्ल्यूने सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम, 2021 अधिसूचित केले असून हे नियम भविष्य मंचात एकत्रित करण्यात आले आहेत.

डीओपीपीडब्ल्यूने 16 जुलै 2024 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 6-ए नामक नवा एकल सुलभीकृत निवृत्तीवेतन अर्ज जारी केला आहे. डिसेंबर 2024 मध्ये तसेच त्यानंतर निवृत्त होणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी भविष्य/ई-एचआरएमएस मंचावर हा अर्ज उपलब्ध असेल. सेवानिवृत्त होणाऱ्या ज्या अधिकाऱ्यांनी ई-एचआरएमएस मंचावर नोंदणी केलेली आहे त्यांना ई-एचआरएमएसमधून (केवळ सेवानिवृत्तीशी संबंधित प्रकरणे) अर्ज 6-ए उपलब्ध होईल आणि सेवानिवृत्त होणाऱ्या ज्या अधिकाऱ्यांची नोंदणी ई-एचआरएमएस मध्ये झालेली नाही त्यांना भविष्य मंचाच्या माध्यमातून अर्ज 6-ए भरता येईल.

हा नवा अर्ज भविष्य/ ई-एचआरएमएस मंचांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भू-विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय तसेच अणुउर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रार तसेच निवृत्तीवेतन या विभागांचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत, नवी दिल्ली येथील राष्ट्रीय माध्यम केंद्र येथे 30 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित कार्यक्रमात हा नवा अर्ज आणि भविष्य/ ई-एचआरएमएस मंचांमध्ये त्याचे समावेशन करण्यात येईल.

नव्या सरकारच्या 100 दिवसांच्या कृती योजनेतील डीओपीपीडब्ल्यूचा हा महत्त्वाचा कार्य टप्पा असणार आहे. अर्जाचे सुलभीकरण हा केंद्र सरकारच्या “कमाल प्रशासन-किमान सरकार” या धोरणातील महत्त्वाचा उपक्रम आहे.

या नव्या अर्जात, एकंदर 9 अर्ज/प्रारूपे यांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. अर्ज क्रमांक 6,8,4,3,ए तसेच प्रारुप 1, प्रारुप 9, एफएमए तसेच झिरो ऑप्शन फॉर्म या जुन्या अर्जांचे/प्रारुपांचे विलीनीकरण करण्यात आले आहे. हे बदल अंतर्भूत करण्यासाठी सीसीएस निवृत्तीवेतन नियम, 2021 मधील 53,57,58,59,60 या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या संदर्भात, सल्लामसलत विषयक विहित प्रक्रियेचे पालन करत केंद्रीय व्यय विभाग, कायदा आणि न्याय विभाग, लेखा महानियंत्रक, भारताचे नियंत्रक तसेच महालेखापरीक्षक तसेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग अशा सर्व भागधारकांना या सुधारणेबाबत अधिसूचित करण्यात आले आहे.

हा नवा अर्ज आणि भविष्य मंचाच्या परिचालन प्रक्रियेतील बदल हे खऱ्या अर्थाने मोठे स्थित्यंतर घडवून आणणारे ठरणार आहेत. याचे कारण असे की, एकीकडे हा नवा अर्ज सादर करण्यास सुलभ करण्यात आला असून, निवृत्तीवेतन धारकाच्या केवळ एका सहीसह ही प्रक्रिया पूर्ण होईल, तर दुसरीकडे या नव्या अर्जामुळे कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतर त्याला प्रत्यक्षात निवृत्तीवेतन मिळणे सुरु होईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेतील प्रत्येक पायरीचे डिजिटलीकरण शक्य होणार आहे. यातून, निवृत्तीवेतन संबंधित संपूर्ण प्रक्रियेचे कागद-विरहित परिचालन साध्य करण्याचा मार्ग अधिक प्रशस्त होईल. निवृत्तीवेतनधारक-स्नेही मंचाच्या मदतीने आता निवृत्तीवेतन धारकाला, त्याने सगळे अर्ज भरुन सादर केले आहेत की एखादा अर्ज भरायचा राहून गेला आहे किंवा कसे याची काळजी करण्याची गरज उरणार नाही.

 

* * *

NM/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2049718) Visitor Counter : 25