युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यासाठी राष्ट्रव्यापी क्रीडा सहभागाचे डॉ मनसुख मांडवीय यांचे आवाहन
Posted On:
24 AUG 2024 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2024
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा, श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सर्व नागरिकांना राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त किमान एक तास मैदानी खेळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
"भारताला एक तंदुरुस्त राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे, असे "खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया" (भारत खेळेल, तेव्हा भारत बहरेल) या पंतप्रधानांच्या शब्दांचा दाखला देऊन डॉ. मांडविया यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या कल्पनेतील फिट इंडिया चळवळ अर्थात तंदुरुस्त भारत मोहीम हा उपक्रम प्रत्येक नागरिकांसाठी असून, यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा दिन समारंभाचा भाग होण्यासाठी आपण सर्वांना आमंत्रण देत असल्याचे मांडविया म्हणाले.
पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून राबवण्यात येत असलेली फिट इंडिया चळवळ आणखी पुढे नेणे महत्वाचे असल्याचे क्रीडामंत्री म्हणाले. आपल्या आरोग्याची काळजी घेऊन कार्यशील राहणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे, "कोणताही खेळ खेळा आणि तंदुरुस्त रहा," असे सांगून मांडविया यांनी प्रत्येकाला या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणजे केवळ क्रीडा क्षेत्रातील आपल्या नायकांचा सन्मान करण्याची संधी नाही तर खेळ आपल्याला संतुलित आणि निरोगी जीवन जगण्यास कशी मदत करू शकतो याचे स्मरण करण्याचा दिवस आहे, असे डॉ मांडवीया यांनी अधोरेखित केले. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून प्रत्येकाने आपले कुटुंब आणि मित्रांच्या समवेत कोणत्याही खेळामध्ये सहभागी होण्याचे, आणि एक तंदुरुस्त आणि सक्रिय भारत साकारण्याचे आवाहन केले.
पार्श्वभूमी:
हॉकीमधले जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त, दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देण्यासाठी आपल्या क्रीडापटूंनी दिलेल्या योगदानाबद्दल दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.
* * *
M.Pange/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048542)
Visitor Counter : 81