सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. विरेंद्र कुमार करणार 18व्या दिव्य कला मेळाव्याचे उद्घाटन


रांची इथे 29 ऑगस्ट 2024 रोजी होणारा हा मेळावा साकारणार ‘वोकल फॉर लोकल’ चळवळीचे रूप

100 दिव्यांग कारागीर, कलाकार आणि नवोद्योजक सुमारे 20 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून येणार आपले सांस्कृतिक वैविध्य आणि बहुढंगी उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी

Posted On: 28 AUG 2024 7:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2024


केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र कुमार उद्या रांची इथे 18व्या दिव्य कला मेळाव्याचे उद्घाटन करणार आहेत. 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 या 11 दिवसांच्या काळात भारतभरातील दिव्यांग कारागीर आणि नवोद्योजकांच्या असाधारण कौशल्याच्या सादरीकरणासाठी हा मेळावा भरवण्यात येत आहे. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या अखत्यारित येणार्‍या दिव्यांगजनांचे सबलीकरण विभागाने या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

18वा दिव्य कला मेळावा हे जम्मू आणि काश्मीर व ईशान्येकडील राज्यांसह देशाच्या सर्व कानाकोपऱ्यांतील दिव्यांग कारागिरांनी निर्माण केलेल्या विविध कलात्मक उत्पादनांचे भव्य प्रदर्शन असेल. मेळाव्याला भेट देणाऱ्यांना रंग आणि निर्मितीचा उत्सव अनुभवता येईल. अत्युत्कृष्ट हस्तकला, हातमाग आणि नक्षीकाम केलेल्या उत्पादनांपासून ते स्वादिष्ट पाककृती या प्रदर्शनात मांडल्या जातील. भारताची सांस्कृतिक श्रीमंती अधोरेखित करताना दिव्यांगजनांच्या आर्थिक सबलीकरणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे.

रांचीतील दिव्य कला मेळावा ही 2022 मध्ये सुरू झालेल्या या मेळाव्याची 18वी आवृत्ती आहे. यापूर्वी दिल्ली, मुंबई, भोपाळ, गुवाहाटी आणि अन्य शहरांमध्ये असे मेळावे भरवण्यात आले होते. ‘वोकल फॉर लोकल’ चळवळीचे साकार रूप असलेल्या या उपक्रमामुळे उच्च दर्जाची, स्थानिक पातळीवर बनलेली, अपवादात्मक निग्रह आणि निर्माणाचा आविष्कार असलेली उत्पादने खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळते. मेळाव्यात दिव्यांग कलाकारांना आपली संगीत, नृत्य, नाट्यकला सादर करण्यासाठी दिव्य कला शक्ती सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

S.Patil/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2049519)