संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल
भारत आणि अमेरिका एकत्रित येऊन जागतिक शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करू शकतात : भारतीय समुदायाशी संवाद साधताना राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
23 AUG 2024 4:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2024
भारत आणि अमेरिका एकत्रितपणे भक्कम शक्ती आहे जी जगात शांतता, समृद्धी आणि स्थैर्य सुनिश्चित करू शकते असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. 22 ऑगस्ट 2024 रोजी वॉशिंग्टन येथे चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर पोहोचल्यानंतर तेथील भारतीय समुदायाशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. भारत आणि अमेरिका हे एकमेकांचे नैसर्गिक सहयोगी आहेत त्यामुळे ते मजबूत भागीदार होणे साहजिक असून हे सहकार्य सतत वृद्धिंगत होत आहे, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चैतन्यपूर्ण नेतृत्वाखाली भारताचा लौकिक जागतिक स्तरावर वाढला आहे, याचा पुनरुच्चार राजनाथ सिंह यांनी केला. “पूर्वी, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या म्हणण्याकडे ध्यान दिले जात नव्हते; मात्र आज संपूर्ण जग लक्षपूर्वक ऐकत आहे,” असे ते म्हणाले.
संरक्षणमंत्र्यांनी 5,000 हून अधिक वस्तूंचा समावेश असलेल्या सकारात्मक स्वदेशीकरण सूचीच्या अधिसूचनेसह संरक्षणामध्ये ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचा उल्लेख केला.
सध्याचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी होत असलेली 600 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात आता 21,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, ही वस्तुस्थिती राजनाथ सिंह यांनी निदर्शनास आणून दिली. “आम्हाला भारताला एक मजबूत, सुरक्षित आणि समृद्ध राष्ट्र म्हणून विकसित करायचे आहे”असे संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाबद्दल बोलताना सांगितले.
संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेतील भारतीय समुदायाला 'वसुधैव कुटुंबकम' (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) या भावनेनुसार प्रामाणिकपणाने आणि समर्पणाने काम करण्याचे आवाहन करून आपल्या भाषणाचा समारोप केला.
राजनाथ सिंह यांच्या आगमनाच्या अनुषंगाने, दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनी दोन प्रमुख करारांवर स्वाक्षरी केली - पुरवठा व्यवस्थेची सुरक्षा (SOSA) आणि संपर्क अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसंबंधी कराराचा मसुदा.
आपल्या अमेरिका भेटीदरम्यान संरक्षणमंत्री अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतील. याशिवाय ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे राष्ट्रीय सुरक्षाविषयक सहाय्यक जेक सुलिव्हन यांचीही भेट घेतील. तसेच, ते सध्या सुरू असलेल्या आणि भविष्यातील संरक्षण सहकार्यांबाबत अमेरिकेच्या संरक्षण उद्योगासोबत उच्च-स्तरीय गोलमेज बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. या भेटीमुळे भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ आणि व्यापक होईल अशी अपेक्षा आहे.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048156)
Visitor Counter : 78