शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शाळांमध्ये मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 'शालेय सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचना' लागू करण्याचे दिले निर्देश

Posted On: 23 AUG 2024 4:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2024

 
शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालय कटिबद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2017 ची रिट याचिका (फौजदारी) क्रमांक 136 आणि 2017 ची रिट याचिका (सिव्हिल) क्रमांक 874 वरील निकालादरम्यान दिलेल्या आदेशानुसार शालेय संस्थांची कार्यपद्धती आणि उत्तरदायित्व अधिक बळकट करून विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, शिक्षण मंत्रालयाने ‘शालेय सुरक्षा आणि सुरक्षितताबाबत मार्गदर्शक सूचना-2021’ विकसित केल्या आहेत, ज्या पोक्सो (POCSO),म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांना संरक्षण देणाऱ्या कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये इतर तरतूदींबरोबरच सरकारी, सरकारी अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेबाबत शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करणाऱ्या तरतुदी आहेत. त्याशिवाय, या मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रतिबंधात्मक प्रशिक्षण, विविध भागधारकांची जबाबदारी, अहवाल देण्याची प्रक्रिया, संबंधित कायदेशीर तरतुदी, सहाय्य आणि समुपदेशन आणि सुरक्षित वातावरण यासाठी उपाय देण्यात आले आहेत. या मार्गदर्शक सूचना सुलभता, समावेशकता आणि सकारात्मक शिक्षण प्रक्रियेसाठी महत्वाच्या  आहेत.

या मार्गदर्शक सूचना 01.10.2021 रोजी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश/शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या (DoSEL) आणि मंत्रालयाच्या भागधारक स्वायत्त संस्थांना वितरित करण्यात आल्या होत्या. या मार्गदर्शक सूचना प्रामुख्याने विविध भागधारक आणि विभागांना शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेप्रति असलेले त्यांचे उत्तरदायित्व सांगतात आणि त्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शन करतात. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सूचित करण्यात आले होते की ते राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या विशिष्ट गरजांनुसार या मार्गदर्शक सूचनांमध्ये भर घालू शकतील/बदल करू शकतील आणि या मार्गदर्शक सूचना अधिसूचित करू शकतील. या मार्गदर्शक सूचना DoSEL च्या पुढील वेबसाइटवर अपलोड केल्या आहेत:  https://dsel.education.gov.in/sites/default/files/2021-10/guidelines_sss.pdf.

मार्गदर्शक सूचनांचे उद्दिष्ट:

  • मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन शाळांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या गरजेबाबत विद्यार्थी आणि पालकांसह सर्व भागधारकांमध्ये जाणीव निर्माण करणे.
  • शारीरिक, सामाजिक-भावनिक, बौद्धिक आणि विशेषतः नैसर्गिक आपत्तींचा सामना करताना सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या विविध उपायांबाबत आधीच उपलब्ध असलेल्या कृती, धोरणे, कार्यपद्धती आणि मार्गदर्शक तत्त्वांबद्दल विविध भागधारकांमध्ये जागरुकता निर्माण करणे.
  • विविध भागधारकांना सक्षम करणे आणि या मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीमधील त्यांची भूमिका स्पष्ट करणे.
  • शाळांमध्ये (शाळेच्या बस मधून शाळेत येताना आणि शाळेतून घरी परतताना होणारी विद्यार्थ्यांची वाहतूक यासह) विद्यार्थ्यांची  सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी शालेय व्यवस्थापन आणि खासगी/विनाअनुदानित शाळांमधील मुख्याध्यापक आणि शिक्षक आणि सरकारी/सरकारी अनुदानित शाळांच्या बाबतीत शाळेचे प्रमुख/प्रभारी प्रमुख, शिक्षक आणि शिक्षण प्रशासन  यांचे दायित्व निश्चित करणे.   
  • शाळेमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि सुरक्षेबाबत कोणतीही व्यक्ती अथवा शाळा व्यवस्थापनाकडून होणारे दुर्लक्ष गांभीर्याने घेणे आणि त्याबाबत ‘शून्य सहिष्णुता धोरण अवलंबणे हे या मार्गदर्शक सूचनांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.  

 

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2048169) Visitor Counter : 108